Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करावा; कृषी बियाणे विक्रेत्यांची मागणी
जळगाव, २० मे / वार्ताहर

 

राशी-२ या बीटी कापूस बियाणाच्या विक्रीबाबत चुकीचे नियोजन करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा विरोध तसेच पारोळा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्य़ातील बियाणे विक्रेत्यांनी दोन दिवस बंद पुकारला. या सर्व परिस्थितीस जिल्हधिकारीच जबाबदार असल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणीही विक्रेत्यांनी केली असून शासन जोपर्यंत बियाणे विक्रीच्या अटींमध्ये शिथीलता आणत नाही, तोपर्यंत दुकाने सुरू करू नये, असे मत येथे व्यापाऱ्यांच्या जिल्हा बैठकीत व्यक्त करण्यात आले.
जळगाव जिल्हा सिडस् फर्टिलायझर व पेस्टीसाइड डिलर्स असोसिएशनची बैठक अध्यक्ष ललित लोडाया यांच्या उपस्थितीत शहरात झाली. राशी-२ या बीटी कापूस बियाणे विक्रीवरून जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला विरोध दर्शवून पारोळा येथील दंगलीच्या घटनेत व्यापाऱ्यांविरूध्द झालेली कारवाई व त्यांचे झालेले प्रचंड आर्थिक नुकसान याविरुद्ध दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बियाणे हे जीवनावश्यक वस्तुंच्या कायद्यात येत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दुकाने बंदच ठेवण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला.
बियाणे विक्रीच्या बाबतीत पारोळ्यासह जिल्ह्य़ात जे प्रकार घडले त्याला जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णयच कारणीभूत असल्याने बियाणांचा पुरवठा कमी व मागणी जास्त झाली म्हणून गैरप्रकार झाल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. राशी बियाणांची विक्री सरकारनेच करावी, अन्य बियाणे विकण्यास आम्ही तयार असल्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
राशी-२ बियाणे विक्रीतील गैरप्रकार माहीत असल्याने जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पारोळा घटनेनंतर जिल्ह्य़ातील सुमारे दीड हजारावर बियाणे विक्रीची दुकाने बंदच आहेत.