Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

नवनीत

जी व न द र्श न
स्वाध्यायं परमं तप:

 

अंतरंग व बहिरंग तपाचे बारा प्रकार आगम ग्रंथात सांगितले आहेत. त्यात अंतरंग तपामध्ये स्वाध्यायाला ‘स्वाध्यायं परमं तपं’ म्हटले आहे. चुकांची कबुली देऊन प्रायश्चित्त घेणे, गुरू, आचार्य, विद्वद्जन, वडीलधारी यांच्याशी विनयाने वागणे, आजारी, वयोवृद्ध, निराधार, अपंगांची सेवा करणे- एकाग्र होऊन ध्यान करणे, ‘स्व’मध्ये लीन होणे म्हणजे बाहय़ गोष्टीचा विचार न करता आत्म्यात रमणे, देहाचे नको तितके चोचले न पुरवता, सारखा शरीराचा विचार न करता योगमुद्रेत काही काळ बसणे व स्वाध्याय करणे ही अंतरंग तपे होत. स्वाध्यायाला तप म्हटलं आहे. तप म्हणजे संयम. इच्छानिरोध म्हणजे तप. स्वाध्यायाचा अर्थ असाही आहे. स्व + अधि - अय म्हणजे स्वत:विषयीचे ज्ञान प्राप्त करून देणे. स्वाध्यायाचे पाच भेद सांगितले आहेत:-
१) वाँचना- आत्महित करणारे- खरे ज्ञान देणारे- अध्यात्मिक ग्रंथ वाचून, त्याहून आपल्या शक्तीनुसार, कुवतीनुसार, बुद्धीनुसार अर्थ काढणे, तोही तर्काला पटणारा असावा.
२) पृच्छना- ग्रंथात पुष्कळ वेळा काही तत्त्वे अवघड भाषेत सांगितलेली असतात. ती समजली नाही तर विनयपूर्वक गुरूला त्याचा अर्थ विचारणे.
३) अनुप्रेक्षा- धर्मग्रंथात, आगमग्रंथात जे वाचले- गुरूंना जे विचारले, त्यावर गंभीर विचार करणे, चिंतन करणे- आपल्या वागण्यात धर्म उतरवणे.
४) अम्नाय- तो विषय ती तत्त्वे नीट समजून घेऊन ती मुखोद्गत करणे- पाठ करणे, विसरून न जाणे, श्रद्धा ठेवणे, अंधश्रद्धा नव्हे.
५) धर्मोपदेश- वाचून, समजून घेऊन, सखोल चिंतन करून, पाठ करून धर्मतत्त्वे म्हणजे सदाचार, सद्विचार, सत्श्रद्धा स्वत: अंगीकारून सर्व तत्त्वांवर अधिकार आला की जनसामान्यांना त्यांच्या हितार्थ- त्यांच्या भल्यासाठी, सुखी जगण्यासाठी उपदेश देणे, प्रवचने देणे.
स्वाध्यायाचा इतका खोल अर्थ आहे. स्वत:वर ताबा ठेवून संयम ठेवल्यावर मगच या गोष्टी होऊ शकतात, म्हणून त्याला तप म्हटले आहे.
लीला शहा

कु तू ह ल
अंतराळयुग- १
अंतराळयुगाचे आद्य प्रणेते कोण?
विमानेसुद्धा अस्तित्वात नसताना चंद्रप्रवासावर कादंबरी लिहिणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील ज्यूल्स व्हर्न या द्रष्टय़ा फ्रेंच लेखकाकडून अनेकांना अंतराळसंशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. या कारणास्तव ज्यूल्स व्हर्नने अंतराळयुगाची पायाभरणी केली, असे म्हणता येईल. प्रत्यक्ष अंतराळउड्डाणाच्या बाबतीत सोव्हिएत रशियाचा त्सिओल्कोवसकी, अमेरिकेचा रॉबर्ट गॉडर्ड व जर्मनीचा हरमान ओबर्थ हे तिघे अंतराळयुगाचे आद्य प्रणेते मानले जातात. या तिघांनीही ज्यूल्स व्हर्नची पुस्तके अगदी लहानपणी वाचली होती.
या तिघांपैकी त्सिओल्कोवसकीने इ.स. १९०३ मध्ये पहिल्यांदा अंतराळप्रवासाची गणिते मांडली. रॉकेटमध्ये द्रवरूप प्राणवायू वापरण्याची ही त्याची महत्त्वाची कल्पना आजही एका शतकानंतर वापरात आहे. चंद्रप्रवासातील असंख्य संकटांची त्याला पुरेपूर कल्पना होती. त्याने पाचशे शोधनिबंध लिहिले. परंतु तो रॉकेट उडवू शकला नाही. रॉकेटची कल्पना प्रत्यक्षात आणली ती ज्यूल्स व्हर्नचाच वाचक असणाऱ्या अमेरिकेच्या रॉबर्ट गॉडर्डने. इ.स. १९२० सालच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील गॉडर्डचा चंद्रप्रवासाबद्दलचा लेख वाचून भल्या भल्या लोकांनी त्याला वेडय़ात काढले. पण इ.स. १९२६ साली त्याने द्रवरूप इंधनावर चालणारे पहिले रॉकेट उडवून टीकाकारांची तोंडे बंद केली. व्हर्नचा तिसरा शौकीन म्हणजे हरमान ओबर्थ. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रॉकेटच्या प्रारूपाचा आराखडा कुणाच्याही मदतीशिवाय तयार केला. टप्प्यांचे रॉकेट वापरण्याची महत्त्वाची कल्पना ओबर्थने स्वतंत्रपणे मांडली.
आज जर ज्यूल्स व्हर्नच्या ‘अराउन्ड द वर्ल्ड इन एटी डेज’सारखी कादंबरी लिहायची झालीच तर तिचे नाव ‘अराउन्ड द वर्ल्ड इन एटी मिनिट्स’ असे असेल. कारण या तीन शिलेदारांच्या योगदानावर आधारलेल्या तंत्रज्ञानाद्वारे आता पृथ्वीच्या अवतीभोवती शेकडो उपग्रह चकरा मारत असतात आणि यातल्या अनेक उपग्रहांची पृथ्वीप्रदक्षिणा फक्त दीड तासात पूर्ण होते.
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
निजामुल्मुल्क
हैदराबाद निजामी घराण्याचे संस्थापक, मुत्सद्दी, युद्धकुशल सेनापती आणि मराठय़ांचा कट्टर दुश्मन मीर कमरुद्दीन या त्याच्या नावापेक्षा निजामुल्मुल्क या त्याच्या पदवीच्या नावाने इतिहासात तो प्रसिद्ध आहे. १६७१च्या सुमारास जन्मलेल्या निजामाचे मूळ घराणे मध्य आशियातले, त्याचे पूर्वज शाहजहानच्या काळात हिंदुस्थानात आले. स्वत: निजामुल्मुल्क हा औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत तो औरंगजेब मरेपर्यंत त्याच्यासोबत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तो दिल्लीत गेला. आपला प्रतिस्पर्धी मुयरिजखान याचा पाडाव करून हैदराबाद येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. पुढे हाच निजाम आणि त्याची पुरी खानदान मराठय़ांना एक डोकेदुखी ठरली. मराठय़ांच्या अंतर्गत संघर्षांची निजामाला पुरेपूर कल्पना असल्याने छत्रपती शाहू आणि पेशवा पहिल्या बाजीरावाचे विरोधक चंद्रसेन जाधव, निंबाळकर इतकेच काय, पण कोल्हापूरचे महाराज संभाजी यांना हाताशी धरून मराठय़ांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा बाजीरावाने १७२८ च्या सुमारास पालखेड येथे निजामाला गाठून त्याचा पराभव केला. दिल्लीच्या बादशहाने निजामाला असफजहाँ ही पदवी देऊन मराठय़ांचा बंदोबस्त करण्यास पुन्हा पाठवले. तेव्हा बाजीरावाने पुन्हा भोपाळ येथे निजामाला गाठून त्याचा दणदणीत पराभव केला. यानंतर निजाम मराठय़ांच्या वाटय़ाला गेला नाही. अखेरच्या काळात निजामाच्या मुलाने बापाविरुद्ध बंड केले. पण हे बंड त्याने मोठय़ा कुशलतेने मोडले. मृत्युपूर्वी ‘मराठे लोक या देशाचे जमीनदार आहेत. त्यांच्याशी सलोख्याने वागावे,’ असा सल्ला आपल्या मुलाला दिला. असा धोरणी, थंड डोक्याचा राजकारणी, धूर्त निजाम ऊर्फ चिनकिलिजच खान ऊर्फ निजामुल्मुल्क २१ मे १७४८ रोजी मरण पावला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
चावणारे पिल्लू
हृषीकेश शाळेत पहिलीच्या वर्गात होता. त्याच्या शेजाऱ्यांनी कुत्र्याचे पिल्लू आणले होते. थोडे मोठे झालेले ते पिल्लू हृषीकेशच्या अंगावर एके दिवशी धावून आले. त्याला दूर करायला हाताने हृषीकेशने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, तसा त्या कुत्र्याने हृषीकेशचा हात तोंडात पकडला. घाबरून हृषी रडू, ओरडू लागला. हातातून रक्त यायला लागले. लोक धावले. हृषीचे बाबा आले. आई-बाबा त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. जखम मोठी नव्हती, पण इंजेक्शने व इतर उपचार करावे लागले. शाळा बुडली. हळूहळू त्याचा हात बरा झाला. तो पुन्हा शाळेत जायला लागला. काही दिवसांनी कुत्रे पाळणारे हृषीचे शेजारी अचानक काही कारणांनी तातडीने गावाला गेले. घरी त्यांचा नोकरी करणारा मुलगा होता. तो सकाळी सातला कामावर जायचा ते रात्री आठला परत यायचा. छोटे कुत्रे दिवसभर ओरडत राहिले. दारावर नखाने ओरबाडत होते. खिडकीपाशी, दारापाशी येऊन भुंकत होते. त्या दिवशी हृषीला शाळेला सुट्टी होती. त्या पिल्लाचे ओरडणे ऐकून त्याला फार वाईट वाटले. बिचारे उपाशी असेल, त्याला खूप भूक लागली असेल, असे त्याच्या मनात सारखे येऊ लागले. घरातल्या सगळय़ांच्या नजरा चुकवून त्याने पोळी आणि प्लास्टिकच्या डब्यात पाणी आणले. पोळी दाराच्या फटातून आत सरकवली. कुत्र्याचे ओरडणे जरा वेळाने थांबले. प्लास्टिकच्या डब्याला भोक पाडून त्याला दोरी बांधून ते खिडकीतून आत सोडण्याचा खटाटोप हृषी बराच वेळ करत होता. पण पाणी सांडले आणि थोडय़ा वेळात त्याला जमिनीवरचे पाणी लप्लप् करून पिल्लू पीत असल्याचा आवाज आला. कुत्र्याचे पिल्लू शांत झाले. हृषी आनंदाने घरी जाऊन खेळत बसला. बाबा आईला म्हणाले, ‘‘शेजाऱ्यांचं कुत्रं ओरडून ओरडून दमलेलं दिसतंय.’’ ‘‘म्हणूनच आता गप्प झालंय. बरं झालं. नाही तर दुपारी पंधरा मिनिटंसुद्धा झोपू दिलं नसतं मेल्यानं.’’ आई स्वयंपाकघरातलं आवरत म्हणाली. खेळत बसलेल्या हृषीला वाटलं, बरं झालं आपल्याला कुणी पाहिलं नाही. नाहीतर बाबा रागावले असते, आई ओरडली असती. या कुत्र्याच्या पिल्लाजवळ जायची सक्त बंदी होती ना त्याला!
आपल्याला अनेक वेळा इतरांकडून त्रास होतो. काही वेळा लोक जाणूनबुजून आपल्याशी वाईट वागतात. आपला विश्वासघात करतात. असे प्रसंग लक्षात ठेवून आपण त्यांच्याशी वाईट वागणे म्हणजे स्वत:ला त्रास करून घेणे असते. त्यांच्याशी आपण चांगले वागू शकलो तर स्वत:च्या नजरेत व्यक्ती म्हणून आपण चांगले ठरतो. दुष्टांशी दुष्टपणे वागणे सोपे असते. चांगुलपणाने वागणे अवघड असते. आजचा संकल्प- मी क्षमाशीलपणे वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com