Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

से नो टू रॅगिंग
रॅगिंग हा शब्द अमेरिकेतील हेझिंग (Hazing) या शब्दाशी साम्य दाखवतो पण हेझिंगच्या तुलनेत रॅगिंग जास्त भयंकर आहे. नव्या असलेल्या, कॉलेजमध्ये न रुळलेल्या, बावरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे सिनीयर्स शारीरिक/ मानसिक त्रास देतात आणि त्यामुळे होणारी ज्युनियर्सची फजिती पाहण्याचा आनंद घेतात. बरेचदा ज्युनियर्स हे सगळं होऊनही गप्प राहतात. कारण ते असंघटित असतात आणि मुख्य म्हणजे पुढे जाऊन सिनीयर्सनी दिलेल्या नोटस् व त्यांच्या सहकार्यावरच त्यांचे शिक्षण अवलंबून असते.
तुम्हाला अमन कचरू आठवतोय? दोन महिन्यांपूर्वी सगळ्या न्यूज चॅनल्सच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये होता तो. पण आता तो ना न्यूजमध्ये आहे ना आपल्या डोक्यात! डॉ. राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज हिमाचल प्रदेश येथे शिकणारा १९ वर्षांचा उमदा तरुण अमन.. रॅगिंगचा आणखी एक बळी ठरला. त्याच्या सीनियर्सकडून त्याला रॅगिंगच्या नावाखाली सतत मारहाण होत असे आणि अशातच ६ मार्चच्या रात्री मद्यधुंद सिनीयर्सनी केलेल्या जबर मारहाणीत मेंदूला इजा पोहोचून शनिवार ७ मार्चला अमनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आता भारतामध्येही रॅगिंग प्रकरणे आपल्याला नवीन नाहीत, पण असं एखादं प्रकरण झालं की मगच आपल्याला त्याची

 

आठवण होते. रॅगिंगविरोधी काही तरी करायला हवं म्हणून आपण अगदी तावातावात मोर्चे काढतो, घोषणा देतो, पण परिणाम? काही दिवस झाले की सगळं थंड. आताही पाहा ना, निवडणुका आणि निकालांच्या नादात आपण चक्क विसरूनही गेलो, पण या अशा घटनांबद्दल जागृत राहणं गरजेचं आहे म्हणूनच हा अट्टहास.
रॅगिंग म्हणजे तरी काय? ‘हे फॅड काही आपल्यातलं नव्हे’ असं म्हणणाऱ्यांना तरी माहितीय काय?
रॅगिंग हा शब्द अमेरिकेतील हेझिंग (Hazing) या शब्दाशी साम्य दाखवतो पण हेझिंगच्या तुलनेत रॅगिंग जास्त भयंकर आहे. नव्या असलेल्या, कॉलेजमध्ये न रुळलेल्या, बावरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे सिनीयर्स शारीरिक/ मानसिक त्रास देतात आणि त्यामुळे होणारी ज्युनियर्सची फजिती पाहण्याचा आनंद घेतात. बरेचदा ज्युनियर्स हे सगळं होऊनही गप्प राहतात. कारण ते असंघटित असतात आणि मुख्य म्हणजे पुढे जाऊन सिनीयर्सनी दिलेल्या नोटस् व त्यांच्या सहकार्यावरच त्यांचे शिक्षण अवलंबून असते.
रॅगिंगची कायदेशीर व्याख्या पाहिली तर ‘अशी कोणतीही कृती जी एखाद्या विद्यार्थ्यांला शारीरिक वा मानसिक वा दोन्ही प्रकारे इजा करेल किंवा त्याला/ तिला अतिशय लाज वाटेल असे वर्तन करावयाला लावेल. यामध्ये शाब्दिक टोमणे मारणे, खिल्ली उडवणे, कमेंटस् पास करणे याचबरोबर अशी कोणतीही कृती जी तो विद्यार्थी सामान्य परिस्थितीत करणार नाही किंवा त्याला कराविशी वाटणार नाही.’ रॅगिंगविषयक कायद्यांचा अभ्यास केला असता दिसून येते की, १९९७ मध्ये तामीळनाडू सरकारने पहिला कायदा पास केला. यानंतर मिनिस्ट्री ऑफ ह्य़ुमन डेव्हलपमेंट आणि सुप्रीम कोर्टाने सी. बी. आय. प्रमुख आर. के. राघवन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. मे २००७ मध्ये आपला रिपोर्ट सादर करताना राघवन समितीने भारतीय दंड कलमाअंतर्गत रॅगिंगसाठी एक स्पेशल सेक्शन उभारण्याची विनंती केली. यानंतर १६ मे २००७ ला सुप्रीम कोर्टाने हंगामी आदेश काढून सर्व शैक्षणिक संस्थांसाठी रॅगिंगच्या तक्रारीचा एफ. आय. आर. दाखल करणं सक्तीचं केलं.
आज छोटय़ा-मोठय़ा अनेक कॉलेजांमध्ये रॅगिंगचे प्रमाण वाढतं आहे. रॅगिंगचे प्रकार प्रत्येक कॉलेजगणिक बदलतात. मुलगे-मुलगे व मुली-मुलींमध्ये रॅगिंग असं शक्यतो रॅगींग केलं जातं. पण मुलगे-मुली असे क्रॉस रॅगिंगही काही ठिकाणी चालतं. रॅगिंगच्या प्रकाराप्रमाणेच रॅगिंगच्या पद्धतीही बदलत जातात. रॅगिंगचा पहिला आणि अत्यंत साधा आजच्या भाषेतला चिंधी प्रकार म्हणजे ‘इंट्रो’. नव्या मुलाला सगळे सिनीयर्स घेरतात आणि त्याच्या बायोडेटापासून, कुटुंब, जनरल नॉलेजपर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारतात व निरनिराळ्या प्रकारे शब्दात पकडायचा प्रयत्न करतात. काही कॉलेजमध्ये ज्युनियर्सकरता वेगळे नियम असतात. म्हणजे, सिनीयर्सना सर/ मॅडमच म्हणायचं, त्यांच्यासमोर उभंच राहायचं.. याचबरोबर एखाद्या अनोळखी मुलाला किंवा मुलीला जाऊन प्रपोज करायला सांगणे, गाणी गायला सांगणे, नाचून दाखवायला सांगणे. इत्यादी. पुण्याच्या एका कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगप्रकरणाने मात्र सीनियर्सचीच दांडी गूल केली! त्याचं झालं असं की, सीनियर्सच्या एका ग्रुपने एका ज्युनियरला बिस्लेरीची पाण्याने भरलेली बाटली दिली आणि पूर्ण कॅम्पसभर पाणीवाला पाणीवाला ओरडत सगळ्यांना बाटलीच्या छोटय़ा झाकणातून पाणी द्यायला सांगतिलं. पण तो मुलगा भलताच हुशार निघाला. त्याने सरळ लेक्चर संपवून येणाऱ्या प्रोफेसरनाच असं झाकणातून पाणी दिलं. आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये हजेरी लावून आल्यावर सीनियर्सची रॅगिंगची हौस पुरती फिटली. पण हे रॅगिंगचे प्रकार काही प्रमाणात सहनीय असतात. बरेचदा काही महिन्यानंतर ज्युनियर्स व सीनियर्स चांगले मित्र बनतात आणि आधीची कटुता विरून जाते.
माझ्याच बाबतीत घडलेलं उदाहरण सांगायचं झालं तर, मी कॉलेजमध्ये असताना एकांकीकेत काम केलं होतं. त्यात माझा लीड रोल होता. पण प्रॅक्टीस करताना समोर बसलेल्यांपैकी कोणी काही जोक केले, टिवल्याबावल्या केल्या, काही विचित्र हलचाल केली की मीही हसायचे शिवाय माझा आवाजही खूप बारीक असल्याने शेवटपर्यंत ऐकूच जात नसे. माझी ही सवय घालवण्यासाठी माझ्या सिनिअर्सनी एक नवीनच प्रकार सुरु केला. मी प्रॅक्टीस करत असताना ते माझ्यासमोर उभं राहून मुद्दामच मोठमोठय़ाने हसायचे, गप्पा मारायचे. माझं लक्ष विचलीत करायचा प्रयत्न करायचे आणि माझ्यासाठी अशी अट होती की मी माझे डायलॉग लक्ष विचलीत न होता, मोठय़ाने म्हटलेच पाहिजेत. ते जर झाले नाही, तर मला शिक्षाही होती. ऐन एकांकिकेच्या वेळी मला या रॅगींगचा फायदाच झाला. आमच्या ग्रुपची एकांकीका सुरु असताना काही मुलांचा एक गट बडबड करत मधूनच उठून बाहेर गेला. पण माझ्या सिनिअर्सनी लावलेल्या या सवयीमुळे मी जराही विचलीत झाले नाही. उलट त्या स्पर्धेत मला अभिनयासाठी विद्यापीठीचं पारितोषिकही मिळालं.
पण या मर्यादेपलीकडचं रॅगिंग मात्र भयानक असतं. यामध्ये सतत काही टीकात्मक बोलून मानसिक खच्चीकरण करणे, विवस्त्र होण्यास लावणे, मारहाण करणे, शारीरिक व्यंगावरून सतत बोलत राहणे, जेवायला- खायला मिळू न देणे, सिनीयर्सचे उष्टी भांडी व कपडे धुण्यास लावणे यासारखे अपमानास्पद प्रकार केले जातात. हा छळ मात्र सहन करण्यापलीकडचा असतो. अनेकदा मुलं शिक्षण सोडून देतात. आत्महत्या करतात, मानसिक संतुलन हरवून बसतात. भारतात २००२ पासून रॅगिंगची अनेक प्रकरणे उघडकीला आली आहेत. त्यामध्ये कित्येकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. CURE (coalition to uproot ragging from education) व अ‍ॅन्टी रॅगिंग ग्रुप या संस्थांनी सादर केलेल्या अहवालानुसार गेल्या ७ वर्षांत रॅगिंगमुळे ३०-३१ जणांचे मृत्यू झाल्याचे आढळून आलं आहे. त्यामध्ये केवळ रॅगिंग होणारे ज्युनियर्सच नव्हे तर इतरांचाही समावेश आहे. सी. ललिता यांनी त्यांच्या मुलावर होणारे शारीरिक रॅगिंग सहन न झाल्याने आत्महत्या केली. मध्य प्रदेश विद्यानगर इथे एका ज्युनियरने त्याच्या दोन सीनियर्सची रॅगिंग करतात म्हणून हत्या केली. एका सीनियर विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. आपण केलेलं रॅगिंग उघडकीस आलं व त्याबद्दल आपल्याला शिक्षा झाली. हे सहन न झाल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. या रॅगिंगच्या प्रकारांमुळे कित्येक जणांचे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक नुकसान झाले. रॅगिंगबद्दलच्या तक्रारींचा आणि घटनांचा अभ्यास केल्यावर असे समोर आले की त्यातील ६० टक्के तक्रारी शारीरिक तर २० टक्के लैंगिक छळाच्या होत्या. SAVE (Society against Violence in Education) चे अध्यक्ष कशाल बॅनर्जी म्हणतात, या सगळ्या गोष्टींकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. एखाद्याला त्रास देऊन त्यातून आनंद मिळवण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. रॅगिंग ही केवळ मौजमजा न राहता ती एक ‘प्रीप्लॅन्ड अ‍ॅक्टिव्हिटी’ बनली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आधीपासूनच सीनियर्स इंटरनेट, फोन, ऑर्कूट याद्वारे रॅगिंगच्या नवनव्या ट्रिक्स प्लॅन करत असतात.
एवढं सगळं होऊनही अजून कित्येक विद्यार्थ्यांना माहीत नाही की रॅगिंग गुन्हा आहे. एका प्रतिष्ठित इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारा हेमंत व त्याच्या मित्रांच्या मते रॅगिंग गरजेचे आहे. असे का? विचारल्यावर तो म्हणाला, जेव्हा मुलं सीनियर कॉलेज किंवा डिग्रीला प्रवेश घेतात तोपर्यंतचं त्यांचं आयुष्य एकदम गुडी गुडी आणि सेफ असतं, पण यानंतर त्यांना सर्वस्वी नव्या जगात आणि स्वबळावर जायचं असतं. तिथे त्यांना अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात जे त्यांना कधीच आवडणारे नसतात. अनेक वेळा मूर्ख बॉसच्या सांगण्याप्रमाणे वागावे लागते. कारण केवळ तो सीनियर असतो. काही वेळा प्रचंड हव्याशा गोष्टीत नकार पचवावा लागतो. मग तो निर्णय गर्लफ्रेंडच्या बाबतीत असो वा नोकरीच्या वा कुटुंबाच्या बाबतीत. रॅगिंग म्हणजे या सगळ्याची पूर्वतयारी असते. आम्ही रॅगिंग करतो कारण ते आमच्या ज्युनियर्सना मानसिकरीत्या प्रबळ बनवते आणि काही काळाने हे आमचे चांगले मित्रही बनतात. पण हे ऐकल्यावर माझ्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला की, यातून एखाद्या ज्युनियरला शारीरिक इजा झाली किंवा त्याचे मानसिक स्वास्थ बिघडले तर याची जबाबदारी स्वीकारायला किती सीनियर्स पुढे येतील किंवा येतात? यावर मात्र उत्तर मिळाले ते केवळ २-३ टक्के.. मग हे काय आहे? जर रॅगिंग करायला सगळे १०० टक्के उत्सुक असतात तर त्याची जबाबदारी घ्यायला केवळ २-३ टक्केच का पुढे येतात, बाकीच्या सीनियर्सचं काय? मान्य आहे की आपल्याला पुढच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात, ज्या आपल्याला कधीच करायच्या नसतात, पण आपल्याकडून अनेक चुकाही कळत नकळत होत असतात. मग अशा चुकांची जबाबदारी स्वीकारणं हेसुद्धा नकार पचवण्याइतकंच महत्त्वाचं नाही का? खरं तर ते जास्त गरजेचं आहे. चुका झाल्या तरी त्यांची जबाबदारी स्वीकारून त्या सुधारणं जास्त गरजेचं आणि बरंच काही शिकवणारं असतं नाही का?
पण इतकं सगळं असूनही आपल्याकडे रॅगिंगविरोधी काम करणाऱ्या संस्था हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. CURE (coalition to up root ragging from education), SAVE (society against violence in education), STOP RAGGING... रॅगिंगविरोधी समित्या बऱ्याच कॉलेजमध्ये आहेत. पण त्या अगदी नावाला किंवा कागदावरच.
खरंच या सगळ्याबद्दल आता काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. कल्चरल ग्रुप, स्पोर्टस् ग्रुप याप्रमाणे ‘अ‍ॅण्टी रॅगिंग ग्रुप्स’ ही प्रत्येक कॉलेजमध्ये तयार व्हायला हवेत आणि मुख्य म्हणजे कार्यरत हवेत. रॅगिंग एक गुन्हा आहे आणि त्याला कळत नकळत डायरेक्टली/ इनडायरेक्टली पाठिंबा देणं हाही गुन्हाच आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं आणि इतरांनाही समजवायला हवं तरच अशा अनेक अमनना श्रद्धांजली मिळेल, रॅगिंग करणाऱ्यांवर जरब बसेल, असे प्रकार थांबतील किंवा निदान कमी तरी होतील आणि पुन्हा असा लेख लिहायची वेळ येणार नाही.

जीव मिल्खा सिंग यांचा सावत्र मुलगा जशन शेरगील हा लॉरेन्स स्कूल, सनावर इथे शिकत असताना त्याच्याच काही वर्गमित्रांनी केवळ त्याला जास्त मार्क मिळाले म्हणून ब्लेडने जखमी केलं. याच लॉरेन्स स्कूल सनावरमधील १२वीतील सात विद्यार्थ्यांनी बास्केट बॉल मॅचमध्ये आपल्या टीमला चीअर्स न केल्याबद्दल अकरावीतील त्यांच्या ज्युनिअर्सचं रॅगींग केलं. या सातही विद्यार्थ्यांना आता, व्यवस्थापनाने घरी पाठवलं आहे. परंतु, मुख्याध्यापिका परविन वशिष्ठ यांच्या मते ही केस रॅगींगची नसून विद्यार्थ्यांमधील आपापसातील भांडणांची आहे.

कोइम्बतूर इथल्या पीएसजी कला आणि विज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या अखिलला ३००० रुपयांसाठी त्याच्या सिनिअर्सनी चेहऱ्यावर बुक्के मारले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांवरही मार बसून त्याला दृष्टीदोष निर्माण झाला आहे. इतकेच करुन ते सिनिअर्स थांबले नाहीत तर बेशुद्धावस्थेतच त्यांनी त्याला जिन्यावरुन खाली फरफटत नेले व फेकून दिले. अखिल हा केरळमधील प्रसिद्ध कादंबरीकार सुनील परमेश्वरन यांचा मुलगा आहे. ही घटना ७ मार्चच्या रात्री घडली. पण अखिलने तक्रार मात्र महिन्याभरानंतर केली. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने निलंबित केले आहे.

अमन कचरुचे वडील राजेंद्र कचरु यांनी रॅगिंगचे प्रकार रोखण्याकरता व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक केंद्रिय संस्था स्थापन करण्यात यावी. तसंच या संस्थेच्या वेबसाईटरुन रॅगिंग रोखण्याकरता योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी सूचना सरकारला केली आहे. केंद्र सरकारनेसुद्धा ही सूचना उचलून धरली आहे. रॅगिंग रोखण्यासाठी विद्यापीठ आयोगाने कडक भूमिका घेतली पाहिजे व राज्यसरकारने रॅगिंग रोखण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत असं सुप्रीम कोर्टाने बजावले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने काही कडक नियम जारी केले आहेत. त्या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पाल्याच्या सदोष वर्तणूकीबद्दल झालेली शिक्षा मान्य करणे बंधनकारक राहील. यामुळे पालकांचा आपल्या पाल्यावर वचक राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रॅगिंगची तक्रार करण्यासाठी आता टोल फ्री नंबरही असणार आहे. आपल्या कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याची आम्हाला कल्पना नव्हती अन्यथा आम्ही लागलीच त्यावर कारवाई केली असती असा युक्तीवाद आता कोणतेही कॉलेज करु शकणार नाही.

नवीन इच्छा आणि स्वप्न उराशी बाळगून कॉलेजमधील आयुष्यात प्रवेश कराताना प्रत्येकाच्याच मनात अनेक भावभावनांचं, त्या मजेचं एक अतिशय सुंदर असं चित्र तयार झालेलं असतं. याच भावना, एक्साईटमेंट, नव्या जगाची वाटणारी अनामिक भीती यासह आपण कॉलेजमध्ये प्रवेश करतो. एका मर्यादेपर्यंत मजा, मस्ती हो कोणालाही हवीहवीशीच वाटते.. पण अनेकदा या मजेचं रुपांतर कोणतीही मजल गाठण्यापर्यंत होऊ शकतं.. सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा होतो.. हवी हवीशी वाटणारी धाकधूक भयंकर भीतीमध्ये बदलते.. आपला काहीही दोष नसताना.. कॉलेजच्या यंग आणि वायब्रंट कल्चरला गालबोट लावणारी कृती म्हणजे रॅगींग.. तुम्हाला काय वाटतं या प्रकाराबद्द्ल.. मजा म्हणून पण मर्यादेचं भान राखून रॅगींग चालेल का? पण मग जर कोणाचं आयुष्य हकनाक बळी जात असेल तर..? तुम्ही काय विचार केला आहेत यावर? तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव, तुमच्या सूचना आम्हाला नक्की कळवा.
पत्ता : एक्सप्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. किंवा viva.loksatta@gmail.com या इमेल वर प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
- स्वाती केतकर

sweetyketkar@gmail.com