Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नाशिक जिल्ह्य़ाला वादळी पावसाचा तडाखा
भिंत कोसळून दोन जण दाबले गेल्याची भीती
नाशिक, २० मे / प्रतिनिधी

 

जिल्ह्य़ातील बहुतांश भागाला सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सिन्नर तालुक्यातील काही भागात गारपिट झाली तर इगतपुरी, येवला, दिंडोरी तालुक्यासह नाशिक शहरात अर्धा तास पावसाचा जोर कायम होता. घोटी-सिन्नर रस्त्यावर बंधन मंगल कार्यालयाची भिंत कोसळून दोन जण दाबले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून या घटनेत १५ ते २० जण जखमी झाले.
जिल्ह्य़ात सलग तीन दिवस ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी विजांचा गडगडाट सुरू होवून वादळी वारा वाहू लागला. काही वेळातच पावसाला सुरूवात झाली. सिन्नर, येवला व इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. सिन्नर तालुक्यातील काही भागात गारपिट झाली. पावसामुळे उघडय़ावर ठेवलेल्या व चाळीतील कांद्याचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही गावांमधील वीज पुरवठा खंडीत झाला. बुधवार ही लग्नाची दाट तिथी होती. उन्हाळ्यामुळे गोरज मुहूर्तावर आयोजिलेल्या लग्नांमध्ये अचानक आलेल्या पावसाने वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडविली. घोटी- सिन्नर रस्त्यावर बंधन मंगल कार्यालयात भिंत कोसळण्याचा प्रकार घडला. त्याखाली दोन जण दाबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भिंतीचे दगड अंगावर पडून १५ ते २० जण जखमी झाले. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आदल्या दिवशी येवला तालुक्यात पावसाने दाणादाण उडवली असताना त्याचा तडाखा दुसऱ्या दिवशी कायम राहिला. एरंडगावी चाळ कोसळून कांद्याचे नुकसान झाले. अंदरसूल परिसरात २० ते २५ झाडे उन्मळून पडली. वाऱ्यामुळे वीज वाहिनीचे खांब उखडले गेल्याने वीज पुरवठय़ावर परिणाम झाला.