Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार- अशोक नेते
गडचिरोली, २० मे / वार्ताहर

चिमूर-गडचिरोली मतदारसंघातून पराभव झाला असला तरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, असे आमदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी निवडणुकीत जनतेने, सामाजिक संघटनांनी, भाजप-सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपणास भरपूर सहकार्य केले परंतु, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी इव्हीएम मशीन उलटी ठेवल्याने शेवटच्या क्रमांकावरील उमेदवार दिनेश मडावी यांना अधिक मते गेल्याने पराभव झाला.

कारंजा घाडगे तालुक्यात कृषी दिंडीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कारंजा (घाडगे), २० मे / वार्ताहर

तालुक्यातील निघालेल्या कृषी दिंडीला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कृषी दिंडीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सारवाडी येथील प्रगतीशील शेतकरी लीलाधर राकस यांच्या हस्ते कृषीरथाचे पूजन करण्यात आले. कृषी अधिकारी सुबोध मोहरील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व सोयाबीन संत्रा पिकाविषयी माहिती दिली.

शेतकरी संघटनेसोबत युतीचे भाजपचे संकेत
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २० मे

लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणाऱ्या शेतकरी संघटनेसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत भाजपच्या वर्तुळातून मिळू लागल्याने जागा वाटपाच्या वेळी या मुद्यावरून युतीत मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे.

वेध पावसाचे
अमरावतीसाठी १.४१ लाख क्विंटल बियाण्यांची ‘महाबीज’कडे मागणी
अमरावती, २० मे / प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्य़ात पंतप्रधान पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी कृषी खात्याने नियोजन केले असून सुमारे ७० हजार क्विंटल सोयाबीनसह इतर पिकांच्या ७१ हजार १९० क्विंटल बियाण्यांची मागणी ‘महाबीज’कडे नोंदविण्यात आली आहे.

कृषी केंद्रधारकांच्या ‘लिंकेज’ पद्धतीने शेतकऱ्यांना भरुदड
कृषी खात्याचे दुर्लक्ष
चंद्रपूर, २० मे/ प्रतिनिधी

डीएपी व संयुक्त खत यंदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने कृषी केंद्रधारकांनी नफेखोरीसाठी ‘लिंकेज’ पध्दतीने खत विक्री सुरू केली आहे. डीएपी खतासोबत सेंद्रीय खत घेणे बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. जादा दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश देणाऱ्या कृषी खात्याचे याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

जननी सुरक्षा योजनेच्या लाभापासून महिला वंचित
गोंदिया, २० मे / वार्ताहर

येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात प्रसूती करणाऱ्या दारिद्रय़रेषेखालील महिलांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीपासून मुकावे लागत आहे. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व जननी सुरक्षा योजनेचे पैसे वाटप करणाऱ्या लिपिकाच्या अनागोंदी कारभारामुळे महिलांची गैरसोय होत आहे.

मोटार सायकल अपघातात पती ठार, पत्नी जखमी
घाटंजी, २० मे / वार्ताहर

तालुक्यातील नुक्ती गावानजीक वादळी वाऱ्यात मोटार सायकलला अपघात होऊन पती ठार तर पत्नी जबर जखमी झाल्याची घटना घडली. पांढरकवडा तालुक्यातील नारा-कवढा येथील सुभाष दौलत डंभारे व त्याची पत्नी हे दोघेही मोटारसायकलने घाटंजीकडे येत असताना नुक्ती गावोनजीक वादळी वाऱ्याने मोटारसायकल दूरवर फेकल्या गेली. त्यामुळे सुभाषच्या छातीला जबर मार बसला. जखमी सुभाष यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या आमडी येथील योगिता लक्ष्मण नोहांडे (३२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततच्या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

मराठा साहित्य संमेलन शनिवारपासून
गोंदिया, २० मे / वार्ताहर
कुणबी-सेवा संघाच्या तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने २३ व २४ मे रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात मराठा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात भाग घेण्यासाठी इच्छुक साहित्यिक, लेखक, कवी यांनी कुणबी-मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर माहोरे, सचिव रमेश ब्राह्मणकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रांजली बोरकुटे, संभाजी ब्रिगेडचे दीपक कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

मोटार सायकलस्वार जखमी
घाटंजी, २० मे / वार्ताहर

तालुक्यातील साखरा येथे सेन्ट्रोने धडक दिल्याने मोटार सायकलस्वार अरुण उद्धव गावंडे व रिता हे जबर जखमी झाले. घाटंजी पोलिसांनी वाहन चालक स्वप्नील बाबाराव जाधव विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

प्राध्यापक महासंघाची उद्या अमरावतीत सभा
यवतमाळ, २० मे / वातार्हर

प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी देशभर करावयाच्या आंदोलनाबाबत शुक्रवार, २२ मे रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे (एम-फुक्टो) अध्यक्ष प्रा. सदाशिवन, सरचिटणीस डॉ. एकनाथ व ‘नुटा’चे अध्यक्ष आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्या उपस्थितीत अमरावतीत प्राध्यापकांची सभा होणार आहे. कशाबाई लाहोटी महाविद्यालयात होणाऱ्या या सभेत दुपारी ४ वाजता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्य़ातील प्राध्यापकांनी हजर राहावे, असे आवाहन ‘नुटा’ जिल्हाध्यक्ष व एम फुक्टोचे उपाध्यक्ष प्राचार्य शंकर सांगळे यांनी केले आहे.

ब्रह्मपुरीत बाल धम्म शिबीर
ब्रह्मपुरी, २० मे / वार्ताहर

येथील धम्म प्रचार केंद्राच्यावतीने सावित्रीबाई पुले कन्या विद्यालयात तीन दिवसीय निवासी बाल धम्म शाळा शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन संयोजक डॉ. प्रेमलाल गुरुजी यांच्या हस्ते झाले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नायब-तहसीलदार पी.बी. रामटेके उपस्थित होते.

रेडक्रॉस स्थापना दिन
भंडारा, २० मे / वार्ताहर
जवाहरनगर येथे भंडारा जिल्हा रेडक्रॉस संस्था व ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने गुप्ता चिकित्सालयात रेडक्रॉस स्थापना दिन साजरा करण्यात आला. डॉ. अशोकराव ब्राह्मणकर यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नीळकंठ रणदिवे व युथ रेडक्रॉसचे संचालक शिवानंदनसिंह बैस उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. चंद्रमोहन गुप्ता यांनी केले. शिवनंदनसिंह बैस यांनी ‘ग्लोबल वार्मिग’ तर नीळकंठ रणदिवे यांनी ‘वृक्षारोपण’ वर विचार व्यक्त केले.

रामभाऊ बोरगमवार यांचे निधन
वडनेर २० मे / वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ बोरगमवार यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर हिंगणघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रहार युवाशक्ती संघटनेचे दिव्यकुमार बोरगमवार यांचे ते वडील होत.