Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

शहरात पावसाच्या सरी
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

दिवसाचे तापमान ४४ अंशावर गेल्यानंतर रात्री शहराच्या काही भागात आलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी नागपूरकर सुखावले. रस्ते पावसाने न्हाऊन निघाले. सुटलेला थंड वारा आणि रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या धारांनी गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ामुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला.

‘त्या’ मुलीचा बलात्कारानंतर खून केल्याचा आरोप
राहतेकरवाडीत तणाव
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

‘त्या’ मुलीवर बलात्कार व खून करण्यात आल्याचा तसेच, पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने राहतेकरवाडीत बुधवारी सायंकाळी तणाव निर्माण झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या महालातील वाडय़ाच्या आवारात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी काल रात्री पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला.

अभियंते करणार पूरनियंत्रण
नागपूर, २० मे/ प्रतिनिधी

पावसाळा पूर्व नियोजनाची तयारी शासनाने सुरूकेली असून दरवर्षी नद्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर आणि अमरावती विभागात अनुक्रमे ही जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. कलाम आज शहरात
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्या, गुरुवारी शहरात येत असून दोन दिवस त्यांचे कार्यक्रम आहेत. राष्ट्रपदीपदावरून निवृत्त झाल्यानंतर डॉ. कलाम यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. उद्या, २१ तारखेला डॉ. कलाम यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल.

आयसीएसई, सीबीएसईचे निकाल जाहीर; सराफचा आकाश अंतापूरकर, एमएसबीची तसनीम सुनेलवाला व भवन्सचा अ‍ॅन्थोनी जार्ज अव्वल
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे (आयसीएसई) दहावी आणि सीबीएसई चेन्नई, अजमेर व पंचकुला मंडळाचे बारावीचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. नागपुरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

..मग ही ‘अधिकारहीन’ पदे रद्दच केलेली बरी!
पोलीस दलात चर्चेला जोर

किरण राजदेरकर, नागपूर, २० मे
सहपोलीस आयुक्त वा अतिरिक्त पोलीस अधीक्षक ही पदे रद्दच करावी, असा नवा मतप्रवाह पोलीस दलात जोर धरू लागला आहे. जबाबदारी असलेल्या कामातही डावलले जात असल्याने हताश झाल्याचा आरोप करीत नागपूरचे सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्याने नागपूरच नव्हे तर, विदर्भात चर्चेला जोर आला.

रेल्वेचे सुरक्षा पथक आज नागपुरात
नागपूर, २० मे/ प्रतिनिधी

मान्सून पूर्व रेल्वेच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी मुख्यालयातून आज पाच सदस्यांचे पथक येथे येत आहे. उद्यापासून दोन दिवस हे पथक नागपूर-इटारसी या सेक्शनची पाहणी करणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील विद्युत, एस अँड टी, प्रोक्रुमेन्ट आणि ट्रॅक्स या विभागाचे मुख्य अभियंता या पथकात राहणार आहेत. या पथकाचे नेतृत्त्व मुख्य सुरक्षितता अधिकारी एम.एस. शर्मा करणार आहेत. नागपूर-इटारसी सेक्शनमधील घोराडोंगरी या घाट सेक्शनमध्ये पावसाळ्यात दरड कोसळते. या भागाची हे पथक पाहणी करेल तसेच विभागाने रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार सुरक्षितता आणि इमरजन्सी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी नागपूर विभाग कितपत सज्ज आहे. याबाबतही माहिती हे पथक घेणार आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या. याचा आढावा रेल्वेच्या प्रत्येक विभागात घेण्यात येते. विशेषत: ज्या विभागात घाट पडतात. तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडतात, अशा विभागाच्या सुरक्षितता आढावा घेणे बंधणकारक आहे.

मुत्तेमवारांचा विरोध करणाऱ्या मंत्री व आमदारांना धडा शिकवा
घंटानादच्या कार्यकर्त्यांचे आवाहन
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विलास मुत्तेमवार यांना विजयी करून त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे मंत्री व आमदारांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पक्षाचा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांमुळे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. यापुढेही अशा नेत्यांना धडा शिकवा, असे आवाहन घंटानादच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. घंटानादच्या कार्यकर्त्यांनी सीताबर्डीतील कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा केला. यावेळी रूपराव तिवसकर, जब्बार सहर, मारोतराम तुमडाम, शरीफ अंसारी, सूर्यकांत उके, नईम खान, गौतम धुपे, खुर्शीद अंसारी, शीला मासुरकर, कल्पना साखरे, भावना नाईक आदी उपस्थित होत्या.

ताजबागातील बेघर केलेल्याची तात्काळ व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

सौंदर्यीकरणाच्या नावावर ताजबाग परिसरातील रहिवाशांना बेघर केल्याचा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी निषेध केला आहे. या रहिवाशांची तात्काळ पर्यायी व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ताजबागमध्ये धार्मिक विधी करणाऱ्यांना ही जागा देण्यात आली होती. मात्र, ट्रस्टच्या अध्यक्षांच्या चुकीच्या धोरणामुळे पुजाऱ्यांवर ही वेळ आली. या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था केल्यानंतर त्यांना हटवण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले होते. मात्र, अध्यक्ष व सचिवांनी ट्रस्टवर जबरदस्तीने ताबा मिळवून ही कारवाई घडवून आणल्याचा आरोपही सिद्दिकी यांनी केला.

विलास मुत्तेमवारांच्या विजयानिमित्त सेवादलातर्फे मिठाईचे वाटप
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील विलास मुत्तेमवार यांचा विजय शहर सेवादलाच्यावतीने मिठाई वाटून साजरा केला. प्रदेश सेवादलाचे मुख्य संघटक शशीकांत थोरात यांनी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या उपस्थितीत शहर सेवादलाचे मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांचे अभिनंदन करून सत्कार केला. निवडणूक प्रचारात सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगून थोरात यांनी निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी निशा मेश्राम, रेखा ढाबरे, रत्नमाला फोपरे, माया ढोबले, निशा चौधरी, आशा खोंडे, वीणा तिवारी, अरूण शास्त्रकार, विजय शेंडे, बबन दुरूगकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. पठाण यांनी केले दत्ता मेघेंचे अभिनंदन
नागपूर, २० मे/प्रतिनिधी

वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजयी ठरल्याबद्दल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष शेख हुसैन, डॉ. शकील सत्तार, भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे अध्यक्ष दाऊद शेख, आशिष वाकडे उपस्थित होते.

जबलपूरच्या कविसंमेलनात तन्हा नागपुरींच्या कविता सादर
नागपूर, २० मे/ प्रतिनिधी

जबलपूरच्या ‘वर्तिका’या नियतकालिकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात कवी तन्हा नागपुरी यांनी कविता सादर केल्या. यावेळी अध्यक्षस्थानी अंशलाल पन्द्रे होते. तन्हा नागपुरी, ज्ञानचंद पंडा, डॉ. प्रमोद भांडारकर वगैरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वर्तिका’तर्फे गीता गीत आणि संस्थापक अध्यक्ष साज जबलपुरी यांनी दीपप्रज्वलन केले. त्यांनी साहित्यिक प्रांतात ‘वर्तिका’चे आतापर्यंतचे योगदान आणि विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले. संचालन मोहन लोधिया यांनी केले. यावेळी अंशलाल पन्द्रे, प्रभात दुबे, साज जबलपुरी, मोहन लोधिया, गीता गीत, राजेंद्र जैन रतन, अंजनीकुमार सिन्हा, आशा वर्मा आदींनी त्यांच्या कविता सादर केल्या. साज जबलपुरी यांनी आभार मानले.

स्वत:च स्वत:चे मूल्यांकन करणारे जीवनात यशस्वी -डॉ. चारी
नागपूर, २० मे/प्रतिनिधी

नकारात्मक विचारांना सकारात्मक दृष्टिकोनात बदलण्याचा प्रयत्न करणारे आणि स्वत:च स्वत:चे मूल्यांकन करणारे जीवनात यशस्वी होतात, असे मत डॉ. सुरेश चारी यांनी मांडले. जेसीस ऑफ नागपूरच्यावतीने हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे आयोजित प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी अंचल अध्यक्ष नितीन ठक्कर होते.
जीवनात ज्यांना यश मिळते ती व्यक्ती सर्व सुखसाधनातून बाहेर आल्यानेच त्यांना यश मिळते, असे डॉ. चारी म्हणाले. समानुभूती आणि सहानुभूती यातील फरक सांगताना डॉ. चारी म्हणाले, समानुभूती सहानुभूतीपेक्षा श्रेष्ठ आहे. काय आणि कसे यातील फरक समजावून सांगताना, यातील कसे हा शब्द महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंचलचे प्रशिक्षण प्रमुख धनंजय ठोंबरे यांनी केले. अंचल जनसंपर्क अधिकारी प्रवीण लाडे यांनी आभार मानले.

केशरचना शिबिराचे उद्घाटन
नागपूर, २० मे / प्रतिनिधी

सरस्वतीचंद्र ब्युटीकल्चर इन्स्टिटय़ुटच्यावतीने दिघोरी परिसरातील सनरेज कॉन्व्हेंटमध्ये विनामुल्य केशरचना शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्रदेश काँग्रेसच्या समन्वयक व मेकअप आर्टिस्ट करूणा पेंडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक अंजली खोब्रागडे व प्रमुख पाहुणे म्हणून सौंदर्यतज्ज्ञ शालिनी सक्सेना होत्या. केशरचना हा हस्तकलेचा एक भाग असून, यात कलेला भरपूर वाव आहे. स्त्रियांनी काळाची गरज लक्षात घेऊन प्रोफेशनल व्हायला हवे. अशाप्रकारचे प्रशिक्षण घेऊन आधुनिकतेकडे वाटचाल करायला पाहिजे, असे मत करूणा पेंडसे यांनी मांडले. सुंदरता ही कलेतूनच प्राप्त होते. तसेच, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाने महिला स्वावलंबी होऊ शकतात, असे मत शालिनी सक्सेना यांनी मांडले. ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण घेतल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत अंजली खोब्रागडे यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी भोपळे यांनी तर, संचालन जयश्री नगरारे यांनी केले. संगीता गभणे यांनी आभार मानले.