Leading International Marathi News Daily
रविवार, १७ मे २००९

कलाटणी मिळेल
गुरू, शनी, राहू यांचे शुभपर्व मेष व्यक्तींना सत्कारणी परिश्रमाचा आनंद मिळवून देणार आहे. त्यात शुक्र, मंगळ, केतू यांच्या अनिष्टतेमुळे व्यत्यय आणि विरोध यांचा प्रवेश होणार असला; तरी निर्धाराने पुढे सरकत राहा. गुरुवारच्या बुध-हर्षल शुभयोग, शनिवारचे मंगळ राश्यांतर यामधून अचानक काही प्रकरणांना अनुकूल कलाटणी मिळेल आणि लवकरच महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
दिनांक : १८, १९, २२, २३ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा; यश मिळेल.

साहस नको
चतुर्थातल्या शनीचे परिणाम शनिवारच्या मंगळ राश्यांतरापासून कडक होण्यापूर्वीच आर्थिक, शासकीय, प्रापंचिक प्रकरणे मार्गी लावणे आवश्यक आहे. गुरुवारच्या बुध हर्षल शुभयोगाचे सहकार्य मिळेल आणि सफलता सोपी होईल. विलंबाने कृतीत येणाऱ्या आश्वासनांच्या भरवशावर साहस करू नका. भाग्यात राहू, दशमात गुरू, नियमित उपक्रमांना अडचणी येऊ देणार नसल्याने झाकली मूठ पक्कीच राहील.
दिनांक : १७ ते २० शुभकाळ.
महिलांना : हुशारीने यश मिळेल.

मजल मारू शकाल
भाग्यात गुरू, पराक्रमी शनि मीन राशीत शुक्र-मंगळ यातून नियमित व्यवहाराची समीकरणे सांभाळून शनिवारच्या मंगळ राश्यांतरापर्यंत मोठी मजल मारता येणे शक्य होईल. रवी-बुध व्ययस्थानी असल्याने तणाव राहतील. खर्च अधिक करावा लागेल. परंतु निराश होण्याचे प्रसंग येणार नाहीत. प्रवास होतील. शुभवार्ता समजतील. व्यापारी, उधारी वसूल करू शकाल. धावपळीत आरोग्य आणि आधार यांच्यावर लक्ष ठेवा.
दिनांक : १८ ते २२ शुभकाळ.
महिलांना : संसारात आनंद लाभेल.

मार्ग शोधून यश
साडेसाती, अष्टमात गुरू यांच्या परिणामांनी प्रगतीमध्ये अडचणी येत राहिल्या तरी सप्तमात राहू भाग्यात शुक्र-मंगळ आणि लाभात रवि-बुध यांच्यामुळे अडचणींवर मार्ग शोधून कर्क व्यक्तींना यशस्वी होता येईल. गुरुवारच्या बुध-हर्षल शुभयोगाच्या आसपासच्या घडामोडी त्यात विशेष सहकार्य करतील, त्यात परिचित असतील, अधिकारी असतील भागीदार असू शकतील. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ यामध्ये फिरवाफिरव करू नका.
दिनांक : २० ते २३ शुभकाळ.
महिलांना : कर्तृत्व उजळून निघेल.

काळ बदलत आहे
साडेसाती, अनिष्ट राहू अष्टमात शुक्र-मंगळ यांच्या फे ऱ्यात सापडलेल्या सिंह व्यक्तींना यश अवघड झालेले आहे. त्यामध्ये महत्त्वाची केंद्रं सापडलेली असणं शक्य आहे. दशमातील रवी-बुध त्यात इभ्रतीला गुरफटू देणार नाही. गुरुकृपेने काही विभागांत एकतर्फी प्रवास सुरू ठेवता येईल आणि शनिवारी मंगळाचे राश्यांतर होताच कार्यपथावरील समस्यांची गर्दी वेगाने कमी होऊ लागेल. नवे मार्ग दिसू लागतील.
दिनांक : १८, १९, २२, २३ शुभ दिवस
महिलांना : शनी-मंगळाच्या अनिष्ट काळात इंचाइंचाने पुढे सरकावे लागते.

संधीचा लाभ घ्यावा
पंचमात राहू, भाग्यात सूर्य-बुध, सप्तमातील शुक्र-मंगळाचे सहकार्य मिळेल, पण शनिवापर्यंतचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक कृती यांना महत्त्व येणार आहे. गुरुवारच्या बुध-हर्षल शुभयोगाच्या आसपास संधी समोर उभ्या राहतील. त्याचा लाभ दूरदृष्टीने झटपट करून घेणं आवश्यक आहे. अन्यथा साडेसाती, नाराज गुरू, शनिवारी अष्टमात येत असेलला मंगळ यांच्या चक्रात सापडलात तर ‘दैवानं दिलं होतं..’ असं म्हणावं लागेल.
दिनांक : १७, २०, २१ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा, गोड बोला, यश मिळेल.

वेग वाढवता येईल
पंचमात गुरू, लाभांत शनी यांच्या सहकार्याने व्यवहारिक वर्तुळातील प्रवास कमी अधिक वेगाने सुरू ठेवता येईल. त्यात शुक्र, मंगळ, रवी, बुध, राहू यांची संघटित अनिष्ठता शनिवापर्यंत अपेक्षित यश मिळू देणार नाही. प्रयत्नात उत्साह, बाजारातील शब्दामधील शक्ती कमी होऊ देऊ नका. शनिवारी मंगळ राश्यांतर होताच दडपण, संशय दूर होतील आणि कार्यक्षेत्रात प्रतिमा उजळू लागेल. अल्पावधीतच उपक्रमांना वेगही देऊ शकाल. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक- १८, १९, २२, २३ शुभकाळ
महिलांना- समस्यांशी सामना करतच यश मिळवावे लागेल.

यश चकित करील
पराक्रमी राहू, दशमांत शनी यांचं मजबूत सहकार्य सूर्य, बुध, शुक्र, मंगळ यांची अनुकूलता यातूनच गुरुवारच्या बुध, हर्षल शुभयोगाच्या आसपास कार्यक्षेत्रात घबाड हाती येऊन चकित करणारे यश मिळवता येईल. शनिवारच्या मंगळ राश्यांतरातून शत्रूंचा चोख बंदोबस्त होत राहील. कलाप्रांत, शिक्षण, साहित्य, शोधकार्य यामध्ये वृश्चिक व्यक्तींचा प्रभाव वाढेल. व्यापार पैसा देईल. समाजकार्य प्रतिष्ठा मिळवून देईल. बुध, गुरू केंद्र योगात संभ्रमापासून दूर राहून सरळ पुढे सरकावे लागते.
दिनांक- १७, २०, २१ शुभकाळ.
महिलांना - आप्तांच्या भेटी, शुभवार्ता, बौद्धिक क्षेत्रात यश अशा घटनांचा आठवडा आहे.

विजय मिळतील
पराक्रमी गुरू, भाग्यात शनी, मीन, शुक्र, गुरुवारचा बुध-हर्षल शुभयोग आणि शनिवारचं मंगळ राश्यांतर धनू व्यक्ती नवे नवे विजय मिळवीत आगेकूच सुरू ठेवू शकतील. काही विभागात ठरवलेल्या वेळेपूर्वीच विजयाचा आनंद मिळवता येईल. त्यात कला, क्रीडा, व्यापार, राजकारण यांचा समावेश होऊ शकेल. प्रापंचिक प्रश्न सुटतील. अनारोग्यावर औषध सापडेल. नोकरी आणि जागेचा प्रश्नही सोडवता येईल. धार्मिक तपश्चर्या कारणी लागेल.
दिनांक- १८, १९, २२, २३ शुभकाळ
महिलांना- आगेकूच सुरूच ठेवा.

समस्या सोडवता येतील
गुरूची कृपा, राहूचं सहकार्य प्रपंचात सूर्य, बुध, मीन, शुक्र यातूनच मकर व्यक्तींना समस्या सोडवून घेता येतील. कार्यभाग साधता येईल. अनेक महत्त्वाची प्रकरणं मार्गी लावता येतील. शक्यतो यातील अधिकाधिक विभाग शनिवारच्या मंगळ राश्यांतरापूर्वी पूर्ण होईल, अशा योजनांची आवश्यकता राहील. त्यात व्यापार, राजकारण, कलाप्रांत, अर्थप्राप्ती, नवे करार यांचा समावेश करता येईल. शनिवारी मंगळ चतुर्थात येताच शनीची अनिष्ठता तीव्र होणं शक्य असल्याने सावधानतेची सूचना देऊन ठेवली आहे.
दिनांक- १८ ते २१ शुभकाळ
महिलांना- आकर्षक खरेदी कराल.

आलेख उंचावत राहील
राशिस्थानी गुरू, सप्तमांत शनी, मीन, शुक्र, मंगळ गुरुवारचा बुध-हर्षल शुभयोग आणि शनिवारी होत असलेलं मंगळ राश्यांतर प्रगतीचा आलेख उंचावत नेणारी समर्थ ग्रहस्थिती असल्याने प्रयत्नांचा वेग वाढवा, दूरदृष्टी ठेवा. कृतीमध्ये कल्पकता असू द्या. व्यापार, राजकारण, कला, साहित्य, शिक्षण यामध्ये श्रेष्ठत्व सिद्ध करणारं यश मिळेल. व्ययस्थानी राहू, चतुर्थात सूर्य असल्याने प्रपंचातील अशांती आणि वाढणारे खर्च त्रास देतील, पण प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही.
दिनांक- १८ ते २२ शुभकाळ
महिलांना- अपेक्षित यशाचा टप्पा गाठता येईल.

प्रतिक्रिया यश देतील
राशीस्थानी शुक्र, मंगळ लाभांत, राहू पराक्रमी, सूर्य, बुध आणि गुरुवारचा बुध-हर्षल शुभयोग यांची प्रतिक्रिया भव्य यश देऊ शकणार नाही; पण इभ्रतीचा पंचनामाही होऊ देणार नाही. त्यामुळे शत्रू हादरतील. बाजारपेठ सांभाळता येईल. राजकारण साथ देईल, नवे संपर्क उपक्रमांत उपयुक्त ठरतील. अनिष्ठ गुरू, शनी प्रतिक्रियांना मोठा आकार मिळू देणार नाही. धार्मिक उपक्रम सुरू ठेवा आणि आरोग्यावर दुर्लक्ष नको.
दिनांक- २० ते २३ शुभकाळ
महिलांना- प्रपंचातील प्रश्न सुटतील.