Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

थर्ड आय - सिंग is king... जय हो !
आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
१६ मे उजाडला तेव्हा माझ्यासकट अनेकांना वाटू लागलं, की आज बहुधा ‘देशबुडी’ होणार (आपण आपल्यापुरतंच बोलावं, हे सध्या शिकतोय, म्हणून ‘जगबुडी’ असं नाही म्हटलं) पण काही तासांतच हे वादळ शमलं. खरं तर ते वादळ नव्हतंच हेही जाणवायला लागलं. हिंदी-इंग्रजी चॅनलवाले आणि आता मराठी चॅनलवाले सुद्धा, तसेच बुद्धी बुद्धी खेळणारे लोक उगाचच ‘त्या’ सुनामी वादळाच्या संभाव्य दुष्परिणामावर तासन्तास चर्चा करत बसले होते. पण त्यांनाही ती डोळ्यांवरची झापडं काढावीच लागली; आणि हे देशावरचं अराजकतेचं वादळ नाही तर स्थैर्याची गार आल्हादायक झुळूक वाहते आहे याचा प्रत्यय आला. कडक उन्हाळ्यात अचानक शिडकावा झाल्यासारखं वाटलं.
कित्येक आठवडे, सुबुद्ध, सुजाण नागरिक आळशी आणि निष्क्रिय झाल्याची ओरड सगळीकडे चालू होती. लोक मतदानाचा हक्क बजावत नाहीत, यावर बरीच चर्चा झाली. तरीही उरल्यासुरल्या कर्तव्यदक्ष नागरिकांनी या देशाच्या पारडय़ात ‘स्थैर्य’

 

टाकलं एकदाचं! ‘टाकलं’ असं म्हणण्याचं कारण असं की, जर भरघोस मतदान झालं असतं तर कदाचित हे सुगीचे दिवस दिसले नसते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर ‘एकसत्ता’ आली नसती. भरघोस मतदान झालं असतं, तर कदाचित मतं चौफेर पसरली असती. उन्हाळा संपता संपता शिडकावा व्हावा, असं वाटत असताना अचानक पावसानं झोडपून काढावं आणि उभ्या पिकांची नासाडी व्हावी तशी गत झाली असती, तशी मतविभागणी झाली असती.
आणि मग ते कडबोळ्याचं सरकार स्थापन करताना सुरू झाला असता डोंबाऱ्यांचा खेळ! आपली ऐपत, आपली कुवत आहे की नाही याचा विचार न करता प्रत्येकाला आधीच त्या सत्तेच्या दोरीवर चढायची घाई झाली होती. खरं तर या डोंबाऱ्याच्या खेळात सत्तेच्या दोरीवर चालताना एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचायला तब्बल ५ वर्षं तोल सांभाळत चालावं लागतं; पण आपले हे हपापलेले लोकप्रतिनिधी, पंतप्रधानपदाचं मृगजळ बघत, स्वप्नात त्या दोरीवरून तोल सांभाळत चालले असते तरी त्याचं अर्ध लक्ष दोरीपलीकडच्या कृषिप्रधान देशाकडे आणि अर्ध लक्ष दोरी अल्याडच्या, ट्वेन्टी ट्वेन्टी हिरवळीकडेच गेलं असतं आणि मग आपल्या सुरक्षिततेची, संरक्षणाचीही ऐशीतैशी झाली असती, पण अशा या डोंबाऱ्याच्या खेळातल्या निर्लज्ज खेळाडूंना त्याचं काही वाटलं नसतं. तोल गेला असता तरी औटघटकेसाठी का होईना, पण खुर्चीची ऊब मिळाली, या आनंदात ते मश्गूल राहिले असते. म्हणजे गिरे तोभी टांग उप्पर!
याचा प्रत्यय या देशातल्या सुजाण नागरिकाला यापूर्वी आलाय म्हणून तर कदाचित त्याने मतदानाच्या वेळी ‘तटस्थ’ भूमिका घेतली नसेल ना? १९४७ साली हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सलग १७ वर्षे या देशाची ‘पंतप्रधानाची’ खुर्ची अबाधित राहिली; परंतु हा देश स्वतंत्र होऊन सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल होण्याआधीच या देशावर १९९६ रोजी फक्त १३ दिवसांचा पंतप्रधान बघण्याची नामुष्की आली. सत्तेसाठी हपापलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींनी तेव्हा या सार्वभौम देशाचे ‘तेरावे’ घातलं होतं. आपल्या खासगी आयुष्यात सुद्धा एखाद्याने इतका लाजिरवाणा १३ दिवसांचा दुखवटा पाळला नसेल. ‘माननीय अटलजींनी’ तेव्हा या १०० कोटी लोकसंख्येच्या देशाचं फक्त १३ दिवस पंतप्रधानपद भूषवलं होतं तेव्हा ‘लोकशाही’ संपली की काय असं वाटलं होतं. पंतप्रधानांची खुर्ची म्हणजे कुठल्याशा शाळेच्या चपराशाची खुर्ची नव्हे पण मग तीही या देशाच्या आम्हा नागरिकांच्या लोकप्रतिनिधींना फक्त १३ दिवसांसाठी खेळायला घ्यावीशी वाटली? याची आम्हा नागरिकांनाच लाज वाटत होती.
मग आमचा देश पुन्हा तरुण झाला. ‘सिंग इज किंग’ म्हणत जल्लोषाचं ‘जय हो’ म्हणू लागला. ‘जय हो, जय हो’ गुणगुणत आपल्या देशातल्या गरिबीचं, लाचारीचं, बेकारीचं, हगनखडीचं दर्शन घडवणाऱ्या ‘स्लमडॉग’चं आम्ही स्वागत केलं. तसंच ‘जय हो’चा ललकार करत आम्ही या लाचार हपापलेल्या लोकप्रतिनिधींना थोडय़ा प्रमाणात का होईना पण त्यांची जागा दाखवून दिली. मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावर झुणका-भाकर आणि वडापाव संमेलन भरवण्यात वेळ घालवणाऱ्यांना खऱ्या ‘मराठी बाणा’ची जाणीव करून दिली. आयुष्यभर दलित- ब्राह्मणवाद रंगवणाऱ्यांना गळ्यात खोटी जानवी घालून हत्तीवरून साखर वाटण्यापासून आम्ही रोखलं, बिहार-युपीमधला तो ‘कंदील’ पार महाराष्ट्रापर्यंत आपल्या छटपूजेची जागा हुडकत आला होता, त्याला कंदिलाची वात काढून अंधार दाखवला. डाव्याची डावखुरी खुमखुमी मोडीत काढत, ‘वाम’मार्गाला जाण्यापासून परावृत्त करत, तिथे सुजलाम सुफलाम विचारांसाठी ‘तृणमूल’ उभं राहिलं आणि भल्या भल्या प्रस्थापितांना आपापल्या समाजाच्या कैवाऱ्यांना चक्क साईबाबांच्या आशीर्वादानं निळं आसमान दाखवलं, इथल्या सुजाण आणि तरुण
नागरिकांनी!
पण ओये इस देशके पुत्तर या यशाच्या भ्रमात आता तुम्ही जास्त काळ लोळत बसू नका. ज्या नागरिकांनी तुमच्यावर आता देश ‘चालवायची’ जबाबदारी टाकली आहे त्यांनाही तुम्ही आता घरचा आहेर द्या. त्यांनाही तुम्ही आता ‘चालचलन’ शिकवा. त्यांच्यासाठीही आता काही कडक नियम बनवा. देशाच्या कानाकोपऱ्यात चारही बाजूंनी ट्वेन्टी-ट्वेन्टीच्या अंतरावर शत्रू टपलेले असताना, अतिरेक्यांनी देश पोखरलेला असताना आमचा देशवासी आणि लोकप्रतिनिधीसुद्धा ट्वेन्टी ट्वेन्टीच्या जुगारात रममाण आहे हे बघून शरम वाटते. ‘जुगार’ हेच विशेषण वापरण्याचं कारण असं की, या ट्वेन्टी-ट्वेन्टीमध्ये किती करोडे रुपयांचा चुराडा होतोय याचा आपण खरंच विचार करत नाही आहोत का? मग यावर कोणाचाच अंकुश का नाही?
अजून किती दिवस पोसणार आहोत आम्ही पकडलेल्या अतिरेक्यांना? दहशतवाद संपवण्याची भाषा तुमच्या ओठांवर आहे पण मग कुठे ठसका लागतोय? कुठे अडकतोय हा घास? का तुमच्या फक्त ओठांवर असलेल्या या दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या भाषेचं आम्ही लिपस्टिक लावलेल्या ओठांसारखं कौतुक करायचं? ‘स्थैर्य’ मिळेल या अपेक्षेने जर लोकांनी तुम्हाला ‘किंग’ बनवलं असेल तर खरंच तुमच्याकडून कल्याणकारी राजा असण्याची अपेक्षा आहे. कोणाच्या हातचं बाहुलं असण्याची नव्हे.
‘उदारमतवादी भारतीय असं जर कोणी आपल्याला म्हणत असेल तर त्या कौतुकाने भारावून जाऊन आपण सगळ्यांनाचा ‘अतिथी देवो भव’ म्हणत आपल्या हक्काचा घास त्यांच्या नरडय़ात घालतोय ही वस्तुस्थिती नजरेआड करू नका. केवळ विरोधी पक्षीयांची तोंडं बंद करण्यासाठी या परप्रांतियांना जिलबीचे घास भरवणे या देशाला कसं परवडतं?
२०० वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्तानं या देशात इस्ट इंडिया कंपनीने शिरकाव केला आणि आपण सारे त्या मधाळ भाषेला आणि गोऱ्या कातडीला भुललो, हा इतिहास फक्त शालेय पुस्तकापुरताच मर्यादित राहणार का? का त्या दाहक अनुभवाचे चटके आपण आयुष्यभर लक्षात ठेवून यापुढे शहाण्यासारखे वागणार? या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? याकडे एक राज्यकर्ते, शासनकर्ते म्हणून तुमचा अंकुश अपेक्षित आहे हो, सिंगजी!
भारतीय बाजारपेठेत आज जानव्यापासून लंगोटापर्यंत प्रत्येक वस्तू चायनीज बाजारपेठेतून बिनदिक्कत येते आहे. ते बाहेरचे संधीच बघताहेत येनकेनप्रकारेण इथं शिरकाव करायची! पण म्हणून त्यांच्यासाठी लाल गालीचे पसरवून सर्व मार्ग (आता तर समुद्रमार्ग सुद्धा) खुले करण्याची इतकी घाई का? आमचे शेजारी तर भगदाड पाडायलाच बसले आहेत, भिंती तर कधीच भुसभुशीत करून ठेवल्या आहेत त्यांनी!
वाहे गुरू! तुसी ग्रेट हो! तुमच्या नुसत्या नावानं इथल्या अर्थकारणाचा, इथल्या शेअर बाजाराचा उच्चांक वाढत जातो. तसाच तुमच्या कठोर नेतृत्वाचा सुद्धा इथल्या देशविघातक प्रवृत्तींना दरारा वाटायला हवा. शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा, अतिरेक्यांच्या फाशीचे दोर जास्त आवळायचा कणखरपणा दाखवा. पक्षीय राजकारण, सत्तेसाठी हावरटपणा, गरिबीचं ‘चकचकीत’ दर्शन, बेकारीची कुऱ्हाड, एकमेकांवरच्या कुरघोडय़ा, भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग आणि वाढत जाणारा चंगळवाद या सगळ्याचा आता आम्हाला कंटाळा यायला लागला. ‘मेरा भारत महान’ म्हणायची जबाबदारी फक्त जनतेवर टाकून, सत्तापिपासू राजकारण्यांनी मात्र ‘माझा भारत गहाण’ ठेवायची जणू स्पर्धाच ठेवली आहे, असं वाटतं.
अनायसे आता इथली जनता तुमच्या प्रेमात पडलेलीच आहे. ‘जय हो’ आणि ‘सिंग इज किंग’ ही घोषवाक्यं, आपल्या राष्ट्रगीतासारखी गुणगुणायला लागली आहे; उसकी लाज रखियो! ‘सिंग इज किंग’ ही उक्ती खरी ठरो आणि या देशाला भविष्यात तुमच्या अस्तित्वाने ‘सोनियाचे दिवस’ बघण्याचे भाग्य मिळो.
संजय पेठे
sanjaypethe@yahoo.com