Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
काही करायचंय? मग लगेच करा की!! आपल्या सगळ्यांचीच काही स्वप्नं असतात, महत्त्वाकांक्षा असतात किंवा फक्त दुर्दम्य इच्छा असतात. पण आपण त्या नाही पूर्ण करत, ‘आपण आता मोठे झालोय’ किंवा ‘बाईच्या जातीला शोभतं का’ किंवा ‘ही काय वेळ आहे, नंतर करू’ अशी काहीबाही कारणं देत असतो. आपण का इतके थांबतो? आता लगेचच उठा आणि जे करायचं आहे ते करा.
एकदा आमच्या शेजाऱ्यांना मी एनफिल्ड मोटारसायकलवर (फटफटीवर) मस्तपैकी स्वार होताना बघितलं. त्याचा तो ‘धड धड धड’ आवाज चालूच होता. तेव्हा मी उत्स्फूर्तपणे शेजाऱ्यांना म्हणालो, ‘माझ्याकडे दुसरी मोटारसायकल आहे. पण तरीही माझ्या मनात नेहमी एक एनफिल्ड घ्यायचा विचार चालू असतो.’ ते लगेच म्हणाले, ‘इतका विचार नका करू, ताबडतोब घ्या!’
मी तसंच केलं आणि माझ्याकडे आता एक काळ्या रंगाची झकास फटफटी आहे, ती चालवणं मी खरंच खूप एन्जॉय करतो. काही दिवसांनी मी एका हॉटेलमध्ये जात होतो. माझी मोटारसायकल मी बाहेर पार्क केली. मी हॉटेलमध्ये शिरतच होतो तेव्हा

 

एक साठीच्या आसपास असलेले गृहस्थ माझ्याजवळ आले. ते म्हणाले, ‘माझी खूप इच्छा होती. एनफिल्ड घ्यायची, पण माझ्या आई-बाबांनी नाही घेऊ दिली’ माझ्या ओठावर आलं होतं की ‘इतका विचार नका करू, ताबडतोब घ्या!’ पण मी काही बोलणार तेवढय़ात त्यांची बायको ओरडली, ‘अहो, तुमच्या शरीराचं वय झालंय, आता मनाचं पण होऊ दे.’
नंतर ते माझ्या टेबलापाशी आले. त्यांची चाल मरगळलेली वाटत होती. ते थोडा वेळ थांबले, गप्पा मारल्या. त्यांना ती मोटारसायकल घ्यायची खूप इच्छा होती. ती इच्छा त्यांच्या आवाजातून, त्यांच्या डोळ्यांतून मला जाणवत होती. त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, त्यामुळे पैशाचा प्रश्न कधी आला नाही. बाकीचे त्यांच्या वाटेमध्ये आले. पडलेले खांदे, खिन्नता आणि एकाकीपणा यासकट ते त्यांच्या बायकोबरोबर निघून गेले.
मी ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली. माझा बारा वर्षांचा मुलगा स्टॉर्म म्हणाला, ‘जर का ते आनंदाने जगले नाहीत, तर हे जग आनंदाने कसं सोडतील?’ मला पटलं.. आयुष्यात आपण जे काही करतो ते जोखमीचं असतं. शेअर्समध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं असतं, बाईक चालवणं धोकादायक असतं, प्रेमात पडल्यावर कदाचित कोणीतरी दुखावलं जातं. पण त्याच वेळी बँकसुद्धा कर्जबाजारी होऊ शकते. ट्रेन रूळावरून घसरू शकते, प्रेम करायला कोणी नसणं हे जास्तं दुखवणारं असतं.
एक अनामिक म्हणतो-
‘जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा लोक म्हणायचे मोठय़ांचं ऐक. आता मी म्हातारा झालोय तर ते म्हणतात तरुणांचं ऐक. मी स्वत:चं कधी ऐकू?’
समाजाने घालून दिलेल्या रुढी, नियम पाळण्यातच आपल्या आयुष्यातला बहुतांशी वेळ निघून जातो. आपण जे करतोय ते समाज स्वीकारेल की नाही किंवा आपण जे करतोय ते योग्य आहे का, असे विचार लहानपणीच आपल्यात पेरले जातात. आपण मोठे झाल्यावर हे खोलवर रुजलेले विचार आपल्याच तोंडून बाहेर येतात. ‘मोठी माणसं पतंग उडवत नाहीत, ती खापरपाणी, लंगडी खेळत नाहीत.’ किंवा ‘एक घटस्फोटित स्त्री किंवा विधवा दुसऱ्या पुरुषाबरोबर बाहेर जात नाही!’ किंवा ‘मला सिनेमाला जायला कोणीतरी बरोबर लागतंच!’ ..हे सगळं का? हे तुम्हाला आवडत नाही किंवा विचित्र दिसत म्हणून? या जोखडातून स्वत:ला मुक्त करा. तुमचं आयुष्य तुम्हाला साद घालतंय. मग भले तुम्ही अठरा वर्षांचे असाल, चाळिशीचे किंवा सत्तरीचे.
जबाबदाऱ्या, कामं, पैशाचे प्रॉब्लेम्स तर नेहमीच असणार आहेत. पण तुम्ही इथे कायमचे आहात. तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी आहे ती तुम्ही स्वत: आणि तुमच्या गरजा. तुम्ही आनंदी असाल, समाधानी असाल तरच तुम्ही तुमच्या आजूबाजूला आनंद पसरवाल. लोक तुम्हाला सांगतील की, ‘खऱ्या दुनियेला सामोरा जा, स्वप्नांमध्ये रमू नकोस’ पण तुम्ही त्यांचं ऐकू नका. उलट, जे स्वप्न बघाल त्याची प्रत्यक्षात कल्पना करा. त्या स्वप्नात साऊंड असू दे, अ‍ॅक्शन असू दे, तुमच्या भावना असू देत. मग खडबडून जागे व्हा आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करा.
हिमालयातलं ट्रेकिंग असो किंवा तुमच्या हरवलेल्या प्रेमाला फोन करणं, युरोपमधील सहल असो किंवा मॉडेल म्हणून रॅम्पवर चालणं.. ते करा जरी ती शेवटची गोष्ट तुम्ही करणार असाल. पण लगेच करा!
म्हातारं झाल्यावर, जेव्हा कोणाला तुमची गरज नसते, फार कोणी तुमची पर्वा करत नसते, जे पर्वा करतात ते स्वत: आयुष्याची शेवटची इनिंग खेळत असतात किंवा शेवटाला टेकलेले असतात. तेव्हा मरण्यात काय तथ्य आहे? तुम्हाला जे करायचंय तेच करून तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण जगलं पाहिजे. काहीजण तुमच्याबद्दल नक्कीच वाईटसाईट बोलतील, पाठीमागून हसतील, पण ती अशी माणसं आहेत ज्यांनी आयुष्यात काही केलं नाही, काही करत नाहीत आणि समाजातल्या नियमांना, रूढींना कधीच आव्हान देणार नाहीत. तुमचं स्वप्न जेव्हा पूर्ण होत असतं तेव्हा त्यातला थरार या लोकांना कसा कळणार?
तो थरार.. जेव्हा आपण विमानातून १००० मीटर खाली उडी मारत असतो तो मोकळेपणा.. जेव्हा आपलं पॅराशूट उघडत असतं आणि तो सुटकेचा श्वास.. जेव्हा आपण तरंगत तरंगत आपले पाय जमिनीवर टेकवतो किंवा ४० व्या वर्षीसुद्धा सौंदर्यस्पर्धेत भाग घेतानाचा रोमांचक क्षण, जेव्हा तुम्ही सुंदर म्हणून गृहीतच धरले जात नसाल..
गेल्या कित्येक वर्षांत नियम सतत बदलत आहेत. आज जे नियम अस्तित्वात आहेत त्यातही आधी वर्षांनुवर्षे बदल होत आलाय. जर जुन्या नियमांना आव्हान दिलं गेलं नसतं तर आजही आपण त्याच नियमांच्या पाशात अडकून पडलो असतो. ‘मला काय करायचंय’ किंवा ‘हे असंच चालू आहे आणि असंच चालू राहणार’ असा दृष्टिकोन ठेवला असता तर कोणीच त्या नियमांना झुगारलं नसतं. साठच्या दशकापुढे आजच्या काळातले कपडे, संगीत अगदीच लज्जास्पद म्हणावं लागले. आजकाल नातेसंबंधांच्या व्याख्याही फारच बदलल्या आहेत. या सगळ्याचं कारण म्हणजे अशी काही लोकं, ज्यांना फक्त त्यांचा आजचाच दिवस दिसत नव्हता तर भविष्याबद्दलही चिंता होती.
तुमच्या मनात झाकून बघा.. तुम्हाला काय हवंय.. तुमच्या इच्छा, तुमची स्वप्नं.. आणि ती पूर्ण करण्यासाठी झटा. काही वेळेला तुम्हाला वाटतं की आपण आपल्या वाटेचं आयुष्य जगलो आता मी जी स्वप्न पूर्ण करू शकलो नाही ती स्वप्नं माझी मुलं पूर्ण करतील. हा फक्त तुमच्यावरचा अन्याय नाही तर तुम्ही मुलांना दिलेली शिक्षा आहे. ती मुलं तुमची स्वप्नं का पूर्ण करतील? त्यांच्या स्वत:च्या इच्छा-आकांक्षांचं काय?
स्वत:ला बदला.. अजूनही उशीर झालेला नाही. तुमची विचार करण्याची पद्धत बदला. आयुष्य पूर्णपणे जगण्यासाठी तुमच्या घरच्यांनाही प्रोत्साहन द्या. ‘कोणाला तरी आधी करू दे, मग मी करेन’ असं म्हणत कोणाची वाट बघत बसू नका. जे तुम्हाला आवडतं ते करा, जे कराल ते आवडून घ्या.
सावधानतेचा इशारा, कोणत्याही माणसाला, कोणत्याही गोष्टीला तुमच्या मनाचा, शरीराचा ताबा घ्यायला देऊ नका. आपण आपलं मन, आपली वागणूक स्वत:च्या ताब्यात ठेवली पाहिजे. आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं. ते योग्य प्रकारे जगा हेच खूप आहे.
अनुवाद- यशोदा लाटकर
dominiccostabir@yahoo.com