Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

उरण शहराला प्लास्टिक पिशव्यांचा विळखा
उरण/वार्ताहर - उरण शहराला प्लास्टिक पिशव्यांचा विळखा पडलाय. न.प.च्या

 

आवाहनानंतरही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर अद्याप तरी थांबला नसल्याने प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले, गटारे चोकअप होऊन पावसाच्या पाण्यात शहरातील काही ठिकाणी पाणी तुंबून शहरी जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
उरण शहरात सध्या कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत आहे. या प्लास्टिक पिशव्या वापरानंतर वाटेल त्या ठिकाणी फेकल्या जातात. यामुळे सांडपाणी वाहून नेणारे नाले, गटारे चोकअप होत आहेत. त्याचा त्रास नागरिकांना होतो. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिक, व्यापारी, विक्रेते यांनी थांबवावा, असे जाहीर आवाहन उरण नगर परिषदेने अनेकदा केले आहे. मात्र शहर व पर्यावरणाच्या दृष्टीनेही घातक ठरणाऱ्या पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर अद्याप तरी थांबलेला दिसत नाही. मध्यंतरी उरण नगर परिषदेने बंदी असलेल्या पिशव्या विक्रेत्यांच्याच दुकानावर धाडी टाकून हजारोंचा माल जप्त केला होता. मात्र काही नगरसेवकांनी व्यापाऱ्यांना अभय देण्यास भाग पाडल्याने अशी कारवाई अडचणीत येऊ लागली, तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबला नाही. याचे दुष्परिणाम शहरवासीयांना येत्या पावसाळ्यात भोगावे लागतील, अशीच आजची स्थिती आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णता बंदी आणण्यात उरण नगर परिषदेला अपयशच आले आहे. यामुळे शहरातील गटारे, नाले चोकअप होऊ लागले आहेत. त्यातच पावसाळ्याआधी करण्यात येणाऱ्या गटारे, नाले सफाईची कामेही आचारसंहितेच्या बडग्यामुळे पूर्णत्वास जाण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. यामुळे यावर्षीही शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.