Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका-रोटरी वादात मरण झाले महाग!
अनिरुद्ध भातखंडे
पनवेल नगरपलिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट

 

यांच्यातील वादामुळे पनवेलच्या स्मशानातील शवदाहिनी गेले अनेक महिने बंद अवस्थेत आहे. गॅसवर आधारित असणाऱ्या या शवदाहिनीच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्च कोणी करायचा यावरून हा वाद असून, त्यामुळे मरण महाग झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ही शवदाहिनी दुरुस्त करण्यासाठी रोटरीने पालिकेकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली असून, पालिकेने हा प्रस्ताव नाकारला आहे.
अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शेणाच्या गोवऱ्या, लाकूड आदी परंपरागत गोष्टींचा उपयोग होत होता. यासाठी अडीच ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असे, परंतु चार वर्षांंपूर्वी ओएनजीसीच्या सहकार्याने रोटरी क्लबनेही शवदाहिनी बांधून दिल्याने मृतांच्या नातेवाईकांच्या वेळेत आणि पैशांमध्ये मोठी बचत होऊ लागली. रोटरीने एका सार्वजनिक कार्यक्रमात तत्कालीन नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही शवदाहिनी पालिकेकडे सुपूर्द केली. या शवदाहिनीच्या देखभालीसाठी पालिकेत स्वतंत्र विभाग नसल्याने रोटरीनेच तिचे व्यवस्थापन करावे, असे ठरले. त्यानंतर प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी केवळ एक हजार रुपये आकारून या शवदाहिनीचे काम सुरू झाले. अल्पावधीतच या आधुनिक सोयीचा पनवेलकर उपयोग करू लागले आणि त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होऊ लागली. गॅसवर आधारित या शवदाहिनीमुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्याने पर्यावरणवाद्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते, परंतु गेल्या वर्षी या शवदाहिनीत बिघाड झाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती निर्माण झाली. या शवदाहिनीची, तसेच तिच्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी पालिकेने अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, तसेच प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी दीड हजार रुपये आकारण्याची परवानगी द्यावी, असे दोन प्रस्ताव रोटरीने नोव्हेंबर २००८ मध्ये पालिकेला पत्राद्वारे पाठविले. त्यानंतर पालिकेच्या सभेत मंजुरीसाठी हा विषय येताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत सभागृह डोक्यावर घेतले. शवदाहिनीचे व्यवस्थापन रोटरीला झेपत नसेल, तर त्यांनी ते सोडून द्यावे, परंतु सामान्य नागरिकांना त्याचा भुर्दंड नको, अशी भूमिका या सदस्यांनी घेतल्याने हे प्रस्ताव बारगळले. या दोन्ही प्रस्तावांना नकार देणारे पत्र पालिकेने त्यानंतर रोटरी क्लबला दिले. त्यामुळे निधीअभावी या शवदाहिनीची दुरुस्ती अनिश्चित काळासाठी प्रलंबित झाली आहे. शवदाहिनीच्या देखभालीसाठी पालिकेने आर्थिक तरतूद का केली नाही, तसेच या व्यवस्थापनासाठी पालिका आणि रोटरीत काही करार झाला आहे का, अशी विचारणा त्रस्त नागरिक करीत आहेत. या दोन संस्थांच्या वादात नागरिकांना नाहक भुर्दंड बसत आहे. या वादातून तोडगा निघत नसल्याने अंत्यसंस्कार करणारी ही सोयीची यंत्रणा अल्पजिवी ठरल्याचे दिसत आहे.