Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अपघातप्रवण क्षेत्रातील गावे संगमेश्वर पोलीस ठाण्याला जोडण्याची मागणी
संगमेश्वर, २० मे/वार्ताहर

 

संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या गावांचा समावेश नाही, परंतु प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या मदतीच्या दृष्टीने ती या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणे गरजेचे आहे, अशा गावांचा समावेश संगमेश्वरमध्ये करण्याची गरज अनेक अपघातांप्रसंगी स्पष्ट झाली आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याची हद्द गोव्याच्या दिशेने गावमळा या गावापर्यंत, तर मुंबईच्या दिशेने आरवलीपर्यंत आहे आणि प्रत्यक्षात या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र आरवली ते बाव नदी असे आहे. गावमळा ते बाव नदी यादरम्यानची सर्व गावे देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोडलेली असल्याने भौगोलिकदृष्टय़ा ते अडचणीचे ठरत असल्याचे आजवर अनेकदा स्पष्ट झाले आहे.
अपघातप्रवण क्षेत्रात गावमळा ते बाव नदीदरम्यान अपघात घडल्यानंतर साहजिकच याचे प्रथम वृत्त संगमेश्वर पोलीस ठाण्याला कळविले जाते. अशा गंभीर प्रसंगी हे क्षेत्र आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगणे. संयुक्तिक नसल्याने या पोलीस ठाण्याचा फौजफाटा जखमींच्या मदतीसाठी जातो. देवरुख येथून पोलीस कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत लांबपल्ल्याच्या अंतरामुळे विलंब लागत असल्याने एकाच कामावर प्रथम संगमेश्वर व त्यानंतर देवरुख पोलीस ठाणे अशी दुहेरी शक्ती खर्च होते.
देवरुख येथे अपघाताचे वृत्त कळण्यास विलंब लागतो. त्यानंतर ही हद्द ज्या कर्मचाऱ्याकडे आहे, त्याच्याकडे अन्य कर्मचारी मदतीला देऊन हे काम सोपवावे लागते. देवरुख ते बाव नदी हा प्रवास वाहनाशिवाय करणे शक्य नसते. अशा वेळी पोलीस ठाण्याचे वाहन उपलब्ध असेलच असे सांगता येत नाही, त्यामळे अशा अनेक कारणांनी देवरुख पोलीस अपघातस्थळी पोहोचण्यास विलंब होतो व कर्मचाऱ्यांवर नाहक उपस्थितांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येते. गावमळा गावाच्या पुढील कोळंबे, सोनगिरी, आंबेड बुद्रुक, मानसकोंड, वांद्री, सप्तलिंगी, तळेकान्टे ही गावे सातत्याने अपघात घडणारी आहेत. देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या सर्व गावांचा समावेश संगमेश्वर पोलीस ठाण्यात करावा व त्याऐवजी वाशी पट्टय़ातील तेवढीच गावे देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीला जोडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावांची ही अदलाबदल दोन्ही पोलीस ठाण्यांना भौगोलिकदृष्टय़ा शक्य व सोपी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.