Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
‘मनी, I love you honey' `I love you too मन्या, माझ्या सोन्या.’
असे प्रेमळ संवाद आजकाल आपल्याला कुठेही ऐकायला मिळू शकतात. कॉलेज, मंदिर, रस्ता, बस, ट्रेन हे तर सोडाच पण अगदी शिशुवर्गातील, शी-शू करण्याइतपतही अक्कल नसलेली चिंटी-पिंटी प्रजा असं काही म्हणू शकते. जवळजवळ प्रत्येक हिंदी-मराठी वा आणखीन कोणत्या सिनेमातले असले टिपिकल डायलॉग्ज काही आपल्याला नवीन नाहीत. पण शाळेतल्या एखाद्या बालवर्गात असे कोणते बाळ कोणत्यातरी बाळीला म्हणाले तर आपण सर्वचजण तोंडात बोटे घालू.
काय? विश्वास बसत नाहीये? असं काही होत नसेल असं वाटतंय? अहो एकदा नीट लक्ष देऊन ‘भारताच्या उद्याच्या

 

भविष्याच्या’ बातचिती ऐका म्हणजे सगळं खरं काय ते कळेल.
एकविसाव्या शतकात सगळंच प्रगत, फास्ट आणि इन्स्टन्ट झालंय. तेव्हा प्रेमासारखी गोष्ट अशी काय मागे राहील? आता प्रेमही फास्ट, प्रगत (म्हणजे विकृत?), इन्स्टन्ट झालंय.
लव्ह आणि मॅरेजेस, चट मंगनी पट शादी या सगळ्याशी आपण सगळेच फॅमिलिअर आहोत. पण आता त्यात छोटासा बदल झालाय. तो असा ‘लव्ह, लव्ह आणि लव्ह’ किंवा ‘लव्ह आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ मॅरेजचा पत्ता कटत चाललाय.
मुलं-मुली तारुण्यात प्रवेश करतात ना करतात तोच प्रेमात पडतात. मिसरूड फुटावे तसे प्रेमाचे अंकुर टपकन फुटतात आणि अजाणतेपणी कोणी कोणालाही प्रपोज करतात, एकमेकांना आपलं सर्वस्व बहाल करण्याचे वचन देतात.
मग काय? सर्वप्रथम या प्रेमाचा अभ्यासावर परिणाम होतो. अभ्यास बोंबलला की करिअरची विल्हेवाट लागते. कधी ना कधी ही छोटीशी लव स्टोरी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून पाल्यांच्या पालकांना कळते आणि पालकांचे मन प्रथम काल्र्यासारखे कडू होते आणि नंतर जीभ लाल मिरचीसारखी तिखट. त्यावर नववी- दहावीतले हे युवक-युवती फिल्मगिरी करून मोकळे होतात. ‘मी झाले तर त्याचीच होईन नाहीतर कोणाचीही नाही’ असे जबराट बोल एखादी पोरगी वडिलांना ऐकवून निघून जाते.
अशा वेळी बिचारे पालकच कोंडीत सापडतात. त्यांना या गोष्टीबद्दल काय करावे ते सूचेनासेच होते. खरं तर मुलांना कसलीच जाण नसते. पौगंडावस्थेमुळे त्यांच्यात शारीरिक तसेच मानसिक बदल झालेला असतो. पिक्चरमध्ये सतत तेवढेच बघितलेले असते. या नव्या मानसिक आणि शारीरिक बदलाला सामोरे न जाता आल्यामुळे अजाण पोरं अशी इन्स्टन्टली प्रेमात पडतात. ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानू लागलो आहोत ती व्यक्ती खरोखरच तेवढी पात्र आहे का, याचा विचारही हे तरुण- तरुणी करू शकत नाहीत.
व्यवस्थित शिक्षण, चांगले करिअर आणि मग प्रेम असा ढोबळ मार्ग सोडून उगाचच हे युवा वहीवाटेला जात आहेत. आता प्रेम आणि त्यातून वेळ मिळाला तर अभ्यास आणि झालेच तर करिअर असा उलटा क्रम लागायला सुरुवात झाली आहे.
मुला-मुलींना कॉलेज लाईफ म्हणजे काहीतरी जिद्दीने करून दाखवण्याचे लाईफ यापेक्षा प्रेमात पडून दाखवण्याचे लाइफ असे वाटू लागले आहे. कॉलेजकुमाराला एखादीतरी गर्लफ्रेंड नसली तर तो फट्टू, आजोबा, औरथ्रोडॉक्स समजला जाऊ लागला आहे. प्रेमात पडणे हे आता फॅशनेबल आणि स्टेटस सिंबॉल बनू लागले आहे. प्रेमासारख्या कोमल भावनेला एखाद्या ‘थ्रिल’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
तरुणांनी प्रेमात पडूच नये किंवा अमूक अमूक वयातच प्रेम करावं अशी बाब नाही पण इन्स्टंट प्रेमापेक्षा खऱ्या प्रेमाचा आस्वाद घ्यावा आणि मुख्य म्हणजे प्रेम निभवावं आणि तसे करण्यासाठी चांगले शिक्षण, उत्तम करिअर हे तर अपरिहार्यच आहे, नाही का?
‘एवढी हुशार पोर आमची पण काय गुण उधळलाय आता? कोण तो माँटी का फाँटी? आधी ९० टक्क्याच्या खाली मार्क नसायचे पण आता?’ अशी व्यथा घरोघरी ऐकू येत आहे. फिल्मी उथळ प्रेमापायी अनेक हुशार विद्यार्थी करिअरच्या शर्यतीत मागे पडत आहेत.
एवढे वाचल्यावर तुम्ही म्हणाल की पण आता करायचे काय? उत्तर असे आहे. प्रथम पालकांनी त्यांच्या पाल्यांशी मनमोकळी चर्चा करणे गरजेचे आहे. आपल्या मुलांच्या मनात नक्की काय गुंतागुंत झालीये ते माहीत करून घेऊन त्यांच्या डोक्यातला तो केमिकल लोचा व्यवस्थित शांतपणे सॉल्व्ह केला पाहिजे. केस अगदीच हाताबाहेर गेली असल्यास डॉक्टरांचा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
मुलांनीही आपली चूक किंवा हातून चुकून झालेला तो वरवरच्या प्रेमाचा खुळचटपणा लक्षात आल्यावर धीराने आपली चूक सुधारावी. सारखी सारखी होणारी पॅचवप व ब्रेकअप्स्वर लक्ष केंद्रीत न करता अभ्यास आणि करिअरच्या प्रेमात पडणे जास्त फायद्याचे आहे हे मनाला बजावून टाकावे.
प्रेमात पडणे वाईट मुळीच नाही पण त्यापूर्वी आपण तेवढे पात्र आहोत का? मॅच्युअर आहोत का? समोरची व्यक्ती तेवढी पात्र आहे का? का पात्रच आहे? हे प्रश्न स्वत:ला जरूर विचारावेत आणि डोळसपणे आंधळ्या प्रेमात पडणे टाळावे. फिल्मी प्रेमापेक्षा खरेखुरे सुंदर प्रेम अनुभवणे हे केव्हाही चांगले हे ध्यानात ठेवावे.
So guys! शेवटी एवढेच सांगीन की आधी लगीन करिअरशी मग लगीन पोरीशी!
मैत्रेय रिसबुड