Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

क्रीडा

अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात ब्रेट ली, टसनचा समावेश
सिडनी, २० मे / पीटीआय

वादग्रस्त खेळाडू अ‍ॅण्ड्रय़ू सायमंडसला आज बाहेरचा रस्ता दाखवत अ‍ॅशेस क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात अष्टपैलू खेळाडू शेन वॅटसनचा समावेश करण्यात आला आहे. संघाची सूत्रे रिकी पॉन्टींगकडेच सोपवण्यात आली आहेत. या मालिकेसाठी अ‍ॅण्ड्रय़ू हिल्डीच अध्यक्ष असलेल्या निवड समितीने ब्रेट ली, स्टय़ुअर्ट क्लर्क यांना १६ जणांच्या संघात स्थान दिले आहे.

सायमन्ड्सविनाही अ‍ॅशेस मालिकाजिंकण्याचा पॉन्टीगचा निर्धार
सिडनी, २० मे / पीटीआय
आघाडीचा फलंदाज अ‍ॅण्ड्रय़ू सायमंडस संघात नसला तरी अ‍ॅशेस मालिका जिंकण्याची क्षमता आमच्यात आहे, असा आत्मविश्वास ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार रिकी पॉन्टीग याने व्यक्त केला आहे. दुखापतीने त्रस्त झालेल्या शेन वॅटसनची सायमंडसच्या जागी राष्ट्रीय संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या जूनपासून अ‍ॅशेस मालिका सुरू होणार आहे.

विजेत्यांची गत
राजस्थानविरुद्ध कोलकाताची सरशी
दरबान, २० मे / वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी -२० स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या अखेरच्या सामन्यात विजय साजरा करून गतविजेत्या राजस्थान रॉयल्स संघाला स्पर्धेबाहेर फेकण्याची करामत करून दाखविली. गेल्या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या राजस्थानची आज अगदी वाईट गत झाली. प्रथम फलंदाजी करताना कशाबशा १०१ धावा करणाऱ्या राजस्थानला कोलकाताने लक्ष्मीरतन शुक्ला (४८) आणि अजित आगरकर (१३) यांच्या ५६ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे चार विकेट्सनी पराभूत केले.

शेवट गोड करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न
सेंच्युरियन, २० मे/ पीटीआय

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन्हीही संघासाठी उद्याची लढत उपान्त्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने निर्थक समजली जात असली तरी साखळी फेरीचा शेवट गोड करण्यासाठी दोन्हीही संघ प्रयत्नशील असतील. वीरूच्या दिल्ली संघाने उपान्त्य फेरीतील स्थान आधीच पक्के केले आहे. तर मुंबईला हा सामना जिंकून उपान्त्य फेरीत पोहोचता येणार नसले तरीही सचिन विरूद्ध सेहवाग ही लढत पाहण्यासाठी सारेजण आतूर असतील.

ही र्शयत रे सेमीची..
आज डेक्कन आणि बंगलोर भिडणार
प्रिटोरिया, २० मे/ पीटीआय

डेक्कन चार्जर्स आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स या दोन्हीही संघामध्ये उद्या र्शयत रंगेल ती सेमी फायनलमध्ये पोहोचायची. दोन्हीही संघांचे १३ सामन्यांमध्ये ७ गुणांसह १४ गुण असून जो संघ सामना जिंकेल त्यालाच उपान्त्य फेरी गाठता येईल. बंगळुरूने गतविजेत्या राजस्थान रॉयलला सलामीलाच पराभूत करून सर्वानात जबरदस्त धक्का दिला होता.

राजकारणापेक्षा बुद्धिबळच श्रेष्ठ - रोहिणी खाडिलकर
प्रबोधन आंतरराष्ट्रीय ‘फिडे’ रेटिंग बुद्धिबळ सुरू
मुंबई, २० मे / क्री. प्र.
राजकारणापेक्षा आमचा खेळ निश्चितपणे श्रेष्ठ आहे. येथे स्वबळावर विजय मिळवावा लागत असल्याने खरा आनंद जिंकणाऱ्याला मिळतो. त्या आनंदाची गोडीच वेगळी असते. राजकारणामध्ये बहुतांशपणे विजेत्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते. जिंकणा’ऱ्याच्या पाठीमागे कोणीतरी असावे लागते. कोणाचा तरी प्रभाव किंवा करिष्मा असला तरच चॅम्पियन बनता येते. मात्र बुद्धिबळामध्ये जो खराखुरा चॅम्पियन असतो तोच नेहमी विजयी होतो.

वरळी-गोरेगाव संघांची सावध सुरुवात
कल्पेश कोळी क्रिकेट
मुंबई, २० मे / क्री. प्र.
न्यू हिंद स्पोर्टिग क्लब आयोजित आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व न्यू इंडिया इन्शुरन्स पुरस्कृत १९ व्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीच्या पहिल्या दिवशी बलाढय़ वांद्रे केंद्रासमोर खेळताना गोरेगाव केंद्राच्या सतीश नायर (५८) व करण वसोडिया (५५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारीच्या जोरावर २ बाद ११९ अशा स्थितीत नेले.

चेन्नई उपान्त्य फेरीत
दरबान, २० मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्लीपाठोपाठ उपान्त्य फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणून चेन्नईने बाजी मारली. किंग्ज इलेव्हन पंजाबवर त्यांनी २४ धावांनी मात करीत उपान्त्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. गेल्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ११६ धावा केल्या पण ही धावसंख्या पंजाबला पेलविली नाही. त्यांचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होते गेले आणि २० षटकांत ८ फलंदाज गमावून त्यांना केवळ ९२ धावा करता आल्या. चेन्नईतर्फे पार्थिव पटेलने ३२, रैनाने २० धावा केल्या. रैनाने गोलंदाजीतही चमक दाखविताना ४ षटकांत १७ धावा देत २ बळी घेतले. पंजाबचा केवळ पोमेर्सबॅचचा २६ व इरफान पठाणचा १४ धावांचा अपवाद वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. गेल्या वर्षी उपान्त्य फेरीत प्रवेश करणाऱ्या पंजाबला यावेळी मात्र या संधीला मुकावे लागण्याची शक्यता आहे. पंजाबला आता उद्या होणाऱ्या बंगलोर व डेक्कन चार्जर्स यांच्या लढतीवर लक्ष ठेवावे लागेल. बंगलोरचा या लढतीत पराभव झाल्यास धावगतीवरून पंजाबचे उपान्त्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

कोकेनच्या स्मगलिंगसाठी ख्रिस लुईसला १३ वर्षांची शिक्षा
लंडन, २० मे / ए. एफ. पी.

क्रिकेट किट बॅगमधून कोकेनचे स्मगलिंग केल्याच्या आरोपावरून इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज ख्रिस लुईस याला १३ वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडनजवळील क्रॉयडॉन क्राऊन कोर्टच्या न्यायमूर्तीनी लुईसला व्हेजिटेबल ज्यूस आणि फ्रूट कॅन्समधून दोन लाख पंधरा हजार अमेरिकन डॉलर्स किमतीचे द्रवरूप कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा ठोठावली. त्याचा सहकारी चॅड किरनोन यालादेखील याच आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले असून, तशीच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात लंडनच्या गॅट्विक एअरपोर्टवर उतरल्यानंतर त्यांना क्रिकेट किट बॅगमध्ये द्रवरूप कोकेन सापडल्यावरून अटक करण्यात आली होती. दरम्यान लुईस याने मात्र आपण या प्रकरणात निर्दोष असून, कोकेन द्रवरूप अवस्थेतही असते याची आपल्याला कल्पनाही नसल्याचे म्हटले आहे. आपल्या बॅगेत फ्रूट ज्यूसच असल्याचा माझा समज होता. अटकेनंतर मात्र त्याने या साऱ्या प्रकरणाला आपला मित्र किरनोन हाच जबाबदार असल्याचे सांगितले होते. धूम्रपान करताना आपण नियमित मारिज्युआनाचे सेवन करायचो; पण कोकेनच्या वाटेला आपण कधीही गेलो नव्हतो, असेही त्याने म्हटले आहे.

विजयाचा विचार केल्याने जिंकलो - कुंबळे
जोहान्सबर्ग, २० मे/ पीटीआय

आमचा संघ सातत्याने विजय मिळविण्यात अपयशी ठरत होता. पण उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी आम्हाला जेव्हा प्रत्येक सामना जिंकणे भाग होते तेव्हा गुणतालिकेचे टेन्शन न घेता फक्त विजयाचा विचार केला आणि या विचारामुळेच आम्ही उपान्त्य फेरीच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचू शकलो. यावेळी जर आम्ही अनेक गोष्टींवर विचार केला असता तर हे विजय मिळविता आले नसते, असे बंगळुरू रॉयल संघाचा कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केले आहे. गुणतालिकेचे टेन्शन मी कधीच घेतले नाही. प्रत्येक प्रतिस्पध्र्याविरूद्ध सामना जिंकायचा याचाच फक्त विचार मी करत होतो. त्याच निर्धाराने मैदानात उतरलो आणि एकामागून एक विजय सांपादन करत गेलो, असे कुंबळे यावेळी म्हणाला. जॅक कॅलिस, राहुल द्रविड आणि प्रवीण कुमार यांचा संघाच्या विजयात महत्वाचा वाटा असल्याचे त्याला वाटते. यावेळी तो म्हणाला की, संघाने मिळविलेल्या यशाबद्दल मी आनंदीत आहे. खासकरून जॅक कॅलिस, राहुल द्रविड आणि प्रवीण कुमार यांचे संघाच्या विजयात फार मोठे योगदान आहे.

स्पोर्ट्स प्रमोशन आणि हिंदू जिमखाना अंतिम फेरीत
मुंबई, २० मे / क्री. प्र.

एस. पी. ग्रुप आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी रंगेल ती स्पोर्ट्स प्रमोशन आणि हिंदू जिमखाना या दोन संघांमध्ये. यष्टिरक्षक मेहूल गोकानीने १२ चौकारांच्या साहाय्याने फटकाविलेल्या ७५ धावा, त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज सागर उदेशीने (११ धावांत ४ बळी) दिलेली उत्तम साथीच्या जोरावरच स्पोर्ट्स प्रमोशन संघाने भारत क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क येथील खेळपट्टीवर जॉली फ्रेंडस् संघांचा ८७ धावांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. संक्षिप्त धावफलक - स्पोर्ट्स प्रमोशन- ७ बाद २३९ धावा (गौरांग शहा ३६, अमेय परब ३१, मेहूल गोकानी ७५, प्रीयतम भारतीय ३६ धावांत २ बळी, सोहम सिन्हा ३४ धावांत ३ बळी) विजयीविरुद्ध जॉली फ्रेंडस् सर्व गडी बाद १५१ धावा (रोहन तळवडेकर ३०, भाविक पटेल २७ धावांत २ बळी, सागर उदेशी ११ धावांत ४ बळी) सामनावीर- मेहूल गोकानी.