Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

ईस्ट इंडियन मराठी भाषेतील चित्रपट ‘तू माझा जीव’ हिट
सुनील नांदगावकर

मराठी बोलीभाषांमध्ये मालवणी, खान्देशी, वैदर्भी, मराठवाडी, कोंकणी अशा अनेकानेक

 

बोली आहेत. मालवणी ही त्यातल्या त्यात अन्य मराठी भाषकांपर्यंत मोठय़ा प्रमाणावर पोहोचली ती मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’सारख्या नाटकांमुळे आणि मालवणी बोलीत प्रसिद्ध झालेल्या कविता आणि ललित साहित्यामुळे! गोव्यात बोलली जाणारी कोंकणी हीसुद्धा काही प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली. मात्र या दोन्ही बोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आता मात्र ईस्ट इंडियन मराठी अशी एक बोलीभाषा आहे त्यात चक्क सिनेमा आला असून तो बऱ्यापैकी प्रेक्षक मिळवत आहे.
हिंदी चित्रपट निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक संघटना यांच्यातील वादामुळे अजूनही नवीन चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. पण याचा फायदा भाईंदरमधील ईस्ट इंडियन भाषेत तयार झालेल्या चित्रपटाला होतो आहे. ‘तू माझा जीव’ हा ईस्ट इंडियन या मराठीच्या बोली भाषेतील चित्रपट नेल्सन पटेल या नवोदित निर्मात्याने तयार केला असून सध्या भाईंदरमधील मल्टिप्लेक्समध्ये सलग तिसऱ्या आठवडय़ातही जोरदार प्रतिसादासह सुरू आहे. तसेच आतापर्यंत केवळ दोनच खेळ होते तर १५ मेपासून मल्टिप्लेक्समध्ये ४ खेळ सुरू होणार आहेत, अशी माहिती या चित्रपटातील नायकाची भूमिका करणाऱ्या ऋत्विज वैद्य या नवोदित अभिनेत्याने सांगितले.
अलिबाग आणि डहाणू अशा किनारपट्टी परिसरात वास्तव्य करणारे कॅथॉलिक शेतकरी आणि कोळी समाजातील लोक ही भाषा बोलतात. त्यापैकी काही पिढय़ा कालांतराने वसई, भाईंदर, उत्तन अशा परिसरांत वास्तव्यास आहेत. आपल्या भाषेत चित्रपट निघाला म्हणून तो पाहण्यासाठी ईस्ट इंडियन मराठी भाषा बोलणारे परिसरातील लोक आवर्जून या चित्रगृहात येत आहेत.
कुणबी मुलगा कोळी समाजातील मुलगी यांची प्रेमकथा हा ‘तू माझा जीव’ या चित्रपटाचा विषय आहे.
निर्माता नेल्सन पटेल यांनी केवळ १४ लाखात हा चित्रपट बनविला असला तरी आपल्या भाषेत चित्रपट बनवल्याचे समाधान मिळाले. परंतु हे पैसे वसूल होतील की नाही ही भीती होती. परंतु आता १५ मेपासून ४ खेळ दररोज होत असल्याने पैसे वसूल होण्याची आशा निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एकविरा देवीवर सिनेमा काढून तो केवळ एक-दोन आठवडे ठाण्याच्या गणेश चित्रपटगृहात दाखविण्यात आला.
डहाणू, अलिबाग, उरण, वसई, मुंबईतील कालिना, इर्ला अशा ठिकाणी आजही ईस्ट इंडियन मराठी बोलीभाषा बोलणारे लोक मोठय़ा प्रमाणात आहेत. आपल्या भाषेतून चित्रपट निघाला आहे आणि म्हणून तो बघायला थिएटरात येणारा हा प्रेक्षक आहे. सुमारे ६ ते ७ लाख लोक ही भाषा बोलतात, असे नेल्सन पटेल यांनी सांगितले.
पैसा वसूल होणे वगैरे हा विचार आधी केला नव्हता. आपल्या भाषेत चित्रपट काढायचा हेच डोक्यात ठेवून आपण सिनेमा केला.
अभिनेता ऋत्विज वैद्य हा मूळचा भोपाळचा आहे. मुंबईत करिअर करायचे म्हणून आला. हिंदीवर त्याचे प्रभुत्व असले तरी मराठी असल्यामुळे तो ही बोलीभाषा शिकला. सिनेमापुरती तरी आपण ही बोलीभाषा शिकून घेतली आणि सिनेमा पूर्ण केला. पदार्पणातच वेगळ्या भाषेतील चित्रपट करण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे आणि प्रेक्षकांना तो आवडतोय हे समाधानकारक आहे, असेही ऋत्विजने सांगितले.
सुरुवातीच्या आठवडय़ात मॅक्सेस मॉल या भाईंदरमधील मल्टिप्लेक्समध्ये २५०० लोकांनी ‘तू माझा जीव’ पाहिला. त्यानंतरच्या आठवडय़ात ६५ टक्के प्रेक्षक वाढला. हिंदी सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी मराठी सिनेमा प्रदर्शित केले जात आहेत. याचाच फायदा ‘तू माझा जीव’ या चित्रपटाला मिळाला. पण प्रेक्षकसंख्या वाढलेली पाहून मॅक्सेस मॉलच्या व्यवस्थापनाने आता ‘तू माझा जीव’चे ४ खेळ सुरू केले आहेत. काही दिवसांनी वसईतील के. टी. व्हीजनमध्येही आपला चित्रपट दाखविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे नेल्सन पटेल यांनी सांगितले. दोन तास २६ मिनिटे कालावधीच्या या चित्रपटात ६ गाणी आहेत. मुख्यत्वे भाईंदर, उत्तन येथे चित्रीकरण करण्यात आले असून ईस्ट इंडियन मराठी बोलणाऱ्या लोकांना सिनेमातही काम देण्यात आले आहे.