Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

पालिका-रोटरी वादात मरण झाले महाग!
अनिरुद्ध भातखंडे
पनवेल नगरपलिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातील वादामुळे पनवेलच्या स्मशानातील शवदाहिनी गेले अनेक महिने बंद अवस्थेत आहे. गॅसवर आधारित असणाऱ्या या शवदाहिनीच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्च कोणी करायचा यावरून हा वाद असून, त्यामुळे मरण महाग झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ही शवदाहिनी दुरुस्त करण्यासाठी रोटरीने पालिकेकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली असून, पालिकेने हा प्रस्ताव नाकारला आहे.

उरण शहराला प्लास्टिक पिशव्यांचा विळखा
उरण/वार्ताहर - उरण शहराला प्लास्टिक पिशव्यांचा विळखा पडलाय. न.प.च्या आवाहनानंतरही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर अद्याप तरी थांबला नसल्याने प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले, गटारे चोकअप होऊन पावसाच्या पाण्यात शहरातील काही ठिकाणी पाणी तुंबून शहरी जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

योगसत्राचा समारोप
पनवेल - इन्स्टिटय़ूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेद व आरोग्य सेवा समिती संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या योगाभ्यास वर्गाच्या ६१ व्या सत्राचा समारोप ३१ मे रोजी पनवेलमध्ये होणार आहे. येथील के.वि. कन्या विद्यालयाच्या पुराणिक सभागृहात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडीच्या भाऊसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र पारकर यांचे व्याख्यान होणार आहे. ते ‘चतु:सूत्री- वैद्य, रुग्ण, आयुर्वेद, योग’ या विषयावर विचार मांडणार आहेत. यावेळी योगवर्गाच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत. नागरिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महामुंबई संघर्ष समितीची येत्या रविवारी बैठक
उरण/वार्ताहर - महामुंबई शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक २४ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. चिरनेर येथे संघर्ष समितीचे अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस सेवानिवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत, बी.जी. कोळसे-पाटील, विलास सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संघर्ष समितीचा संघर्ष मागील ३० वर्षांपासून सुरू आहे. सेझविरोधी लढय़ाचा यापुढील काळ खडतर होणार आहे. या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध घडामोडींचा परामर्श घेऊन शेतकऱ्यांच्या हित व अस्तित्वासाठी भविष्यात समिती आणखी सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे संघर्ष समितीची वाटचाल व चळवळीची दिशा ठरविण्यासाठी गावनिहाय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महाबँकेच्या कोपरखैरणे शाखेचे उद्घाटन
ठाणे/प्रतिनिधी - बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोपरखैरणे शाखेचे उद्घाटन बँकेचे कार्यकारी संचालक एम.जी. संघवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त विजय नाहटा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना संघवी म्हणाले की, महाराष्ट्र बँकेने यंदा आपल्या १५०० शाखा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून, नजीकच्या काळात नवी मुंबईमध्ये अजूनही काही शाखा सुरू करायच्या आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय ८७०७२ कोटी व निव्वळ नफा ३७५.१७ कोटी रुपये झाला आहे. बँकेचे ठाणे क्षेत्राचे उपमहाव्यवस्थापक उत्तम पवार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.