Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

नावावर घर असतानाही ‘म्हाडा’चे घर लागलेले अनेकजण
प्रतिनिधी
दक्षता विभागाने तपशील मागविला
अपात्रांची संख्या वाढण्याची शक्यता
वर्सोव्यातील अनेक लाभार्थींच्या नावे अगोदरच घर
शहर आणि उपनगरातील सुमारे तीन हजार ८६३ घरासांठी मंगळवारी पार पडलेल्या संगणकीय सोडतीत अनेकांना दोन-तीन घरे लागली तर गरजूंना एकही घर लागले नसल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे ज्यांना घरे लागली, त्यापैकी अनेकजण नावावर घर असूनही अर्ज केल्याची कबुलीे स्वत: लॉटरी सोडतीच्या मांडवातच देत होते. वर्सोवा येथील घरांच्या अनेक लाभार्थींच्या नावे घरे असल्याचे दिसून येत आहे. घरांचे हे अपात्री दान शोधून काढण्यासाठी म्हाडाच्या दक्षता विभागाचे अधिकारी आता पुढे सरसावले असून अशा व्यक्तींची माहिती मिळविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

तयारी जय्यत! पण..
बंधुराज लोणे

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिका यंत्रणा बुधवार २० मेपासून सज्ज झाली आहे. कोणत्याही गंभीर स्थितीत मुंबईकरांचे रक्षण केले जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची आपत्कालीन व्यवस्था पालिकेकडे आहे. शिवाय यंदा केंद्रीय आपत्कालीन केंद्रातील जवान पालिकेच्या मदतीसाठी येणार आहेत. अशा रितीने पालिकेची तयारी तर जय्यत आहे. तरीही त्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे.

ईस्ट इंडियन मराठी भाषेतील चित्रपट ‘तू माझा जीव’ हिट
सुनील नांदगावकर

मराठी बोलीभाषांमध्ये मालवणी, खान्देशी, वैदर्भी, मराठवाडी, कोंकणी अशा अनेकानेक बोली आहेत. मालवणी ही त्यातल्या त्यात अन्य मराठी भाषकांपर्यंत मोठय़ा प्रमाणावर पोहोचली ती मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’सारख्या नाटकांमुळे आणि मालवणी बोलीत प्रसिद्ध झालेल्या कविता आणि ललित साहित्यामुळे! गोव्यात बोलली जाणारी कोंकणी हीसुद्धा काही प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली. मात्र या दोन्ही बोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आता मात्र ईस्ट इंडियन मराठी अशी एक बोलीभाषा आहे त्यात चक्क सिनेमा आला असून तो बऱ्यापैकी प्रेक्षक मिळवत आहे.

आजारी मोटरमन हाकताहेत उपनगरी रेल्वेचा गाडा
प्रसाद मोकाशी

संपूर्णपणे शारीरिक आणि मानसिकरीत्या तंदुरुस्त असलेल्या मोटरमननाच उपनगरी गाडय़ा चालविण्यास पात्र ठरविण्यात येत असते. मात्र, कामगार संघटनेच्या वशिल्याने आपली नादुरुस्त प्रकृती दडवून मध्ये रेल्वेचे अनेक मोटरमन उपनगरी गाडय़ा चालवून लाखो प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. अनेक वर्षांंमध्ये मोटरमनच्या रिक्त जागा न भरणे आणि प्रत्यक्षात असलेल्या मोटरमनवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण यामुळे हा खेळ बिनदिक्कत गेल्या काही वर्षांंपासून सुरू आहे.

मुंबईच्या वाहतूक विकासातील आगंतुकपणा
आजवर मुंबईत अनेक नवे फ्लायओव्हर बांधण्यात आले आहेत. शिवाय एमयूआयपी प्रकल्पांर्तगत पूर्व व पश्चिम द्रूतगती महामार्गावर अनेक फ्लायओव्हरची कामे सुरू आहेत. शहरातील प्रमुख हमरस्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरही काही नवे फ्लायओव्हर उभारण्यात येत आहेत. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स-हार्बर लिंक अद्यापही कागदावरच असला, तरी वांद्रे-वरळी सागरी सेतू लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर तसेच सहार विमानतळ येथे एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येत आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स व पूर्व द्रूतगती महामार्गाला जोडणारा आणखी एक एलिव्हेटेड मार्ग एमएमआरडीएने प्रस्तावित केला आहे.

रुग्णालयावरील हल्ले : पोलीस-डॉक्टर बैठक होणार
प्रतिनिधी

डॉक्टर आणि रुग्णालयांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात राज्य शासनाने कडक कायदा करूनही डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने ठाणे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी यासंबंधी प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी डॉक्टरांची बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत.

सह्य़ाद्री शिक्षण मंडळाला एक लाख एक हजार रूपयांची देणगी
प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससुनवघर येथील पंचायत समितीचे माजी सदस्य विजय पाटील यांनी मंगळवारी त्यांच्या ६१ व्या वाढदिवशी जुचंद्र येथील सह्य़ाद्री शिक्षण संस्थेला १ लाख एक हजार रूपयांचा रोख निधी अर्पण केला. विजय पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ६१ हजार रूपयांची थैली अर्पण केली. त्यात त्यांनी स्वत:चे ४० हजार रूपये टाकून एक लाख एक हजार रूपयांची देणगी सह्य़ाद्री शिक्षण मंडळाकडे सुपूर्द केली. निवृत्त पोलीस उप अधिक्षक दत्ता ठाकूर, आजीव पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य गोपीकिसन पाटील, माजी सभापती प्रभाकर म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, मदन किणी, धर्माजी पाटील, आदींच्या उपस्थितीत ही देणगी सुपूर्द करण्यात आली. विरारचे माजी नगराध्यक्ष राजीव पाटील यांनी विजय पाटील यांचा खास सत्कार केला.