Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

संगीत दिग्गजांना सावंतवाडीत आदरांजली
सावंतवाडी, २० मे/वार्ताहर

 

सावंतवाडी संगीत मित्र मंडळाने आठवणीतील गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करून संगीत क्षेत्रातील दिग्गजांना श्रद्धांजली वाहिली. संगीत क्षेत्रात स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे गजानन वाटवे, राम फाटक, दशरथ पुजारी आणि अशोकजी परांजपे या दिवंगत गायक, गीतकार, संगीतकारांना गायन कार्यक्रमाने श्रद्धांजली वाहिली.
भावगीत गायनात आपला वेगळा ठसा उमटवणारे स्व. गजानन वाटवे यांची ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळेल जुगार’, ‘कुणीही पाय नका वाजवू’, ‘मैत्रिणीनो सांगू नका नाव घ्यायला’ ही लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.
दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली तसेच त्यांनी गायलेली ‘अजून त्या झुडुपांच्या मागे’, ‘तुला ते आठवेल सारे’, ‘आकाश पांघरोनी जग शांत झोपले’, ‘मृदुल करांनी छेडीत तारा’ ही भावगीते-प्रेमगीते सादर करण्यात आली.
लोककलेचे गाढे अभ्यासक आणि हळुवार मनाचे सुजाण कवी कै. अशोकजी परांजपे यांची रचना असलेली ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘केतकीच्या बनी तिथे’ ही गीते सादर करण्यात आली. पुणे रेडिओ स्टेशनचे संगीतकार स्व. राम फाटक यांची ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘संत भार पंढरीत’ ही भक्तीगीते, ‘तपत्या झळा उन्हाच्या’, ‘मन लोभले मन मोहले’ ह भावगीते सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात श्रीपाद चोडणकर, किरण सिद्धये, स्नेहा वझे, भाग्यश्री कशाळीकर, सोनल वेरकर, मुग्धा सौदागर, अपूर्वा सौदागर, केदार म्हसकर यांनी गीते सादर केली. त्यांना संगीतसाथ बंडय़ा धारगळकर, सुरेश मेस्त्री, उमेश पाटकर यांनी, तर निवेदक म्हणून अक्षय वाटवे यांनी जबाबदारी सांभाळली.