Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

स्वातंत्र्यानंतर ६१ वर्षांनी उजळले अहिरे गाव!
पुणे, २० मे / प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत अंधारात असलेले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीलगतचे (एनडीए) छोटेसे अहिरे गाव तब्बल बासष्ट वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उजळले आहे. रॉकेलच्या मिणमिणत्या दिव्याखाली पिढय़ानपिढय़ा जगलेल्या या गावक ऱ्यांच्या घराघरांसह पादचारी रस्त्यांवर सौरदिव्यांचा लखलखाट झाला आहे.

शहराच्या आरोग्याची काळजी हवी
मुकुंद संगोराम

पुणे शहरातील कचरा टाकला जाणाऱ्या गावाला आश्वासने देऊन कचऱ्याचा प्रश्न तात्पुरता सोडविण्यात पालिकेला यश आले असले, तरीही हा प्रश्न सुटला आहे, असे म्हणता येणार नाही. पुण्यात रोज साठणारा कचरा कोणत्यातरी जागेवर टाकून दिल्याने त्या जागेच्या परिसरातील प्रदूषण फक्त वाढत राहते. पुण्यातील सर्व सुजाण नागरिकांनी हा प्रश्न आपला प्रत्येकाचा आहे, अशा नजरेतून त्याकडे पाहायला हवे. पुण्यात जर ओला कचरा आणि सुका कचरा यांचे व्यवस्थापन सुरळीतपणे शक्य झाले, तर राज्यात आणि देशातही ते एक उदाहरण ठरू शकेल, याची जाणीव आपण सर्वानी ठेवायला हवी.

डेक्कन जिमखाना विश्वस्त मंडळाने ठोकले टपाल कार्यालयाला टाळे
पुणे, २० मे/ प्रतिनिधी

डेक्कन जिमखाना येथील टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दाराला टाळे लावण्याच्या प्रकारामुळे आज कार्यालयातील कामकाज सुमारे पाच तास ठप्प झाले होते. कार्यालयाच्या जागेची मालकी असलेल्या डेक्कन जिमखाना विश्वस्त मंडळाने हे टाळे लावले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, कार्यालयात प्रवेश करण्यासाठी दुसरेही प्रवेशद्वार असून, बंद असलेल्या प्रवेशद्वाराची चावी पोस्ट मास्तरांना देण्यात आली होती. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनीच कामकाज बंद ठेवल्याचा आरोप विश्वस्त मंडळाने केला आहे.

‘एनडीए’ यंदा होणार हाऊसफुल्ल!
पुणे, २० मे/ खास प्रतिनिधी

संरक्षण प्रशिक्षणामधील जगभरातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) यंदा ‘हाऊसफुल्ल’ होणार आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ योग्य उमेदवारांअभावी रिक्त राहणाऱ्या जागा यंदा पूर्णपणे भरणार असून लष्करामध्ये भरती होण्याबाबतची उदासीनता दूर होत असल्याचा आशावाद अधिकारीवर्गातून व्यक्त होत आहे. येत्या ३१ तारखेला ‘एनडीए’चा दीक्षान्त समारंभ होत आहे.

ससूनमध्ये रेबीज लसीचा तुटवडा
पुणे, २० मे / प्रतिनिधी

श्वानदंशावर त्वचेत देता येणाऱ्या (इंट्रा डर्मल) नव्या लसीचे पाच डोस अवघ्या तीनशे रुपयांत उपलब्ध होत असले तरी गेल्या दीड महिन्यांपासून ससून रुग्णालयात ती उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. पर्यायी औषध वापरावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त एका प्रकल्पांतर्गत श्वानदंशासाठी रेबीज लस ही त्वचेत देण्याची नवी पद्धत अवलंबिण्यात आली.

वडगावशेरीतील आघाडी आणखी वाढली असती..
पुणे, २० मे/प्रतिनिधी

वडगावशेरी मतदारसंघात काँग्रेसला २१ हजार मतांची घसघशीत आघाडी मिळाली असली, तरी ही आघाडी आणखी वाढणे सहजशक्य होते, हे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजपाला मिळालेली ३३ हजार मते हे देखील एक आश्चर्यच ठरले आहे. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा असलेला वडगाशेरी हा मतदारसंघ संमिश्र वस्तीचा आणि संमिश्र भौगोलिक भागांचा आहे.

माजी सैनिकांना मिळकत कर माफ
पुणे, २० मे / प्रतिनिधी

पुणे शहरातील माजी सैनिकांना महापालिकेचा सर्वसाधारण कर माफ करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत आज एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनाही अशाच प्रकारे करमाफी देण्याचा निर्णय सभेने घेतला.शिवसेनेचे सागर माळकर यांनी कर माफ करण्याचा हा प्रस्ताव जुलै २००८ मध्ये दिला होता.

‘‘सहारा है यादोंका तनहाईयोंमे’’
१९५२ ते १९९८ या काळात रेडिओ सिलोनवरून एक तासाचा, आठवडय़ात फक्त एकदा, बुधवारी रात्री ८.०० वाजता ‘बीनाका गीतमाला’ नावाचा भारतीय हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम सादर व्हायचा. त्या त्या काळातील लोकप्रिय गीतांची ती जणू रत्नमालाच असायची! गंमत म्हणजे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिग मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये होऊन ते सिलोनला धाडलं जायचं. बिनाका टूथ पेस्टची निर्मिता कंपनी ‘सीबा’ या कंपनीने हे व्यावसायिक धाडस केलं.

मीटर सक्तीला पिंपरीतील रिक्षाचालक अखेर तयार
पाच दिवसांत २७० रिक्षांवर कारवाई
पिंपरी, २० मे / प्रतिनिधी
मीटर पध्दत नाकारणाऱ्या २७० रिक्षाचालकांवर गेल्या आठवडाभरात कारवाई झाल्याने अखेर शहरातील रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यास राजी झाले.दरम्यान,या विषयावर उद्या(गुरुवार) वाहतूक शाखेच्या पिंपरी येथील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले. शहरातील रिक्षाचालकांवर १४ मे पासून कारवाई सुरु आहे.

परतावा जमीन आंदोलकांचा संघर्षांचा पवित्रा
प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे बांधकाम बंद पाडले
पिंपरी, २० मे / प्रतिनिधी
प्राधिकरणातील मूळच्या शेतक ऱ्यांना एकरी साडेबारा टक्के (पाच गुंठे)परतावा जमीन मिळावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतक ऱ्यांनी आज संघर्षांचा पवित्रा घेतला. सकाळी आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम शेतक ऱ्यांनी बंद पाडले. याच मागणीसाठी गेले सहा महिने प्राधिकरण कार्यालयासमोर शेतक ऱ्यांचे धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे.

‘कालचा वादळी पाऊस आमच्या भागात आलाच नाही’
पुणे, २० मे / प्रतिनिधी

पुण्यात गेले सलग तीन दिवस हुलकावणी देणारा मोठा वादळी पाऊस आज शहरात बरसला, पण काही भागांतच! आजही त्याने शहरभर विस्तृत हजेरी लावली नाही. येत्या दोन दिवसांतही पुण्याच्या परिसरात जोरदार वादळी पावसाची शक्यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे. शहरात आजसुद्धा ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सकाळपासूनच उकाडा जाणवत होता, दुपारी त्यात अधिकच वाढ झाली. शिवाय दुपारी दोन वाजल्यापासूनच आकाशात ढग दाटून आल्यामुळे अंधारलेले वातावरण होते. त्यामुळे आज सर्वच भागात मोठय़ा पावसाची अपेक्षा होता. त्यानुसार सर्वच भागात काही थेंबही पडले. त्यानंतर दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान कात्रज, बिबवेवाडी, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, वारजे, लोहगाव या परिसरात पावसाच्या मोठय़ा सरी बरसल्या. याच वेळी ढगांचा गडगडाटही सुरू होता. पण शिवाजीनगर, औंध, मध्य शहर, पुणे स्टेशन, लष्कर अशा भागात मात्र केवळ शिडकावा वगळता मोठय़ा पावसाने हुलकावणीच दिली. असेच वातावरण येत्या दोन दिवसांतही कायम असेल, असे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

‘साताऱ्यातील धरणग्रस्तांचे आंदोलन सुरूच राहणार’
पुणे, २० मे / प्रतिनिधी
सातारा जिल्हा भारमियमन मुक्त करावा, जिल्ह्य़ातील शेतीला पाणी मिळावे, शेतकरी संपूर्ण कर्ज मुक्त करावा, धरण ग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करावे. आदी मागण्यांसाठी भूमातातर्फे सुरू करण्यात आलेले आंदोलन चालूच राहणार असून, शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास येत्या जून महिन्यात मी बेमुदत उपोषण करणार आहे, असा इशारा कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
मुळीक म्हणाले की, शेतक ऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात ‘नायगाव ते अिजक्यतारा’ दरम्यान भूमाता गौरविदडी काढण्यात आली होती. शेतक ऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन तालुका दंडाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आले. मात्र २० फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या भूमाता मोहिमे दरम्यान घडलेल्या घटनांमुळे शेतक ऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आणि इतर मुद्यांना प्रसार माध्यमांनी उचलून धरले.

वीजचोरी प्रकरणी एकाला सहा महिने सक्त मजुरी
पुणे, २० मे/ प्रतिनिधी
वीजचोरी प्रकरणी रत्नागिरी शहराच्या सन्मित्रनगर भागातील आरोपीला सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा विशेष सत्र न्यायाधीश जे. एन. देशपांडे यांनी ठोठावली. अशा प्रकरणात सक्त मजुरीची शिक्षा होण्याची ही जिल्ह्य़ातील पहिलीच घटना आहे. सियाराम देवांगण याने विद्युत वाहिनीवरून हूक टाकून वीज चोरल्याची माहिती महावितरण कंपनीला मिळाली होती. सहायक अभियंता नारायण आजगावकर व कनिष्ठ अभियंता एस. एस. बोरे यांनी २२ मे रोजी देवांगणच्या झोपडीवर धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. देवांगण याच्यावर कारवाई करण्यात आली असून महावितरणाच्या वतीने अ‍ॅड. कल्पना भिडे यांनी काम पाहिले.

मोहन जोशी यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी
पुणे, २० मे/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कुठेही सहभागी न झालेले काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षाध्यक्षा व प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. पक्षाचे शहर सरचिटणीस दत्ता सागरे यांनी लेखी निवेदनाद्वारे ही मागणी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली असून पुणे लोकसभा निवडणुकीत आमदार जोशी यांनी पक्षाचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या विरोधात पत्रक काढून विरोधी पक्षास मदत केली, अशी तक्रार सागरे यांनी केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम न करणाऱ्या आणि विरोधी पक्षास मदत करणाऱ्या अशा गद्दारांना पक्षातून काढून टाका, असे सागरे यांचे म्हणणे आहे. जोशी यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार पराभूत व्हावा, यासाठीच सातत्याने प्रयत्न केले, असेही निवेदनात म्हटले आहे.

कार्यकारी अभियंता आगवणे स्कॉटलंड, स्वित्र्झलड दौऱ्यावर
पुणे, २० मे/ खास प्रतिनिधी
अंबरनाथ तालुक्यातील हाजी मलंग गड येथे उभारण्यात येणाऱ्या फ्युनिक्युलर ट्रॉली सिस्टिमची माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता आर. के. आगवणे व उपअभियंता आर. के. सरोते हे आज नॉर्वे, स्कॉटलंड व स्वित्र्झलडच्या दौऱ्यावर रवाना झाले. हाजी मलंग गड येथे उभारण्यात येणारी फ्युनिक्युलर ट्रॉली यंत्रणा देशात प्रथमच उभारण्यात येत असून बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम सुप्रीम सुयोग याशिता कन्सॉर्टियम कार्पोरेशन या फर्मला देण्यात आले असून सव्वादोन वर्षांत त्याची उभारणी पूर्ण केली जाणार आहे. या ट्रॉलीद्वारे एका वेळी १२० भाविक गडावर जाऊ शकतील तितकेच खालीही येऊ शकतील.

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कामकाजास सुरुवात
पुणे, २० मे/प्रतिनिधी

श्री सुवर्ण सहकारी बँकेच्या सर्व शाखांमधून आज इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (आयओबी) कामकाजास प्रारंभ झाला. या निमित्त बँकेच्या सर्व शाखांमध्ये विशेष कार्यक्रमाचे तसेच सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. आयओबीसंबंधीची पत्रके या वेळी ग्राहकांना वाटण्यात आली. सुवर्णच्या ज्येष्ठ खातेदारांना तसेच ठेवीदारांना आयओबीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. आज आयओबीच्या कामकाजास प्रारंभ झाल्यानंतर सुवर्णच्या खातेदारांनी आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी गर्दी केली नसल्याचे दिसून आले. सुवर्णच्या जुन्या खातेदारांनी आपण आयओबीमधील खाती यापुढे चालू ठेवणार असून, आवश्यकता भासेल त्यानुसारच पैसे काढण्यात येतील, असे सांगितले.