Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

राज्य

नाशिक जिल्ह्य़ाला वादळी पावसाचा तडाखा
भिंत कोसळून दोन जण दाबले गेल्याची भीती
नाशिक, २० मे / प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील बहुतांश भागाला सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सिन्नर तालुक्यातील काही भागात गारपिट झाली तर इगतपुरी, येवला, दिंडोरी तालुक्यासह नाशिक शहरात अर्धा तास पावसाचा जोर कायम होता. घोटी-सिन्नर रस्त्यावर बंधन मंगल कार्यालयाची भिंत कोसळून दोन जण दाबले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून या घटनेत १५ ते २० जण जखमी झाले.

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करावा; कृषी बियाणे विक्रेत्यांची मागणी
जळगाव, २० मे / वार्ताहर
राशी-२ या बीटी कापूस बियाणाच्या विक्रीबाबत चुकीचे नियोजन करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा विरोध तसेच पारोळा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्य़ातील बियाणे विक्रेत्यांनी दोन दिवस बंद पुकारला. या सर्व परिस्थितीस जिल्हधिकारीच जबाबदार असल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणीही विक्रेत्यांनी केली असून शासन जोपर्यंत बियाणे विक्रीच्या अटींमध्ये शिथीलता आणत नाही, तोपर्यंत दुकाने सुरू करू नये, असे मत येथे व्यापाऱ्यांच्या जिल्हा बैठकीत व्यक्त करण्यात आले.

गुहागरच्या पर्यटनस्थळांची पर्यटकांना भुरळ
धीरज वाटेकर
चिपळूण, २० मे

गुहागर तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील पुरातन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी, नारळी-पोफळीच्या बागा यांनी नटलेल्या तालुक्याला पर्यटनाचा दर्जा असून, येथील निसर्गसौंदर्यावर येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पडली आहे. फार्महाऊस उभारण्याकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. फार्महाऊस म्हणजे शेतघर. उंच-उंच इमारती, बंगले या फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारे मुंबई-पुण्यातले पर्यटक शहराकडून ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत.

बिडवागळे पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे?
मोठय़ा आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता
अलिबाग, २० मे/ प्रतिनिधी
तालुक्यातील बिडवागळे येथे प्रस्तावित पाझर तलावाच्या बांधकामास काम गतवर्षी सुरूवात झाली. बांधकाम तांत्रिकदृष्टया न करता बेसुमार भराव करून पाणी निचऱ्याची व्यवस्था केली नसल्यामुळे गेल्या वर्षी जून महिन्यात या तलावास भेगा पडल्या आणि त्याचा परिणाम तलावाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर पाझरण्यात झाला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात मालिका सुरूच
संगमेश्वर, २० मे/वार्ताहर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर व आंबेड बुद्रुक या ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी कोसळलेल्या रिमझिम पावसामुळे हे अपघात घडले. संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळून मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो जीपचालक राजू याचा जीपवरील ताबा सुटून जीप ५० फूट खोल दरीत कोसळली. जीपमध्ये आणखी दोन प्रवासी होते, मात्र ते किरकोळ जखमी होण्यावर निभावले. जीपचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरा अपघात आंबेड बुद्रुक येथे घडला. यामध्ये मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी इंडिका कार रस्त्याच्या बाजूकडील झाडावर वेगाने आदळली. त्यामध्ये कारचालक प्रशांत वसंत मयेकर याला किरकोळ दुखापत झाली आहे.

मोटारसायकलस्वाराचा अपघाती मृत्यू
खोपोली, २० मे/वार्ताहर
पुण्याहून वाशी येथे लग्नासाठी निघालेल्या मोटारसायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्घटना आज सकाळी बोरघाटात घडली. विक्रम उतेकर (४२, रा. दापोडी, पुणे) व त्यांचे मेव्हणे भरत पवार हीरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरून वाशीकडे मार्गक्रमणा करीत होते. आडोशी बोगद्यात पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा मोटारसायकलच्या हँडलला धक्का बसला. मोटारसायकल चालविणारे उतेकर गाडीवरील ताबा सुटल्यामुळे खाली कोसळले. त्याचवेळी मागचा अज्ञात ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्यामुळे ते जागीच ठार झाले. मेव्हणे पवार यांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्यामुळे सुदैवाने ते बचावले. ल्ल

गोळवली येथे आज संपन्न होणार
सामुदायिक विवाह सोहळा
संगमेश्वर, २० मे/वार्ताहर
सध्याच्या महागाईच्या काळात विवाह सोहळा पार पाडायचा म्हटले, तर सर्वसामान्य कुटुंबातील वधू अथवा वर पित्याला कर्जबाजारीच व्हावे लागते. विवाह सोहळा प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरीच संपन्न व्हावा, असे वाटत असते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील विश्वकर्मा लोहार समाजाने तंटामुक्त गाव अभियानातून प्रेरणा घेऊन उद्या (२१ मे रोजी) गोळवली, ता. संगमेश्वर येथे शासनाच्या सहकार्याने १० जोडण्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक जोडप्याला शासनाकडून १० हजारांचे मणीमंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत. याच बरोबर प्रतिजोडपे येणारा स्वतंत्र विवाहाचा सुमारे १२ लाखांचा खर्च या सामुदायिक विवाहसोहळ्यामुळे वाचणार आहे.सामुदायिक विवाहसोहळ्यामध्ये प्रत्येक जोडप्याकडून नोंदणीसाठी दोन हजार एवढी नाममात्र रक्कम घेतली जाणार असून, विवाहस्थळी होणारा सर्व खर्च संस्थेतर्फे केला जाणार आहे. गोळवली टप्पा (लोहारवाडी) येथे हा सामुदायिक विवाह सोहळा १२ वा. ३५ मि. संपन्न होणार आहे.

बावनदी धरणाला ग्रामस्थांचा विरोध;पाणीपुरवठा बंद झाल्याने संताप
देवरुख, २० मे/वार्ताहर

देवरुख-रत्नागिरी मार्गावरील बावनदीवर धरणाचे काम सुरू असून, या कामामुळे गढूळ झालेले नदीपात्र आणि तळेकांटे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जॅकवेलमधील पाणी बंद झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या धरणाविरोधात एकवटण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली असून, दूषित पाण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या जिंदाल प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने बावनदीवर धरण बांधले जात आहे. धरणासाठी १५ ते २० फूट खोल काँक्रीट करण्यात आल्याने जॅकवेलमध्ये येणारे पाणी बंद झाले आहे. यामुळे तळेकांटे गावास होणारा पाणीपुरवठा अडचणीत आला आहे. धरणामुळे साठणारा गाळ व संभाव्य पुराचा धोका विचारात घेऊन बावनदी परिसरातील रहिवाशांनी नियोजित धरणाच्या विरोधी भूमिका घेतली आहे.

महामार्गावरील दोन अपघातांत तीन ठार
संगमेश्वर, २० मे/वार्ताहर

संगमेश्वरजवळील अपघातप्रवण क्षेत्रात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन प्रवासी ठार झाले असून, सहा जण जखमी झाले आहेत. यातील एक अपघात आरवली येथे, तर दुसरा मानसकोंड येथे घडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. १६ मे रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास जैतापूरहून मुंबईला जाणारी आरामबस चालक जितेंद्र तावरे भरधाव वेगाने घेऊन जात असताना या बसने आरवली मारुती मंदिर येथील अवघड वळणावर समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यामध्ये आयशरचालक गफूर महंमद अब्दुल शेख जागीच ठार झाला. दुसरा अपघात संगमेश्वरनजीक मानसकोंड येथे घडला. दहिसर येथून मालगुंडकडे जाणारी भरधाव वेगातील मारुती कार घेऊन मिलिंद गडकरी (४८, रा. दहिसर) हे मानसकोंडजवळ आले असता, त्यांचा ताबा सुटला व कार खड्डय़ात कोसळली. या अपघातात गीता मिलिंद गडकरी (३४) व रमेश गोविंद पटवर्धन (६५, रा. दहिसर) हे जागीच ठार झाले, तर मिलिंद हे गंभीर जखमी झाले असून, स्मिता रमेश पटवर्धन (६०) व आदित्य गडकरी (नऊ) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.