Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अपघाताचा बनाव करून सैनिकाने केली पत्नीची हत्या
महाड, २० मे/वार्ताहर

 

तालुक्यातील खर्डी या गावामध्ये सैन्यदलात नोकरी करणाऱ्या तरुण सैनिकाने आपल्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवून तिची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून, महाड तालुका पोलिसांनी ‘त्या’ सैनिकाला अटक केली आहे.
प्रशांत महाडिक हा तरुण सैनिक रविवारी रात्री आपली पत्नी पूजा हिला बरोबर घेऊन महाडकडे जात असताना महाड ते किल्ले रायगड मार्गावरील चापगाव पुलावर आल्यानंतर एका अज्ञात वाहनाने आपल्या मोटार सायकलला जोराने धडक दिली, अशी बतावणी करून वाहनाची धडक बसल्याने पूजा गाडीवरून पुलाच्या खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाल्याचे प्रशांतने महाड तालुका पोलिसांना कळविले. पोलिसांनीही अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली. नंतर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिचा अंत्यविधीही घाईघाईने उरकण्यात आला.
महाड विभागीय पोलीस अधिकारी मधुकर कुरणे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र गावंड यांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, पूजाचा मृत्यू अपघाताने झाला नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा त्यांना संशय आला. सखोल चौकशी केल्यानंतर प्रशांतनेही आपण पूजाची हत्या केली असल्याचा कबुली जबाब पोलिसांना दिला.
अज्ञात वाहानाची ठोकर मोटार सायकलला बसल्यानंतर पूजा वरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला असल्याचे आरोपीने सांगितले होते, परंतु घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी अपघात झाल्याचा सबळ पुरावा त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आला नाही. त्याचप्रमाणे ज्या अज्ञात वाहनाने ठोकर मारली, त्याची माहिती देण्यास आरोपी असमर्थ ठरला. प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून येत होती. त्यामुळे महाडिकवर संशय बळावला आणि हा अपघात नसून, हत्या करण्यात आली असल्याचा ठाम निष्कर्ष काढण्यात आला. आरोपीने दिलेला जबाब आणि घटनास्थळावरील पुरावे यामध्ये फरक असल्याचे आढळून आले आणि प्रशांतची सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीच्या चारित्र्याचा संशय आल्याने आपण तिची हत्या केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे कुरणे यांनी सांगितले. याप्रकरणी प्रशांत महाडिक याला अटक करण्यात आली आहे .