Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

गुहागरच्या पर्यटनस्थळांची पर्यटकांना भुरळ
धीरज वाटेकर
चिपळूण, २० मे

 

गुहागर तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील पुरातन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी, नारळी-पोफळीच्या बागा यांनी नटलेल्या तालुक्याला पर्यटनाचा दर्जा असून, येथील निसर्गसौंदर्यावर येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पडली आहे. फार्महाऊस उभारण्याकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे.
फार्महाऊस म्हणजे शेतघर. उंच-उंच इमारती, बंगले या फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारे मुंबई-पुण्यातले पर्यटक शहराकडून ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत. कारण खरा निसर्ग हा ग्रामीण भागातच असतो. त्यामुळे निसर्गसौंदर्य पाहून पर्यटक भाळल्याशिवाय राहात नाहीत. वेळणेश्वर हे पर्यटन क्षेत्र आहे. ते पाहिल्यावर दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. अनेक पर्यटक हॉटेल, लॉजिंगवर राहण्यापेक्षा घरगुती स्वरूपात खाणे, राहणे पसंत करतात. पर्यटकांची ही आवड ओळखून तशी सोयही केली जाते.
पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक कायम वास्तव्य करण्याच्या अथवा त्यांच्या वेळेनुसार येण्याच्या इच्छेने निसर्गरम्य ठिकाणी एखादी जागा खरेदी करून फार्महाऊस उभारतात. नोकरी व कामधंद्यानिमित्त शहरामध्ये असल्याने अशा पर्यटकांना गरज असते ती शांत विश्रांतीची, मानसिक समाधानाची. त्यातच शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडी उसंत मिळण्याची. यामुळे निसर्गसान्निध्यात आपले छोटेसे घर असावे, जेथे आपण हक्काने सुट्टीच्या काळात अथवा इतर वेळी एन्जॉय करू शकू, या उद्दिष्टाने सध्या पर्यटक जमीन खरेदी करून आपले टुमदार घर उभारत आहेत. त्यामुळे वेळणेश्वरसारख्या निसर्गरम्य परिसरात जागेच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. एकूणच तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढला असून, घर बांधण्याचे स्वप्न पर्यटक सत्यात उतरवीत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
आंबा उत्पादनात घट
दरम्यान, तालुक्यात यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे येथील बागायतदार हवालदिल झाले आहेत. गुहागर तालुक्यातून प्रतिवर्षी काही लाख टन आंबा इतर ठिकाणी निर्यात होतो. नंबर एकचा माल मोठे व्यापारी खरेदी करतात, तर कमी प्रतीचा माल कॅनिंगला किलोवर विकला जातो, परंतु दरवर्षी उन्हाळी हंगामामध्ये होणारे आंबा उत्पादन उन्हाळा संपत आला तरी पुरेसा आंबा मिळत नसल्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. मे महिन्याचा चौथा आठवडा आला तरी बाजारामध्ये आंबा पुरेशा प्रमाणात न आल्याने सर्वसामान्य जनतेला रत्नागिरी हापूसची चव चाखायला मिळणे कठीण झाले आहे. अतिवृष्टीपासून आंब्याला धोका पोहोचू नये यासाठी बागायतदारांनी संरक्षणार्थ आंब्यावर प्लास्टिक टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता, मात्र जोरदार पाऊस पडल्याने मोहर खराब होऊन गळून पडला. अशा स्थितीत उरलेल्या मोहराचे संरक्षण करून त्याचे उत्पन्न पदरात पाडून घेता येईल, असा विचार करून जंतूनाशके, कीटकनाशके यांचा वापर करून बागायतदारांनी मोहर वाचविला.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर प्रतिवर्षी आंबा बागायतदार शेवटच्या उपऱ्याचा माल काढतो, मात्र यावर्षी पहिल्या उपऱ्याचा माल अजून हाताला लागलेला नाही, असे अनेक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामुळे आंब्याच्या पेटीला चांगला दर प्राप्त होत नाही, अशी खंत बागायतदारांनी व्यक्त केली आहे. बाजारात आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी बागायतदार प्रयत्नात असून, एक डझन आंब्याला २५० ते ३०० रुपये दर सांगितला जात असला, तरी प्रत्यक्षात एवढा दर पदरात पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. अजूनही तालुक्यातील अनेक आंबा कलमांवर फळांची वाढ पूर्णपणे झालेली नसून कैरी स्वरूपात आंबा मोठय़ा प्रमाणावर शिल्लक आहे. त्यामुळे ही मोठी समस्या बागायतदारांसमोर असून, यावर्षीही बागायतदारांच्या नुकसानभरपाईची मागणी तालुक्यातील बागायतदारांनी व्यक्त केली आहे.