Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
कलेला मरण नसतं असं म्हणतात. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या स्वाती किनी या गृहिणीकडे पाहिलं की या वाक्याचा प्रत्यय येतो. स्वाती यांच्या घरात प्रवेश केल्यापासूनच त्यांनी केलेल्या कलाकुसरीने आपलं स्वागत होतं. घराची नेमप्लेट, टिपॉय, टेबल, भिंत, हॉलमध्ये कोपऱ्यात ठेवलेला भलामोठा रांजण, रंगवलेली छोटी मडकी.. परत परत पाहत राहवीत अशी जादू त्यांच्यावर स्वाती किणींच्या हाताने केली आहे!
इतर चारचौघींसारखंच खरंतर स्वाती यांचं आयुष्य. एकत्र कुटुंब, घरासाठी वाहुन घेतल्याने स्वत:चा विचार करण्याची न मिळणारी फुरसत इत्यादी इत्यादी. मग काही वर्षांंनी चौकोनी कुटुंबपद्धतीचा अवलंब केल्याने त्यांना आपली ही कला गवसली. ती जोपसण्यासाठी वेळ मिळाला. त्याबद्दल बोलताना त्या म्हणतात की, शाळेत असताना

 

माझी चित्रकला छान होती. पण आपल्यातील कलेचा विकास करावा याची जाणीव कधी झाली नाही. तसं वातावरणही कधी मिळालं नाही. पण आता माझ्या दोन्ही मुली मोठय़ा झाल्याने घरच्या जबाबदारीतून मी जरा मोकळी झाले आहे. मग फावल्या वेळेत काय करायचं, असं म्हणून ही आवड विकसीत करायला सुरुवात केली. आता वेळही चांगला जातो. समाधान मिळतं आणि थोडीफार मिळकतही होते.
आईच्या अंगातली कला दोन्ही मुलींनी चांगलीच उचलून धरली आहे. त्याही आपल्या आईच्या या कार्यात तिला मदत करतात. त्यांनी काढलेली चित्रं किणींच्या घरच्या भिंतींची शोभा वाढवतात. स्वातींच्या घरात सगळ्यात वैशीष्टय़पूर्ण काही असेल तर त्यांच्या हॉलमधील डायनिंग टेबलचा ‘पाय’! सामान्यपणे डायनिंग टेबल म्हणजे फार फार तर ग्लास टॉप वगैरे असलं की त्याचं कौतुक होतं. किंवा भिंतीला लागून फोल्डींगचं टेबल असलं की त्याला एकाच पायाची गरज असते. पण हे टेबल ज्या पायावर उभं राहतं त्याचा विचार करताना कोणी दिसत नाही. स्वातींच्या घरी या डायनिंग टेबलच्या खाली चक्क एक बाई उभी आहे! त्यांनी या टेबलचा खालचा भागही अशा प्रकारे रंगवला आहे, की टेबल फोल्ड केलं की ती बाई म्हणजे एक शोपीस वाटतो. ही कल्पना, खरंतर ही अफाट कल्पना कशी सुचली यावर त्यांच्याकडे ‘सुचली’ एवढंच उत्तर होतं. कला ही उपजतच असते याचच हे उदाहरण! तोच प्रकार त्यांनी साध्या टीपॉयलासुद्धा वापरला आहे. टीपॉयचा स्टँड म्हणजे चार पाय ही संकल्पनाच त्यांनी मोडीत काढली आहे. घराचं इंटिरीअर करताना सुताराकडून त्यांनी असे आकार कापून घेतले. आणि मग त्यात रंग भरले.
अशी माणसं कोणत्या गोष्टीचा वापर कशासाठी करतील याचा काही नेम नसतो. ‘एमसील’ हे नळ गळत असेल तर ऩळाला लावून पाणीगळती थांबवण्याचा पदार्थ. त्यापासून स्वातींनी चिमण्या, गुलाबाची फुलं इतक्या सुंदर प्रकारे तयार केलं आहे, त्याला तोड नाही. बोलता बोलता त्यांनी एक गुलाबाचं फुल तयारही करुन दाखवलं.
बेडरुममध्येही राधा-कृष्णाची मूर्ती वेलीवर झोके घेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.
ज्वेलरी बॉक्सवरही त्या नक्षीकाम करतात. एथनिक, राजेरजवाडय़ांच्या काळाची आठवण करुन देणारी नक्षी त्यांना विशेष आवडते. हे ज्वेलरी बॉक्स बघितले की ते जणू कोणत्यातरी राजवाडय़ातून उचलूनच आणलेत की काय असा प्रश्न पडतो! स्वयंपाकघरात ठेवण्यासाठी टी-ट्रे असतात. त्यावरही त्यांनी गुलाबाची फुलं, चिमण्या, घरटं, घर असा देखावा कोरला आहे. एमसीलपासून बनवलेल्या चिमण्यातर खरोखरच्याच आहेत असं वाटतं.
गेले आठ-दहा महिनेच त्यांनी ही कला जोपासायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या प्रयोग करुन बघू या एकाच तत्वावर त्यांचं काम सुरु आहे. मध्यंतरी त्यांनी एक प्रदर्शनही भरवलं होतं. त्यांच्या मैत्रीणीदेखील त्यांच्यासारख्याच हौशी असल्याने प्रत्येकीने या प्रदर्शनात आपला वाटा उचलला होता. या प्रदर्शनाला लोकांचाही भरपूर प्रतिसाद मिळाला, असं त्यांनी आनंदाने सांगितलं. या छंदाचं व्यवसायात रुपांतर करावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी वेळ लागेल याची जाणीवही. पण मैत्रीणी आणि नातेवाईकांकडून मिळणारं प्रोत्साहन या भांडवलावर त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने थोडा थोडा विचार करायला सुरुवात केली आहे. त्यांचे ग्राहकही आहेत त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईकच. आपण या सगळ्याला खूप उशीरा सुरुवात केली याची स्वाती यांना जाणीव आहे आणि खोलवर कुठेतरी दडलेली खंतही. पण या सगळ्या वस्तुंकडे बघितल्यावर त्यांची ही खंत दूर होत असणार यात शंका नाही. शिवाय दोन्ही मुलींची इतकी उत्तम साथ असल्यावर आणखी काय पाहिजे!
स्वाती किणी यांची ही कला त्यांना उशीरा गवसली असली तरी सुरुवात झाली आहे. तेच महत्त्वाचं. पण त्यांच्या हातातली जादू आणि डोक्यातली कल्पकता पाहता त्या हे साध्य करु शकतील असा विश्वास वाटतो.
नमिता देशपांडे