Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
मदर तेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांच्या सान्निध्यात प्रतीत होणारी विशुद्ध महानता मला मुख्तार माईच्या व्यक्तिमत्त्वातही जाणवते. मीरवाला या लहानशा खेडेगावात राहणारी मुख्तार माई प्रथमदर्शनी शांत, काहीशी बुजरी वाटते. परंतु गावात तिच्याबरोबर फिरत असताना ‘बलात्कार, निरक्षरता, स्त्रियांवरील अत्याचार’ याविरुद्ध लढणाऱ्या मुख्तारमधील ताकद जाणवते. साऱ्या पाकिस्तानात, इतकंच नव्हे तर संपूर्ण जगातच तिने सुरू केलेल्या चळवळीचा डंका वाजतो आहे. मुख्तारच्या कहाणीची पाश्र्वभूमी सर्वाना माहिती आहेच, तिच्या धाकटय़ा भावावर लफडं केल्याचा खोटा आळ घालण्यात आला. या अपराधासाठी मुख्तारवर सामूहिक बलात्काराची सजा पंचायतीने फर्मावली. शिक्षेची अंमलबजावणीदेखील तात्काळ करण्यात आली. कुचेष्टा करणाऱ्या जमावाच्या नजरा चुकवीत अर्धवस्त्रावस्थेतील मुख्तार

 

कशीबशी घरी पोहोचली होती. या प्रकारानंतर तिने निमूटपणे आत्महत्या करावी, अशी सर्वाची रास्त अपेक्षा होती. ती अपेक्षा मुख्तार पूर्ण करणारही होती, परंतु नंतर शरमेची जागा संतापाने घेतली. जीव देऊन अपराध्यांना मोकळं सोडण्याऐवजी तिने त्यांना कोर्टात खेचलं. साऱ्या जगासमोर आपली कैफियत मांडली.
एवढय़ावरच मुख्तार थांबली असती, तर अन्य असंख्य पीडित स्त्रियांमध्ये तीही एक, असं समजून प्रकरणावर पडदा पडला असता. सुदैवाने तसं झालं नाही.
नुकसानभरपाईदाखल मिळालेल्या पैशांमधून मुख्तारने गावात शाळा सुरू केली. जुलमी सरंजामशाहीविरुद्ध लढण्यासाठी लोकशिक्षण हा एकमेव मार्ग आहे, यावर तिचा दृढविश्वास होता.
मुख्तारची कहाणी मीदेखील ऐकली होती. २००४ मध्ये पाकिस्तानला गेलो असताना मी तिला भेटण्यासाठी मीरवाला गावाला भेट दिली. (त्या वेळी ती मुख्तरनबीबी या नावाने ओळखली जाई.) इस्लामाबादहून लाहोर, तिथून मुलतान असा विमान प्रवास आणि नंतर अनेक तासांचा मोटार प्रवास, अशी मजल- दरमजल करीत मी मीरवाला गावी पोहोचलो. मीरवालात तेव्हा वीज पोहोचली नव्हती. तिच्या घरी तिचे भाऊ, वडिलांची भेट झाली. ती मात्र मागेच होती. एखादी तडफदार, तेजस्वी स्त्री भेटेल या अपेक्षेने गेलो असतो, तर माझी निराशाच झाली असती. मला ती संकोची स्वभावाची, काहीशी जुन्या वळणाची वाटली. बहुधा, ‘बाईने जास्त बोलू नये,’ असा विचार करून ती फारसं बोलत नव्हती. सुरुवातीला तिचे वडील आणि भाऊच माझ्याशी संभाषण करीत होते.
नंतर मात्र ती माझ्याबरोबर मोकळेपणाने बोलायला लागली. बलात्कारानंतर वाटलेली शरम, अखंड अश्रू गाळणं, कुटुंबीयांची तिच्यामुळे झालेली बेअब्रू या विषयी ती नि:संकोचपणे बोलली. शाळेविषयी ती अतिशय उत्कटपणे सांगत होती. हळूहळू तिने संपूर्ण संभाषणाची सूत्रं स्वत:कडे घेतली. ‘शाळेसाठी पैसे कमी पडताहेत. शिक्षकांचा पगार देण्यासाठी घरातील दागिने विकावे लागले. काय करावं समजेनासं झालंय,’ ती म्हणाली, ‘माझ्या संरक्षणासाठी तैनात केलेले पोलीस आता कंटाळलेत. त्यांच्याकडून ढिलाई झाली तर माझ्या जिवाला धोका आहे,’ असेही ती पुढे म्हणाली. मुलाखत संपल्यावर नंतर तिने मला एका बाजूला नेलं आणि ‘मदत करण्यासाठी’ कळकळीची विनंती केली. तिच्या आवाजात असा काही आवेश होता, की प्रथमदर्शनी बुजरी वाटलेली मुख्तार हीच का, असा विचार माझ्या मनात आला.
मी मुख्तारवर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षांव झाला.
अमेरिकेतील वाचक तिच्या कहाणीने हेलावून गेले. मदतीचा ओघ सुरू झाला. ‘चेक पाठवा. मी ते तिच्याकडे पोहोचते करीन,’ मी आनंदित होऊन जहीर केलं. ‘मर्सी कॉर्पस’च्या मदतीने मी सारे चेक मुख्तारकडे पाठवले. तब्बल एक लाख साठ हजार डॉलर्स जमले. त्यातून तिने व्हॅन खरेदी केली. अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्कूल बस असा दोन्हीसाठी या व्हॅनचा उपयोग होणार होता. उरलेल्या पैशांमधून माध्यमिक शाळा उभारायचं काम सुरू झालं.
नंतर न्यूयॉर्क आणि मीरवाला अशा दोन्ही ठिकाणी मी मुख्तारला अनेकदा भेटलोय. अमेरिकेत ती भव्य मेजवान्या, व्हाइट हाऊसमधील स्वागतसमारंभ, आलिशान हॉटेलात सत्कार अशा प्रसंगी हजर असली, तरी ‘कधी एकदा मायदेशी परतते’ असं तिला वाटत राहतं. एकदा न्यू यॉर्कमधील अतिप्रतिष्ठित लोकांसमवेत मेजवानीला गेली असताना तिने चक्क पाकिस्तानी जेवण मागवलं! अमेरिकेतील अत्याधुनिक वातावरण पाहून तिला धक्का बसेल असं मला वाटलं होतं. ती मात्र सारंच सहजपणे अनुभवत होती. ‘ग्लॅमर’ मासिकात तिच्यावर आलेला लेख आणि फोटो पाहताना ती जराही लाजली वा संकोचली नही. (ग्लॅमरसारख्या फॅशनला वाहिलेल्या मासिकातील तिचे संपूर्ण अंग झाकणाऱ्या कपडय़ांमधील फोटो, हा एक मोठाच विरोधाभास होता!) न्यूयॉर्कमध्येदेखील तिच्या मस्तकावर आच्छादन असतंच. पाकिस्तानी असल्याचा अभिमान तिच्या वागण्यातून जाणवत असतो.
मुख्तारमुळे पाकिस्तानला जगभर प्रसिद्धी आणि सर्वाच्या सदिच्छा मिळाल्या हे खरं असलं, तरी पाकिस्तान सरकारने मात्र तिला त्रासच दिला. याची दोन कारणं असवीत. पाकिस्तानी समाजव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगून ती देशाला बदनाम करते आहे, असं सरकारला वाटतंय. दुसरं म्हणजे पंजाबमधील बारक्याशा खेडेगावातील एका य:कश्चित अडाणी बाईला जगभर नावलौकिक मिळतोय, तिच्या धाडसाचं कौतुक होतंय, या गोष्टीचा पाकिस्तानी नेत्यांना मत्सर वाटत असावा. परिणामत: त्यांनी सतत तिची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न केला आहे.
मुख्तार अमेरिकेत एका परिषदेसाठी जाणार होती तेव्हाचं उदाहरण घ्या : खुद्द राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी तिने देशाबाहेर जाऊ नये यासाठी ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये तिचं नाव टाकण्याचं फर्मान काढलं. अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट जप्त केला. याबद्दल तिने जाहीर तक्रार केली. परिणामी अधिकाऱ्यांनी तिचं अपहरण करून तिला इस्लामाबादला नेलं. तरीही मुख्तारचा आवाज बंद झाला नाही. राष्ट्राध्यक्ष मुशर्रफची चांगलीच नाचक्की झाली. झुंजार मुख्तारची प्रतिमा अधिकच उजळली.
आमना बत्तारकडून समजली ती घटना सर्वात जास्त धक्कादायक आहे. ब्रिगेडियर ईजाज शाह हे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे अत्यंत निकटचे स्नेही. २००५ मध्ये आमना बत्तारला धमकी देण्यासाठी ते लाहोरला गेले होते. आमना पाकिस्तानी- अमेरिकन डॉक्टर असून, एक मानवी हक्क संघटना चालवते. (www.4anna.org) तिने मुख्तारला सतत प्रोत्साहन दिलं आहे. अमेरिकेच्या वाऱ्यांमध्ये तीच मुख्तारच्या सोबत जाई, तिच्या दुभाष्याचं कामही तीच करीत असे. पाकिस्तानी स्त्रियांच्या हक्कासाठी अखंडपणे झगडत असे. ब्रिगेडियर महाशय आमनाला धमकीवजा ताकीद देताना म्हणाले, ‘तू आणि मुख्तारने सांभाळून वागलेलं बरं. उगाचच संकटांना निमंत्रण कशाला देता?’
मुख्तार आणि आमनाच्या नियोजित न्यूयॉर्क भेटीचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, ‘आम्ही काहीही करू शकतो हे विसरू नका. न्यूयॉर्कमध्ये काळ्या लोकांना थोडे पैसे दिले तर त्या बदल्यात ते आम्ही सांगू त्याचा सहजपणे खून पाडतील.’
या बोलण्याला वर्णद्वेषाचा वास होताच, शिवाय आमना आणि मुख्तारचा अमेरिकेत खून होऊ शकतो, अशी प्रच्छन्न धमकीही त्यामागे होती. मी पाकिस्तान सरकारकडे याविषयी विचारणा केली असता, ब्रिगेडियर शहा आमनाला भेटल्याचं मान्य केलं; परंतु त्यांनी तिला कोणत्याही प्रकारची धमकी दिल्याचं मात्र साफ नाकबूल केलं!
२००५ मध्ये मुख्तारचं यूएनमध्ये भाषण होणार होतं. कित्येक आठवडय़ांपूर्वी सारी तयारी पूर्ण झाली होती. जाण्यापूर्वी ती माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आली असतानाच आयोजकांचा फोन आला. ‘पाकिस्तान सरकारच्या आदेशावरून मुख्तारचं भाषण रद्द करण्यात आलं,’ अशी बातमी त्यांनी दिली. पाकिस्तानी नेत्यांनी पुन्हा एकदा स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. अमेरिकेत काही लोकांनीच मुख्तारचं यूएनमधील भाषण ऐकलं असतं, परंतु बंदी घातल्याने न झालेल्या भाषणाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
पाकिस्तान सरकारने मुख्तारवर सतत दबाव टाकायचा प्रयत्न केला. तिचा पत्रव्यवहार जप्त केला जाई, फोन टॅप होत असे. सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांतून कायम तिच्याविषयी बदनामीकारक लेख छापून येत- ती परदेशात जाऊन मजा मारते; ती पाकिस्तान सरकारशी एकनिष्ठ नाही. ती परकीय (माझ्यासारख्या) तसंच भारतीय दलालांच्या तालावर नाचणारी बाहुली असून पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी त्यांना मदत करत असते.. वगैरे वगैरे.
मुख्तार अतिशय संवेदनशील असल्याने अशा जहरी टीकेमुळे तिला कमालीचा त्रास होई, परंतु नंतर तिच्यामध्ये परिपक्वता आणि कणखरपणा येत गेला. भावांची परवानगी घेतल्याविना ती घराबाहेर पडत नसे हे पूर्वी पाहिलं होतं, परंतु नंतर तिची जगभर भटकंती सुरू झाली. परराष्ट्रमंत्र्यांच्या हातून सत्कार घडू लागले. अशा परिस्थितीत भावांची परवानगी मागणं हा चक्क वेडेपणाच ठरला असता. नीतिनियम तोडून कुठे जायचं हे निर्णय तीच घेऊ लागली. भावांना अर्थातच ही गोष्ट आवडली नाही. त्यांची एकमेकांवर माया आहे; परंतु ‘स्त्रीला कितपत स्वातंत्र्य असावं’ या गोष्टीवरून मूलभूत विरोध आहेच. सर्वानाच यामुळे मानसिक त्रास होत असतो.
२००६ साली मार्चमध्ये मी पुन्हा एकदा मीरवाला गावी गेलो. मुख्तारच्या शाळा पाहून मी खूप प्रभावित झालो. बरीच नवीन साधनसामग्री आली होती. इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना चक्क इंग्रजी बोलता येत होतं! उच्च माध्यमिक शाळेचं बांधकाम चालू होतं. प्राथमिक शाळेच्या वार्षिक समारंभामध्ये छोटय़ा मुलांनी सुंदर नाटुकलं सादर केलं. ‘लवकर विवाह केल्याने होणारे तोटे’ हा विषय होता. (पत्नीचा खून होतो हा सर्वात मोठा तोटा दिसून आला.) मीरवाला गावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे मुलींना शाळेतून काढू नये म्हणून मुख्तार त्यांच्या आईवडिलांच्या हात धुवून मागे लागत असे. प्रसंगी रागवायचीसुद्धा. सिद्रा नावाच्या चौथीतील मुलीच्या आईवडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे शाळा बंद! मुख्तारला हे कळताच तिने सूत्रं हाती घेतली. दमदाटी करून त्यांना निर्णय बदलायला लावला. सिद्राची शाळा चालू आहे. तिला शिकून डॉक्टर व्हायचंय.
याच कारणासाठी मुख्तारला गाव सोडून कुठेही जायचं नाही. तिला शहरात वा परदेशी सुरक्षितपणे आणि आरामात राहता येईल, परंतु काहीतरी केल्याचं समाधान मिळतंय. त्याचं मोल कितीतरी अधिक आहे. ध्येयपूर्तीसाठी मुख्तार अथक प्रयत्न करते आहे.
अत्यंत व्यथित करणाऱ्या गोष्टी मुख्तारच्या घरी पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून पीडित, दु:खी स्त्रिया मुख्तारला भेटायला येत असतात. ती नक्कीच आपल्याला मदत करील, मार्ग दाखवील अशी आशा बाळगून त्या मिळेल ते वाहन पकडून तिच्या घरी येतात. प्रत्येकीची दर्दभरी कर्मकहाणी वेगळी, पण सर्वात भयानक प्रकार म्हणजे बाईचं नाक कापून तिला जन्माची अद्दल घडवायची. पाकिस्तानात अशी शिक्षा सर्रास दिली जाते. मुख्तार सर्वाना जमेल तशी मदत करते. त्यांना डॉक्टर अथवा वकील मिळवून देते. काही मार्ग निघेपर्यंत त्या बायका मुख्तारच्या घरीच मुक्कामाला असतात. रोज रात्री किमान दहा-बारा जणी मुख्तारच्या खोलीतच जमिनीवर तिच्या बाजूला पथाऱ्या टाकून झोपायला असतातच. (मुख्तारने तिची कॉट, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नसीम अख्तर यांना दिली आहे.) एकमेकींच्या कुशीत, एकमेकींचं सांत्वन करीत साऱ्याजणी झोपायचा प्रयत्न करतात. अत्यंत कठीण परिस्थिती असली तरी त्यांनी आशा सोडलेली नसते. परिस्थिती बदलते आहे. स्त्रिया अन्यायाचा प्रतिकार करताहेत हे त्यांच्याकडे पाहून पटतं.
बलात्कार झालेली स्त्री आत्महत्या करून सारं संपवून टाकीत असे. आता मात्र मुख्तारचा कित्ता गिरवणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या डॉक्टर शाझिया खालिदसारख्या स्त्रिया बलात्कार-विरोधी चळवळीचं नेतृत्व करीत आहेत. ‘मुख्तारमुळेच अन्यायाचा प्रतिकार करायची प्रेरणा मिळाली.’ हे डॉक्टर शाझिया सर्वप्रथम मान्य करते. आत्महत्या करण्याऐवजी अत्याचार करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचे प्रकार वाढत चालल्यामुळे मीरवाला भागातील बलात्काराचं प्रमाण कमी होत आहे. स्त्रियांवरील दडपशाही कमी व्हावी यासाठी मुख्तार करीत असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश येताना दिसून येतंय. पाकिस्तानी मनोवृत्ती बदलते आहे.
‘इन द नेम ऑफ ऑनर’ ही केवळ धैर्य आणि वैफल्य यांची कहाणी नसून, त्यातून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. आत्यंतिक धैर्य आणि मनोनिग्रह यांच्या बळावर मुख्तारने सामूहिक बलात्कारासारख्या भीषण प्रसंगावर मात केली. खचून न जाता झगडली, इतरांना आशेचा किरण दाखवला. मुख्तारला मी महान समजतो, त्याचं हेही एक कारण आहे. लाजऱ्याबुजऱ्या खेडवळ मुख्तारमध्ये मला एका धाडसी, झुंजार ‘हीरो’चा साक्षात्कार होतो.
निकोलस डी. क्रिस्टॉव्ह