Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

ठाणे पालिका मुख्यालयातच अनधिकृत बांधकाम
संजय बापट

मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या दणक्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कुरकुरतच कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ठाणे महापालिकेने स्वत:च पालिका मुख्यालयात अनधिकृत मजले बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वत:च अनधिकृत बांधकाम करणारी मनपा इतरांवर कोणत्या तोंडाने कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाईंदरकरांना सूर्यातून
जादा पाणी

नवी मुंबई/प्रतिनिधी : ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजीव नाईक यांच्या पारडय़ात मतांचे भरभरून दान टाकणाऱ्या मीरा-भाईंदरकरांना निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटत नाही, तोच खूशखबर मिळाली असून, येत्या १ जुलैपासून या भागातील रहिवाशांकरिता सूर्या प्रकल्पातून तब्बल १०० एमएलडी जादा पाणी पुरविण्याचा निर्णय आज राज्याचे पाणीपुरवठामंत्री अजित पवार यांनी घेतला.

रुग्णालयांवरील वाढते हल्ले; डॉक्टर-पोलीस बैठकीचे संकेत
ठाणे/प्रतिनिधी
डॉक्टर आणि रुग्णालयांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात राज्य शासनाने कडक कायदा करूनही डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने ठाणे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी यासंबंधी प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी डॉक्टरांची बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत.

पाणी योजनेच्या चौकशीसाठी अख्ख्या गावाचे उपोषण
शहापूर/वार्ताहर

तालुक्यातील मुसई व मुसईवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेचे निकृष्ट काम करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करणारा ठेकेदार पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यावर कारवाई करावी, या मागणीकरिता मुसई गावातील २५० महिला व पुरुष आज शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

आंब्याचे झाड पडून तीन जण जखमी
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथच्या शिवाजी चौकातील जुने आंब्याचे झाड कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. शिवाजी चौकातील रसवंती गृहाजवळील झाड आज दुपारी १२ च्या दरम्यान कोसळले. यावेळी रस्त्यावरून मल्लिक इनामदार, भारती इनामदार हे किरकोळ, तर सोनम पिल्ले हे जबर जखमी झाले. नगराध्यक्षा संपदा गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

शाहू महाराज ग्रंथालयाचे उद्घाटन
बदलापूर/वार्ताहर

बदलापूर येथील कात्रप विभागात छत्रपती शाहू महाराज ग्रंथालयाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्ष राम पातकर याप्रसंगी उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली आहे. ग्रंथालयात वाचकांसाठी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित ग्रंथसंपदा, तसेच सुमारे एक हजार पुस्तके उपलब्ध आहेत, असे शिंदे म्हणाले. कात्रप-शिरगाव परिसरातील महिला आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ग्रंथालयाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ग्रंथालयाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाणता राजाचे दोन प्रयोग रद्द
बदलापूर/वार्ताहर : हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे अंबरनाथ येथे सुरू असलेले जाणता राजा महानाटय़ाचे दोन प्रयोग रद्द करावे लागले. आता या महानाटय़ाचे प्रयोग शुक्रवार, २२ मेपर्यंत दाखवण्यात येणार आहेत. ज्या रसिकांनी शनिवार, २३ आणि २४ मे रोजीची तिकिटांची आगाऊ बुकिंग (नोंदणी) केली असेल, त्यांना गुरुवार, २१ आणि शुक्रवार, २२ मे रोजी नाटक पाहता येणे शक्य होणार आहे. अधिक माहितीसाठी रसिकांनी ‘जाणता राजा’च्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन घावट यांनी केले आहे.