Leading International Marathi News Daily

गुरुवार, २१ मे २००९

विविध

इंडोनेशियामध्ये विमान कोसळून ९८ ठार
जकार्ता, २० मे/पीटीआय

लष्करी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणारे इंडोनेशियाचे लष्करी विमान आज पूर्व जावातील मॅगेटन भागातल्या घरांवर कोसळले व या विमानाने पेट घेतला. या भीषण अपघातात १४ मुलांसह ९८ जण ठार झाले. अमेरिकी बनावटीचे व सी-१३० हक्र्युलस जातीचे हे विमान जुनाट झाले होते. या विमानामध्ये ९८ प्रवासी व १४ कर्मचारी असे एकूण ११२ जण होते. हे विमान कोसळून चार घरांचे प्रचंड नुकसान झाले तसेच एका घरातील दोन जणांचा मृत्यू झाला. हे विमान जकार्ता येथून मॅगेटनमार्गे पापुआ येथे चालले होते.

जालंधर जिल्ह्यात रक्षकविरहित रेल्वेफाटकात व्हॅन व रेल्वेगाडीच्या टक्करीत आठ जण ठार
नुरमहाल, २० मे/पीटीआय
पंजाबमध्ये जालंधर जिल्ह्यातील गुमताला गावानजिक रक्षकविरहित रेल्वेफाटकामध्ये आज पहाटे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक व्हॅन फिरोजपूर-भटिंडा एक्स्प्रेसला धडकून झालेल्या भीषण अपघातात सात विद्यार्थ्यांसह आठ जण ठार तर १५ जण जखमी झाले. अकाल अ‍ॅकॅडमीच्या व्हॅनच्या चालकाने बेपर्वाईने रेल्वे फाटक ओलांडण्याचा केलेला प्रयत्न तसेच फिरोजपूर-भटिंडा एक्स्प्रेस समोरून येत असल्याचे त्याच्या निदर्शनास न आल्याने हा अपघात घडला.

आसाममध्ये काँग्रेसची कामगिरी तुलनात्मकदृष्टय़ा सरस
चौदाव्या लोकसभेत खासदार असलेल्या काँग्रेस पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांचा पराभव ही आसाममधून आलेल्या निवडणूक निकालांमधील मोठी धक्कादायक बाब मानावी लागेल. दुसऱ्या बाजूने आसाम गण परिषद या स्थानिक पक्षाबरोबर आघाडी असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून मोठे यश मिळविले आहे. आसाम गण परिषदेचा प्रभाव तसा कमीच राहिला, पण भाजपाचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. यावेळच्या निवडणुकीत आसाममध्ये स्थापन झालेल्या एका नव्या स्थानिक पक्षाने लोकसभेत स्थान मिळविले आहे. आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाने प्रथमच निवडणुक लढविली आणि आश्चर्य म्हणजे एक जागा या पक्षाने जिंकली.