Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

निलंबनाच्या कारवाईवरून ‘क्रिमिका ब्रेड’ कंपनीतील कामगारांत असंतोष
खोपोली, २० मे/वार्ताहर

 

रायगड जिल्हा कामगार क्रांती संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारून नव्या संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या शहा बेक्टर अ‍ॅण्ड सन्स व रस फूड्स प्रा. लि. कंपनीतील आठ कामगारांना व्यवस्थापनाने खोटीनाटी कारणे पुढे करून निलंबित केल्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. दोन युनियनच्या वादातून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खोपोली पोलिसांनी कारखाना परिसरात बंदोबस्त वाढविला आहे.
खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत ढेकू परिसरात एकाच कम्पाऊंडमध्ये शहा बेक्टर अ‍ॅण्ड सन्स प्रा. लि. (क्रिमिका ब्रेड) व रस फूड्स प्रा. लि. या दोन कंपन्या कार्यरत आहेत. दोन्ही कंपन्यांमध्ये मिळून ९२ कायम कामगार व सुमारे ३५० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. कामगार नेते विजय मिरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही ठिकाणी कार्यरत असलेल्या रायगड जिल्हा कामगार क्रांती संघटनेला ९२ कायम कामगारांपैकी ७२ कामगारांनी रामराम ठोकून ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष मनीष खवळे व खालापूर तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदस्य स्वीकारले. म. न. का. सेनेचे कार्याध्यक्ष शरद सावंत, सचिव भाई पेडणेकर, संजय घाडी यांनी व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून, बहुमताचा आदर करावा आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी व वेतनवाढीच्या करारासंदर्भात बोलण्यासाठी संघटनेला परवानगी द्यावी, अशी विनंती केली. रायगड जिल्हा कामगार क्रांती संघटना ही कायदेशीर मान्यताप्राप्त केलेली युनियन असल्याचे कारण पुढे करून नव्या संघटनेशी बोलण्यास व्यवस्थापनाने नकार दिला. दरम्यान, व्यवस्थापनाने नव्या युनियनचे नेतृत्व करणारे कामगार प्रतिनिधी रोहिदास हडप, जितेंद्र येरुणकर, श्रीधर देशमुख, दिलीप पाटील, मंगेश आजिवले, प्रकाश मढवी, अनिल वाजे, अजित बेडेकर यांना ११ मेपासून कामगारांना चिथावणी देत असल्याच्या आरोपाखाली निलंबित केले आहे.
कामगारांनी नवीन संघटनेपासून दूर व्हावे व अर्थपूर्ण संवाद साधून खिशात घातलेल्या जुन्या युनियनमध्येच राहावे, अशी इच्छा धूर्त व्यवस्थापनाची आहे. म्हणूनच व्यवस्थापनाने आमच्या संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या निरपराध कामगार प्रतिनिधींना आकसापोटी निलंबित केले आहे. नव्या युनियनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ढेकू गावातील कामगारांवर कारवाई न करता बाहेरून येणाऱ्या कामगार प्रतिनिधींना निलंबित करून, नव्या युनियनमध्ये दुफळी पसरविण्याचाही प्रयत्न व्यवस्थापनाने केला, पण संघटित कामगारांनी तो हाणून पाडला आहे. आमच्या सदस्यांमध्ये दहशत पसरविण्यासाठी मारेकरी पाठविले जात आहेत, असा आरोप ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष मनीष खवळे यांनी केला आहे. उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ न देता आमच्या संघटनेचे सदस्य न्याय्य हक्काची मागणी करीत आहेत. संघटना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार असून सहाय्यक कामगार आयुक्तांचेही मार्गदर्शन घेणार आहे. व्यवस्थापनाने निलंबित कामगारांना कामावर घेऊन चौकशी करावी व खऱ्या अर्थाने दोषी आढळून आल्यास त्यांना जरूर शासन करावे. बहुमताचा आदर राखून नव्या युनियनशी बोलणी करावी, ही आमची मागणी आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी २१ मे ते १० जूनपर्यंत कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत. प्रसंगी न्याय्य हक्कासाठी संघटना तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही जिल्हाध्यक्ष खवळे व तालुकाध्यक्ष पिंगळे यांनी दिला आहे.