Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

केंद्राकडून २९ कोटी प्राप्त
शहर पाणीपुरवठा सुधार योजना

नगर, २० मे/प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या लघु व मध्यम शहरे विकास योजनेंतर्गत शहर पाणीपुरवठा सुधार योजना मंजूर झाली असून, पहिला टप्पा म्हणून २९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची अधिकृत माहिती आज मनपाच्या वतीने देण्यात आली. आचारसंहितेचा अंमल संपल्यामुळे आज महापौर संग्राम जगताप व आयुक्त कल्याण केळकर यांनी अधिकृतपणे पत्रकारांना याची माहिती दिली. उपमहापौर हाजी नजीर शेख व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम या वेळी उपस्थित होते.

कोपरगाव, नगर तालुक्यांत गारपीट; वादळामुळे ३ जण जखमी
संगमनेर, राहात्यातही जोरदार पाऊस
नगर, २० मे/ठिकठिकाणचे वार्ताहर
मान्सूनपूर्व पावसाने आजही जिल्ह्य़ात जोरदार हजेरी लावली. प्रामुख्याने कोपरगाव, नगर तालुका, संगमनेर, तसेच राहाता तालुक्यांना तडाखा दिला. नगर तालुक्यात ३५ ते ४० घरांवरील पत्रे उडाले. १५० ते २०० झाडे, तसेच विजेचे खांब कोसळले. आठवड, तसेच चिचोंडी पाटील परिसरात वादळी पावसाच्या तडाख्यात तीन ते चारजण जखमी झाले.

बीडमधील वितरकाशी पोलिसांची बंद खोलीत चर्चा!
बनावट इंधन प्रकरण
पाथर्डी, २० मे/वार्ताहर
रॉकेलपासून बनावट पेट्रोल-डिझेल तयार केले जात असलेल्या तालुक्यातील तांबेवाडी येथील धंद्यात भागीदार असलेल्या बीड जिल्ह्य़ातील एका वितरकाशी सोमवारी (दि. १८) काही पोलीस अधिकाऱ्यांनी शहरालगत असलेल्या विश्रामगृहात बंद खोलीत चर्चा केल्याने पुरवठा शाखासंबंधित वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नसला, तरी या प्रकरणातून आपली सहीसलामत सुटका करावी, यासाठीच ही भेट झाली असल्याचे समजते.

‘डमी’ नगरसेवक ठरू लागले उचा‘पती’!
नगर, २० मे/प्रतिनिधी

महिला नगरसेवकांच्या पतींचा मुक्त वावर हे आता महापालिका कार्यालयाचे वैशिष्टय़ होऊ लागले आहे! पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नासाठी होत असलेल्या प्रभाग समित्यांच्या बैठकांना हे ‘डमी’ नगरसेवक आता अधिकृत हजेरी लावू लागले असून, ते नियमबाह्य़ असतानाही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिला नगरसेवकांचे पती किंवा अन्य कोणत्याही नातेवाईकांचा संबंधित संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील हस्तक्षेप सरकारने नियमबाह्य़ ठरविला आहे.

‘जगदंबा’चे भवितव्य पुन्हा टांगणीला
‘नॅचरल शुगर’ने गाशा गुंडाळला!

कर्जत, २० मे/वार्ताहर

तालुक्यातील जगदंबा सहकारी साखर कारखाना भाडेपट्टय़ावर चालविण्यास घेतलेल्या नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीजने आठ वर्षांचा करार पाच वर्षे आधीच अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता गाशा गुंडाळल्याने कारखान्यातील साडेचारशे कामगार, तसेच तालुक्यातील हजारो ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य पुन्हा अनिश्चिततेत लोटले गेले आहे.
‘नॅचरल शुगर’चे अधिकारी मंगळवारी रात्री ‘जगदंबा’ सोडत असल्याचा फॅक्स साखर आयुक्तांना पाठवून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती आज मिळाली.

चौघांना तलवारीने मारहाण, एकाची प्रकृती गंभीर
सातजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
नगर, २० मे/प्रतिनिधी
मुलांच्या भांडणाचे पर्यवसान चौघांना पिस्तुलाचा धाक दाखवून तलवारीने बेदम मारहाण करण्यात झाले. मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या प्रकरणी सातजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. भरत अर्जुन चोभे (वय २२) यांनी फिर्याद दिली.

संगमनेरच्या व्यापाऱ्यास १ कोटी १२ लाखांस गंडा
मुंबईच्या तिघांविरुद्ध गुन्हा
संगमनेर, २० मे/वार्ताहर
भाडेतत्त्वावर वाहने पुरविण्याचे कंत्राट देण्याचा बहाणा करून मुंबईतील तिघा ठगांनी येथील व्यापारी जसपाल डंग यांना सुमारे १ कोटी १२ लाखांना गंडा घातला. डंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही. विशाल अरविंद राजगुरू, दीपक भोर व सोनल विशाल राजगुरू (सर्व राहणार सानपाडा, नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

आराम बसच्या धडकेत दोघे ठार, एक जखमी
नेवासे, २० मे/वार्ताहर

नगर-औरंगाबाद रस्त्यावर प्रवरासंगमजवळ भरधाव वेगातील खासगी आराम बसच्या धडकेने मोटरसायकलवरील दोघे ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. नेवासे पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. काल रात्री नेवाशातील काही तरुण प्रवरासंगमजवळील ढाब्यावर जेवायला गेले होते.

चौघांना तलवारीने मारहाण, एकाची प्रकृती गंभीर
सातजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
नगर, २० मे/प्रतिनिधी
मुलांच्या भांडणाचे पर्यवसान चौघांना पिस्तुलाचा धाक दाखवून तलवारीने बेदम मारहाण करण्यात झाले. मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या प्रकरणी सातजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. भरत अर्जुन चोभे (वय २२) यांनी फिर्याद दिली.

वेडे असे, अशी वेडं
‘जगी या खास वेडय़ांचा पसारा मातला सारा’ हे नाटय़गीत जेवढे श्रवणीय आहे तेवढा त्यातील आशयही लक्षणीय असाच आहे. गीतातील वेडय़ांविषयीची कवीची निरीक्षणं अनोखं आणि अद्भूत सत्यच अधोरेखीत करताना दिसतात. ‘दुनिया रंगरंगिली बाबा, दुनिया रंगरंगिली’ या गीतातल्या दुनियेचे वर्णन केल्यागत प्रत्यंतरही साऱ्यांना आलेले. पण ज्यांच्यामुळे ही दुनिया खरोखरीच रंगरंगिली होते, त्यास खास वेडय़ांच्या आणि अर्थातच त्यांच्या आगळ्यावेगळ्या अंतरंगाविषयी कुतूहल वाटतं आणि औत्सुक्य जागं होतं.

आराम बसच्या धडकेत दोघे ठार, एक जखमी
नेवासे, २० मे/वार्ताहर

नगर-औरंगाबाद रस्त्यावर प्रवरासंगमजवळ भरधाव वेगातील खासगी आराम बसच्या धडकेने मोटरसायकलवरील दोघे ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. नेवासे पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. काल रात्री नेवाशातील काही तरुण प्रवरासंगमजवळील ढाब्यावर जेवायला गेले होते. जेवणानंतर परतताना नगरकडून आलेल्या खासगी आराम बसची (एमएच १६ क्यू २७२७) त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक बसली. धडक बसताच एकजण उडून पडला. मोटरसायकल आराम बसला अडकून ४० फूट फरफटत गेली. त्यानंतर एकजण खाली पडला. या अपघातात मोटरसायकलवरील गणेश भाऊसाहेब साळुंखे हा जागीच ठार झाला. औरंगाबादहून नेवाशाकडे येणाऱ्या गोरख घुले, संतोष परदेशी, सुनील धायजे, बच्चू बोरकर, किरण शिंदे, नितीन खंडागळे यांनी अपघातातील तरुणांना ओळखले. त्यांनी तातडीने जखमींना नगरला हलवले. परंतु रस्त्यातच विजय प्रभाकर करंडे याचे निधन झाले. जखमी सुनील यादवराव सुडके याच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी ही माहिती नेवाशात समजताच व्यापाऱ्यांनी दुपापर्यंत दुकाने बंद ठेवली. गणेश साळुंके येथील नाभिक संघाचा माजी अध्यक्ष होता. करंडेचा पानाचा व्यवसाय होता. सुडके नेवासे न्यायालयात वकिलाकडे कारकून आहे. या प्रकरणी राजेंद्र मापारी यांनी फिर्याद दिली.

दोन दुचाकींच्या अपघातात मुख्याध्यापक ठार
श्रीगोंदे, २० मे/वार्ताहर

नगर-दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन मुख्याध्यापक सर्जेराव रावसाहेब पंधरकर (वय ५७) ठार झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास झाला. (कै.) पंधरकर हे पिंपळगाव पिसे येथील रहिवासी होते. ते आनंदवाडी (ता. श्रीगोंदे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच ते मरण पावले होते. शिक्षक संघटनेचे संदीप मोटे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कीर्ती गायकवाड यांच्या नृत्याने रसिक मंत्रमुग्ध
पूर्णवाद महोत्सव
पारनेर, २० मे/वार्ताहर
येथे सुरू असलेल्या ५७व्या पूर्णवाद महोत्सवाचा दुसरा दिवस प्रसिद्ध नृत्यांगना कीर्ती गायकवाड-भेवाळकर (नाशिक) यांनी गाजवला. तालबद्ध पदन्यास, श्रीराम वंदना, प्रचलित पद्धतीनुसार सादर केलेला त्रिताल, गुरू भजनांवरील कथ्थक नृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. सकाळच्या सत्रात सुवर्णा बोरकर (पुणे) यांचे संस्कृतमधून व्याख्यान झाले. श्रीमती विभावरी कुलकर्णी यांचा ‘अभिनव अभंग’ या ग्रंथावर अभ्यासवर्ग झाला.
रात्री विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील नृत्य परीक्षक श्रीमती गायकवाड यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम झाला. श्रीराम वंदनेने नृत्यास प्रारंभ केला. त्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार तीन तालांचे सादरीकरण केले. धृतल, तोडे, कवित्व, अभिनय हे कथ्थक नृत्यातील प्रकार सादर केले. श्रीमती गायकवाड यांना प्रमोद भडामकर (तबला), पुष्कराज भागवत (हार्मोनियम), सायली मोहडिक यांची साथ लाभली. या वेळी विष्णूमहाराज पारनेरकर, गुणेश पारनेरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर, संगीता पारनेरकर, शलाका पारनेरकर, रंजनाताई चौहान, विभावरी कुलकर्णी आदी उपस्थित होते. देवयानी शिंदे यांनी स्वागत केले. अपूर्णा काळे यांनी आभार मानले.

‘समाजात विष पेरण्याचे काम आठवलेंनी करू नये’
श्रीगोंदे, २० मे/वार्ताहर

राजकीय हेतू साध्य करण्यासाठी समाजात विष पेरण्याचे काम रामदास आठवले यांनी करू नये. कुणाचे पुतळे जाळून त्यांची विचारसरणी जाळता येत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला रिपब्लिकन पक्षाची गरज आहे याचा अर्थ आठवलेंनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना वेठीस धरावे, असा होत नाही, असे अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य डी. एम. भालेराव व जि. प.च्या समाजकल्याण विभागाचे माजी अध्यक्ष मल्हारराव घोडके यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य पचवता न आलेले रामदास आठवले बाळासाहेब विखे व थोरात आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या पराभवास जबाबदार धरतात. आठवले यांची ही भूमिका लोकशाहीत क्लेशदायक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवण्याचा सल्ला पत्रकात दिला आहे.

जेऊरकुंभारी संस्थेवर प्रशासकाची नेमणूक कायम
कोपरगाव, २० मे/वार्ताहर
तालुक्यातील जेऊरकुंभारी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर प्रशासक संजय पाटील यांची नेमणूक कायम ठेवण्याचा आदेश सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिला असल्याची माहिती विधिज्ञ विजय गवांदे यांनी दिली. संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सहायक निबंधक सी. एम. बारी यांनी गेल्या ६ मार्चला सहकार अधिकारी संजय पाटील यांची संस्थेवर नेमणूक रद्द केली होती. त्यास संस्थेच्या सत्तारूढ गटाने नाशिकच्या विभागीय सहनिबंधकाकडे अपील दाखल केले होते. हे अपील सहनिबंधक यांनी २५ मार्चला फेटाळले. त्याविरुद्ध राजमंत्री दांडेगावकर यांच्याकडे रिव्हीजन अर्ज दाखल केला होता. त्यावर १२ मे रोजी सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे, तसेच कॅव्हीएटर व मूळ अर्जदार तुकाराम गोकुळ चव्हाण यांचे म्हणणे ऐकून हा अर्ज १४ मे रोजी फेटाळला. वरीलप्रमाणे निकाल कायम केला. सरकारतर्फे सहायक निबंधक सी. एम. बारी व तुकाराम चव्हाण यांच्या वतीने विजय गवांदे यांनी काम पाहिले.

कोंडेगव्हाणधील नुकसानीकडे महसूल यंत्रणेची डोळेझाक
श्रीगोंदे, २० मे/वार्ताहर
तालुक्यातील कोंडेगव्हाण परिसरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने घरांची पडझड झाली. मात्र, या नुकसानीकडे महसूल यंत्रणेने डोळेझाक करीत पंचनामे न केल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तालुक्याच्या पश्चिम भागातील ढवळगाव, येवती, कोंडेगव्हाण भागात वादळात मोठे नुकसान झाले. मात्र, इतर गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याची तत्परता महसूल यंत्रणेने दाखविली. पण कोंडेगव्हाणमधील नुकसानीबद्दल यंत्रणा उदासीन आहे. गावातील ५-६ घरांचे पत्रे उडाले, तेथील मंदिराचेही नुकसान झाले. आंब्यासह इतर झाडे पडली. कडब्याच्या गंजी उडून गेल्या. मात्र, कामगार तलाठी गावाकडे व फिरकल्याने गावकऱ्यांनी आज जि. प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांना गाऱ्हाणे सांगितले. भोस यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत माजी सरपंच दादासाहेब इथापे, युवराज इथापे होते. भोस यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तलाठय़ाने कोतवालावर पंचनाम्याची जबाबदारी टाकली होती. पण आता तरी तातडीने पंचनामे करा, असे ते म्हणाले.

नगरमध्ये प्रथमच टेस्ट टय़ूब बेबीचा जन्म
नगर, २० मे/प्रतिनिधी
वर्षभरापूर्वीच स्थापन झालेल्या अहमदनगर टेस्ट टय़ूब बेबी सेंटरमध्ये पहिल्या टेस्ट टय़ूब बेबीचा नुकताच जन्म झाला. याव्यतिरिक्त अन्य १० स्त्रियांना गर्भ राहिला असून, हे केंद्र वंध्यत्व असलेल्या जोडप्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे, अशी माहिती सेंटरचे संचालक डॉ. अनिल बेंद्रे यांनी दिली. टेस्ट टय़ूब बेबीला जन्म दिलेल्या महिलेस ‘प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर’ झाले होते. त्यामुळे विवाहानंतर ६ वर्षांनंतरही या महिलेस गर्भ राहत नव्हता. इतर सर्व प्रकारचे उपचार, औषधे घेऊनही ही समस्या संपत नव्हती. अखेर सेंटरने या महिलेला व तिच्या पतीला आधार दिला. सेंटरमध्ये असलेल्या एक्सी या अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या साह्य़ाने डॉ. फडणीस (पुणे), ऐम्ब्रीयॉलॉजीस्ट डॉ. सचिन जाधव, डॉ. स्मिता बेंद्रे, डॉ. बेंद्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. नानासाहेब अकोलकर, भूलतज्ज्ञ डॉ. संगीता अकोलकर यांनी या महिलेवर उपचार केले. ही टेस्ट टय़ूब बेबी सेंटरच्या यशाचे प्रतीक आहे. गरजूंनी सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बेंद्रे यांनी केले आहे.

लोखंडी गजाने मारहाणीचा पाचजणांवर गुन्हा दाखल
नगर, २० मे/प्रतिनिधी
सार्वजनिक जागेतून मोटरसायकल जाऊ देत नाही, या कारणावरून चौघांना लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रवींद्र हेन्री गायकवाड (वय ५५, ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर) यांनी फिर्याद दिली. गायकवाड हे घराजवळील सार्वजनिक जागेतून मोटरसायकल जाऊ देत नाहीत, तसेच लहान मुलांना खेळू देत नाहीत, या कारणावरून याच वसाहतीतील पाचजणांनी येऊन गायकवाड, त्यांची पत्नी मृणालिनी, त्यांचा भाऊ अजय, भावजयी जोस्पीन गायकवाड या चौघांना शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली व खून करण्याची धमकी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी प्रभाकर धोंडीबा गायकवाड, विद्याधर प्रभाकर गायकवाड, वनमाला प्रभाकर गायकवाड, स्वरुपा नितीन जाधव, नितीन जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘जैन सोशल महासंघाची रक्तपेढी आदर्शवत ठरेल’
नगर, २० मे/प्रतिनिधी
जैन सोशल महासंघाच्या माध्यमातून नगरमध्ये उभारण्यात येणारी ‘राष्ट्रसंत आनंदऋषीजी रक्तपेढी’ आदर्शवत व आंतरराष्ट्रीय स्तराची असेल, असे प्रतिपादन जैनमुनी प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीमहाराज यांनी केले. माणिकनगर येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चून एस. डी. पी. (सिंगल डोनर प्लेटलेट) ही अत्याधुनिक तंत्रप्रणालीने युक्त रक्तपेढी उभारली जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन उद्योगपती निखीलेंद्र लोढा व मनीषा लोढा या दाम्पत्याच्या हस्ते झाले. कामाचा प्रारंभ नवनिर्वाचित खासदार दिलीप गांधी, आमदार अनिल राठोड, महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी जैनमुनी विनोदमुनीजी महेंद्रऋषीजी, महासतीजी किरण प्रभाजी, महासतीजी अर्चनाजी, उदय प्रभाजी यांनी मंगल संदेश देऊन शुभेच्छा दिल्या. डॉ. संतोष कटारिया यांनी रक्तपेढीविषयी सविस्तर माहिती दिली. महासंघातर्फे संतोष बोथरा यांनी स्वागत केले. दत्तात्रेय वारकड यांनी आभार मानले. जिल्हा शल्यचिकित्सक माधव मुंडे, जैन महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, नगरसेवक संजय चोपडा, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. विजय भंडारी, विलास लोढा, डॉ. सुधा कांकरिया आदी उपस्थित होते.

नेत्यांचे पुतळे जाळल्याचा युवक काँग्रेसतर्फे निषेध
नगर, २० मे/प्रतिनिधी
रामदास आठवले यांच्या पराभवानंतर रिपब्लिकन आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळल्याच्या घटनांचा जिल्हा युवक काँग्रेसने निषेध केला. युवक काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत या निषेधाचा ठराव करण्यात आला. आठवले यांचा पराभव धक्कादायक आहे. मात्र, यानिमित्ताने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयांवर केलेले हल्ले, तसेच सोनिया गांधी, बाळासाहेब विखे, बाळासाहेब थोरात या नेत्यांचे पुतळे जाळणे आदी कृत्ये करून गोंधळ चालू केल्याचे ठरावात म्हटले आहे. बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह निवडणुकीत युवकांना संधी देणाऱ्या राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राज्याचे प्रचारप्रमुख बाळासाहेब विखे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन करण्याचा ठरावही संमत करण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘संगमनेर’ दरोडाप्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी
संगमनेर, २० मे/वार्ताहर

संगमनेर साखर कारखाना दरोडाप्रकरणी अटकेत असलेल्या चोरीचा सूत्रधार कैलास सावंत, तसेच नगरचा व्यापारी मनोज भटेवरा यांना आज येथील न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुमारे दीड कोटी किमतीची साखरचोरी केल्याचा सावंत याच्यावर आरोप आहे. भटेवरा याने चोरीची साखर सावंत याच्याकडून विकत घेतली होती. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सावंत याला दि. ८ रोजी पोलिसांनी औरंगाबाद येथे अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून नगरचा व्यापारी भटेवरा यालाही पोलिसांनी अटक केल्यानंतर दोघेही पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. अग्रवाल यांनी त्यांना दि. २२पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, सावंतची पत्नी आज येथे आली होती. पोलिसांनी तिच्याकडेही चोरीच्या गुन्ह्य़ाबाबत चौकशी केली.