Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी.. फार लहानपणी एक गोष्ट वाचली होती. मला नक्की आठवत नाही पण बहुतेक मुल्ला नसरुद्दीनची असावी. मुल्ला आठवडय़ाच्या बाजारातून एक गायीचे वासरू विकत घेतो आणि घरी घेऊन निघतो. वाटेत एक माणूस भेटतो म्हणतो अरे वा.. डुक्कर छान आहे. मुल्ला चिडतो. तो म्हणतो हे डुक्कर नाही, वासरू आहे. पुढे चार माणसं पुन्हा पुन्हा त्याने न घेतलेल्या डुकराची तारीफ करताना त्याला भेटतात आणि त्याला असं वाटू लागतं की खरोखरच त्याने डुक्कर विकत घेतलं

 

आहे. तो त्याच्याकडे निरखून पाहतो आणि त्याला गायीच्या वासरात डुक्करच दिसू लागतं. तो त्या गायीच्या वासराला डुक्कर म्हणून सोडून देतो आणि कर्माला दोष देत घरी जातो. मूर्खपणा इथे संपत नाही. ती जी चार माणसं त्याला डुकराची तारीफ करणारी भेटलेली असतात त्यांची एक टीम आहे आणि ते एकत्र येऊन गायीचे वासरू केवळ मानसिक युद्धातजिंकल्यामुळे फुकट मिळवतात. तात्पर्य काय? एकच मूर्खपणा हजारवेळा केला तर तो शहाणपणा वाटू शकतो. गोबेल्सने हेच केले. वारंवार चुकीचा प्रचार केला की तो खरा वाटतो याचा त्याने रेडियोवरून उत्तम वापर केला आणि राजकारण केले.
आता हे सगळं सुचण्याचं कारण हेच की आपल्या आजुबाजूला जी भाषा वापरली जाते, जे अज्ञान प्रकट केले जाते त्यातला फोलपटपणा आपल्याला कळूनही आपण काहीही करत नाही. मराठी माणसाची विनोदबुद्धी नावाजली जाते. ती इथे त्रासदायक ठरते. आपण विनोद म्हणून काही गांभीर्याने घेतच नाही. दोन तीन उदाहरणे देतो. बीपीएल मोबाइलचा लूप मोबाइल झाला. त्यांनी जाहिरातींचा महापूर केला. आमचं नाव बदललंय हे सांगण्यासाठी. पण कॉपी काय? ‘माझा मुंबई, माझा नेटवर्क’ कोण हा शहाणा हे लिहिणार? आणि त्याचं आपल्याला काहीही वाटत नाही? आपण फक्त हसतो?
दुसरं उदाहरण तर याहूनही घाणेरडं आहे. हल्ली टीव्हीवर, वर्तमानपत्रात सगळीकडे कुरकुरेची नवीन कॅम्पेन चालू आहे. नोटा मोजणारी माणसं.. त्यात एक गोगलगायीसारखा नोटा मोजणारा माणूस. मग जुही चावला या सगळ्यांच्या मध्ये कव्वाली गायला बसल्यासारखी बसते आणि कुरकुरे खाऊ घालते आणि तो माणूस फटाफट नोटा मोजू लागतो. त्याची डोक्यावरून पदर घेतलेली बायको नवऱ्याकडे पाहून म्हणते ‘वाकडा आहे पण माझा आहे..’ म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? याची हिंदीतली मूळ कॉपी आहे.. ‘टेढा है लेकिन मेरा है..’ तीही तेवढीच अश्लील आहे. पण याचे भाषांतर मराठीत करणारा हा कोण महाभाग आहे? आणि का ही अशी मराठी आम्ही चालवून घ्यायची? यांच्या गळ्यात चपलांचा हार का नाही घातला जात? मराठीत ओरिजनल कॉपी लिहिणारे लोकं नाहीयेत असं यांना वाटतं का? नाही.. त्यांना तसं नाही म्हणायचंय.. पण त्यांचा मराठी लोकांच्या सहिष्णूतेवर पूर्ण विश्वास आहे.. अशी गाढव जाहीरात करूनही आपलं काहीच ‘वाकडं’ होणार नाही हे त्यांना पक्क माहीत आहे.
रेड एफएमची टॅक्सींच्या मागे लिहिलेली कॅचलाईन काय आहे.. ‘आपका किसीने बजाया, अब आप उसकी बजाओ..’ ही काय लाईन आहे? ही वाचून आम्ही हसावं अशी अपेक्षा आहे? पुन्हा तेच लॉजिक. लोक हसून सोडून देणार. खात्रीच आहे. उद्या होईल काय हीच आपली अधिकृत भाषा होईल. आताच भाषेने इतकं धेडगुजरी स्वरूप घेतलं आहे. पण हा कळस आहे. रेड एफएमला विचारा ते सांगतील आपका किसीने बँड बजाया’ असं आम्हाला म्हणायचं आहे. बँड बजाना म्हणजे एखाद्याची वाट लावणे.. ठीक आहे.. पण मग हिंदीचं व्याकरण आम्हाला कळत नाही? पुढची लाईन अभी आप उसकी बजाओ अशी कशी असू शकते? उसका बजाओ म्हणा मग.. अश्लीलता पाहणाऱ्यांच्या, वाचणाऱ्यांच्या मनात असते हे जरी खरं असलं तरी हे सरळसरळ आक्रमण आहे.. अ‍ॅडव्हर्टायझिंग कौन्सिल नावाची एक संस्था आहे. जाहिराती संदर्भातल्या तक्रारी तिथे करता येतात. करा.. ही जाहिरात मागे घेतली जाईल. पण तोपर्यंत ती पन्नास लाख वेळा दाखवून हॅमर करून झालेली असेल.. ही तर अस्वस्थ करणारी ढोबळ उदाहरणे झाली. बेअकलीपणामुळे विनोदी जाहिराती केल्या जातात त्याच्याकडे विनोद म्हणून पाहता तरी येतं. या जाहिरातींकडे तसं नाही पाहता येणार.
विनोद म्हणून कोणत्या जाहिरातीकडे पाहता येईल? उदाहरण सांगतो.. आता महिन्याभरापूर्वी सगळ्या प्रमुख पेपरमधून रेल्वेमधल्या भरतीची जाहिरात केली गेली होती. कल्चरल कोटय़ामधून त्यांना भरती करायची असावी. त्यात गायक, वादक, संगीतकार अशांना अर्ज करायला सांगण्यात आलं होतं. हे नक्की त्या क्षेत्रातले आहेत हे कळावं म्हणून त्यांना अर्जासोबत रेडिओ स्टेशनचे आर्टिस्ट असल्याचे प्रमाणपत्र जोडायला सांगितले होते. इथपर्यंत सगळं उत्तम आहे. पण या यादीत कोरिओग्राफर म्हणजे नृत्य दिग्दर्शकाची पोस्ट होती, त्यांनाही रेडिओचं प्रमाणपत्र आणायला सांगितलं होतं. रेडिओवर नृत्य दिग्दर्शक कशाला लागत असेल? ते का प्रमाणपत्र देतील? हसायचं की रडायचं हे वाचून?
आतापर्यंत तर मराठी चॅनेल्सवर हिंदीच जाहिराती सर्रास दाखवल्या जात होत्या. पण मराठी चॅनेल्स चांगली चालायला लागल्यामुळे किंवा आणखी कशामुळे असेल आता हिंदी, इंग्रजी भाषेतल्या मूळ जाहिरातींचं रूपांतर मराठीत करून दाखवलं जातं. ते पाहून तर ‘भीक नको पण पण कुत्रं आवर’ अशी वेळ येते. जोपर्यंत मराठी वर्तमानपत्रे, मराठी रेडिओ स्टेशन, मराठी चॅनेल्स हे सक्तीने मराठी भाषेतल्याच जाहिराती स्वीकारत नाहीत तोपर्यंत हे असंच होणार. वर्तमानपत्रे तर यात महादोषी आहेत. जाहिरातीतून पैसा मिळतो आणि त्यावर वर्तमानपत्र चालतं असं जरी असलं तरी पॉलिसी म्हणून तुम्ही हे सगळ्यांनी मिळून ठरवू शकता की नाही? की आम्ही फक्त मराठी भाषेतल्या जाहिराती घेऊ. हे करता येण्यासारखं आहे जर सगळ्यांनी केलं तर. तसं झालं तर मराठी माणसांना एक व्यवसाय क्षेत्र उपलब्ध होईल. सुरुवातीला वर सांगितल्याप्रमाणे घोडचुका होतील. पण मग एकदा वहिवाट झाली की चांगल्या जाहिराती होऊ लागतील. मराठी लोकांमध्ये गुणवत्तेची कमी जराही नाही. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान नाही हे मुख्य कारण आहे. त्या भाषेच्या प्रश्नावर आपण पेटून उठत नाही हे दुर्दैव आहे. बेळगावातल्या मराठी माणसांना मराठी भाषेची जेवढी चाड असेल तेवढीही मुंबई पुण्यातल्या मराठी लोकांना राहिलेली नाहीये.
बंगलोरच्या एका मराठी मंडळाने राहुल द्रविडला एका समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले तर तो एक तास केवळ उत्तम मराठीच बोलला. ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण खूश कशावर होतो.. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, माधुरी दीक्षित काय सुंदर मराठी बोलते यावर? त्यांनी मराठी बोलले तर त्यात कौतुकाचा काय भाग आहे? ते बोलायलाच हवं. तरी तेंडुलकर आणि माधुरीचं मराठी घाण आहे ही वस्तुस्थिती आहे. आपण आपलं गोड मानून घेतो. मराठी मुलगा दोन र्वष अमेरिकेला राहून आला की त्याला मराठी लगेच अडखळायला लागते कारण आपण मानसिक पातळीवर गुलाम आहोत. मराठी असण्याचा अभिमान वाटावा असं काही महाराष्ट्रात घडत नाहीये. प्रादेशिक अस्मिता जागृत होत नाही. म्हणून मुंबईतून काँग्रेस उमेदवार निवडून आल्यावर ‘मराठी माणसांना उत्तर प्रदेशने दिलेले हे उत्तर आहे’ असं कृपाशंकर सिंग म्हणू शकतो.
उत्तर भारतातून येणारे लोंढे महाराष्ट्राच्या पुढे दक्षिणेत का जात नाहीत याचा विचार केलाय? कारण एकच भाषेचे प्रेम.. लँग्वेज बॅरियर. तो एवढा मोठा आहे की दक्षिणेतल्या राज्यात जाऊन आपण धंदा करू शकणार नाही.. आपलं हिंदी कोणी ऐकणार नाही हे त्यांना पक्क माहीत आहे. मुंबईवर हल्ला झाल्यावर हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणारे आणि मुंबई केंद्रशासित करा असं म्हणणारे कोण होते? ज्यांना महाराष्ट्राने मोठं केलं असे हे पेज थ्रीवरचे भुक्कड लोक ही मागणी मुंबईत राहून करू शकतात. का? याचा विचार करायला हवा आहे. राजकारणावर लिहिणे हा हेतू नाहीये. पण माध्यमे जर राजकारणापासून दूर राहू शकत नसतील तर माध्यमांवर लिहिण्याच्या या सदरामध्ये राजकारणावर आणि भाषेवर लिहावंच लागेल. मराठी भाषा, मराठी संस्कृतीवरून रण पेटवणाऱ्या राजकीय पक्षांनी हे छुपं युद्ध चालू आहे याच्याकडे लक्ष द्यावं. त्यांना नाही असं वाटत.. अजून तरी.. पण तुम्हाला?
अभय परांजपे
asparanjape1@gmail.com