Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

व्यक्तिवेध

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांची धुरा वाहणारे गोविंदराव शिंदे यांच्या निधनाने सवरेदयी चळवळीतील मोठा कार्यकर्ता हरपला. गोविंदरावांचा जन्म २९ डिसेंबर १९२७ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण करीत असतानाच ते स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले. १९४२ मध्ये ते राष्ट्र सेवा दलामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. नेते आणि कार्यकर्त्यांची ब्रिटिशांनी धरपकड सुरू करताच गोविंदराव

 

भूमिगत झाले. १९४६पर्यंत भूमिगत राहूनच ते कार्य करीत राहिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते राष्ट्र सेवा दलाचे पूर्ण वेळ काम करू लागले. याच काळात ते भूदान चळवळीच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे यांच्या संपर्कात आले आणि पुढील आयुष्य सवरेदयी कार्यकर्ते म्हणूनच जगले. १९५१-५६ या कालावधीत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात भूदान आणि ग्रामदानाचा प्रचार आणि प्रसार केला. इतकेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात चार वेळा भूदान आणि ग्रामदानयात्रा काढली आणि भूदानासाठी पाच हजार एकर जमीन मिळविली. या कार्याची पावती म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र सवरेदय मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली. महाराष्ट्र सवरेदय मंडळाचे सचिव आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी सहा वर्षे काम केले. आचार्य विनोबा भावे, लोकनायक जयप्रकाश नारायण, दादा धर्माधिकारी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, शंकरराव देव, आप्पासाहेब पटवर्धन, एस. एम. जोशी आदींच्या दौऱ्यांच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. सवरेदय आंदोलनात कार्यरत असतानाच धुळे जिल्ह्यातील आदिवासींवर होत असलेला अत्याचार पाहून ८०च्या दशकात गोविंदरावांनी धडगाव, शहादा येथे मुक्काम ठोकला आणि आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला. ग्रामस्वराज्य समितीच्या माध्यमातून चळवळ उभी केली. ही चळवळ ‘शहादा चळवळ’ म्हणून ओळखली जाते. आदिवासींची लाटलेली दहा हजार एकर जमीन परत मिळवून देण्यात गोविंदरावांना यश आले. आदिवासींच्या जमिनींसंदर्भात राज्य शासनाला कायदाही करावा लागला, तो याच चळवळीमुळे. या निमित्ताने संघटित झालेल्या आदिवासींनी गावोगावी दारूबंदी केली. सुमारे शंभर गावांमध्ये प्रौढ साक्षरतेचे वर्गही चालविले. शेतमजुरांना मिळणारी मजुरी वाढवून देण्यातही ते यशस्वी झाले. ज्येष्ठ सवरेदयी नेते अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या सूचनेनुसार गोविंदराव १९८० मध्ये पनवेल तालुक्यातील नेरे येथे कुष्ठरोग निवारण संस्थेच्या कार्यसाठी दाखल झाले. कुष्ठरोग निर्मूलनाचे काम शिकून त्यांनी पाच कुष्ठरोग्यांसह एका झोपडीत काम सुरू केले. आज त्याच जागेवर ‘शांतिवन’ उभे आहे. पनवेल तालुक्यातील जवळजवळ १८५ गावांमधील ग्रामस्थांना त्यांनी कुष्ठरोगाची माहिती देऊन जागृती केली; रुग्णांवर उपचारही केले. गावागावातील आठ हजाराहून अधिक रुग्णांना बरे करण्यात त्यांना यश मिळाले. कुष्ठरोगग्रस्त ७०० मुलांचाही समावेश होता. कुष्ठरोगाच्या निवारणासाठी शांतिवनात आज अद्ययावत रुग्णालय, फिजिओथेरपी विभाग उभारण्यात आला आहे. गोविंदराव शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या शांतिवनात अनेक जण ताठ मानेने जीवन जगत आहेत. मालगुंड येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १२ वर्षे काम पाहिले. ग्रामदानी गावांच्या नवनिर्माणाच्या कार्यातही त्यांनी स्वत:ला वाहून घेतलं होते. रत्नागिरी येथे आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या खादी संघाचे अध्यक्षस्थानही त्यांनी अनेक वर्षे भूषविले. सातपुडा सवरेदय मंडळ, महाराष्ट्र सेवा संघ आणि खादी संस्था, आर. डी. कुलकर्णी ट्रस्ट, सानेगुरुजी कथामाला आदींचे विश्वस्त म्हणूनही ते कार्यरत होते. महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष, यमुनाबाई खेर ट्रस्ट, रत्नागिरी आणि कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवनचे विश्वस्त आणि सेक्रेटरी म्हणून ते कार्यरत होते. या अहर्निश सेवाव्रतीला उत्तरायुष्यात मात्र कर्करोगाने गाठले. रुग्णालयात राहण्यापेक्षा आपली कर्मभूमी असलेल्या शांतिवनात अखेरचा काळ राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार त्यांना शांतिवनात आणण्यात आले होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली आणि कुष्ठरोगी, आदिवासी अशा वंचितांचा आधारवड हरपला.