Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

बिडवागळे पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे?
मोठय़ा आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता
अलिबाग, २० मे/ प्रतिनिधी

 

तालुक्यातील बिडवागळे येथे प्रस्तावित पाझर तलावाच्या बांधकामास काम गतवर्षी सुरूवात झाली. बांधकाम तांत्रिकदृष्टया न करता बेसुमार भराव करून पाणी निचऱ्याची व्यवस्था केली नसल्यामुळे गेल्या वर्षी जून महिन्यात या तलावास भेगा पडल्या आणि त्याचा परिणाम तलावाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर पाझरण्यात झाला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या ३ ते ४ कोटी रुपयांच्या निधीचा मोठा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार बिडवागळे ग्रामविकास आघाडीचे एम् ए़ पवार, आऱ पी़ जोशी़ , एम् एस़ बेंद्रे आदिंनी केली आहे.
पाझर तलावाच्या ‘जॅक वेल’मधून पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेले पाईप चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे तलावातील सर्व पाणी या पाईपखालून वाहून गेले आह़े पाईपाच्या गळतीचे काम करण्यासाठी ‘जॅक वेल’ जवळ धरणाची सुमारे अर्धी भिंत पुन्हा उघडी करुन शेकडो गोणी सिमेंटचे पाणी यामध्ये सोडण्याचे काम सध्या आहे. हे ही काम अंदाजपंचेच करण्यात येत असल्याने गळती थांबेल, याची शाश्वती नाही़ यामुळे शासनाच्या ३ ते ४ कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचा आरोप आघाडीचा आह़े
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता श्री . कुदळे यांच्या देखरेखीखाली हे काम होत आह़े परंतु या अधिकाऱ्यांनी याकामी दुर्लक्ष केल्यामुळे तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आह़े तरी या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात गेल्या १७ मार्च रोजी लेखी तक्रार जिल्हा परिषदेकडे केली होती़ परंतु या तक्रारीवर गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.