Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

व्यापार-उद्योग

उपनगराच्या कक्षा कल्याण-विरारपुढे..
व्यापार प्रतिनिधी: आर्थिक सुबत्तेचे केंद्र म्हणून महामुंबईचा दबदबा जसा वाढत चालला आहे, तसतसे या शहरात नशीब आजमावत असलेल्या सामान्य मध्यमवर्गीयांचे चांगल्या घरांचे स्वप्न दुर्लभ होत चालले आहे. ज्या कुणाचे मुंबईत घर आहे, तर त्याला निवाऱ्याचे उमदे ठिकाण म्हणण्यापेक्षा तडजोडच बहुतांशी म्हणता येईल. त्यामुळे बोरिवली-दहिसर आणि ठाणे-डोिबवलीपर्यंत विस्तारलेले मुंबईचे उपनगर आता पार कल्याण-विरारपल्याड विस्तारताना दिसणे स्वाभाविक आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांच्या या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या परवडण्याजोग्या गृहसंकुल योजनांवर पडत असलेल्या उडय़ा याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.
लाइफस्टाइल सिटी, कल्याण

यश बिर्ला ग्रुपच्या ताब्यात मेलस्टार इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज्
व्यापार प्रतिनिधी: विविध क्षेत्रांत जवळजवळ २० कंपन्या आणि ३००० कोटी रुपयांच्यावर व्यवसाय असलेल्या यश बिर्ला ग्रुपने व्यवसायाच्या प्रगतीपथावर आणखी एक पाऊल टाकताना, मेलस्टार इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज् लि. या अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेण्ट सॉफ्टवेअर सेवांच्या क्षेत्रातील कंपनीवर ताबा मिळविला आहे.

मुंबईत २६ ते २८ मे दरम्यान दोन व्यापारी प्रदर्शने
व्यापार प्रतिनिधी: वल्र्डेक्स इंडियातर्फे मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये येत्या २६ ते २८ मे २००९ दरम्यान दोन व्यापारी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील इंडिया इंटरनॅशनल मशिनरी अँड इक्विपमेंट एक्झिबिशन (इंटरमशिनरी इंडिया) हे प्रदर्शन यंत्रसामग्री व उपकरणे विषयक असून कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अ‍ॅप्लायन्सेस फेअर हे प्रदर्शन ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी उपकरणांचे आहे.

‘एअरटेल’ने १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला
व्यापार प्रतिनिधी: भारती एअरटेलने १०० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार केला. यामुळे एअरटेल जागतिक स्तरावरती एकाच देशामध्ये सर्वात जास्त मोबाईल सेवा पुरवणारी तिसऱ्या क्रमांकाची, तर एकाच देशामध्ये सर्वात जास्त एकिकृत दूरसंचार सेवा पुरवणारी सहाव्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

‘इंडोको’च्या मेटफोर्मिनला जर्मनीकडून १०० कोटींची ऑर्डर
व्यापार प्रतिनिधी: मुंबईस्थित इंडोको फार्मा या कंपनीने आपल्या मधुमेह नियंत्रणावरील ‘मेटफोर्मिन’ नावाच्या टॅब्लेट्ससाठी जर्मनीतून १०० कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळविली आहे. जर्मनीच्या नामवंत व सर्वात मोठय़ा अशा ‘हेल्थ फंड ऑफ जर्मनी’ या विमा कंपनीकडून ही ऑर्डर इंडोकोने मिळविली आहे. वार्षिक ५०० दशलक्ष गोळ्यांचा जर्मनीला पुरवठा केला जाईल आणि त्या देशातील बहुतांश सर्व फार्मसीमध्ये या गोळ्या पाहायला मिळतील, अशी माहिती इंडोकोचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी दिली. इंडोकोने २००६ सालापासून जर्मनीमध्ये आपली उत्पादने वितरीत करण्यास प्रारंभ केला आहे. गतवर्षी कंपनीने जर्मनीमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक सात कोटी रुपयांचा विक्री व्यवहार केला. नव्या ऑर्डरमुळे यात विलक्षण मोठी वाढ होणे अपेक्षित आहे.

‘टाटा टेलि’चा आर्थिक वर्षांत महसूल २,००० कोटींवर
व्यापार प्रतिनिधी: टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या महसुलात १५ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. मागील आर्थिक वर्षांच्या १७९० कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत यंदा कंपनीने २०५८ कोटी रुपये महसूल कमविला आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत या वर्षी कंपनीच्या मार्केट शेअरमध्ये एक टक्क्याची वाढ झाली आहे. ‘ट्राय’द्वारे प्रकाशित अहवालानुसार टीटीएमएलच्या उद्योगक्षेत्रात ३.६ टक्के विकास झाला असताना टीटीएमएलने मात्र १४.८ टक्के विकास साध्य केला आहे. मागील आर्थिक वर्षांत ४८६ कोटी रुपये नोंदविल्या गेलेल्या ढोबळ उत्पन्नात या आर्थिक वर्षांत २३ टक्क्यांची वाढ होऊन ते ६०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टाटा एआयजी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर एम. सुरेश यांची नियुक्ती
व्यापार प्रतिनिधी: टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स विमा कंपनी लिमिटेडने सुरेश महालिंगम (एम. सुरेश) यांची व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्तीची घोषणा केली आहे. नियामक संस्थेची मान्यता मिळताच १ जून २००९ पासून ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होण्यापूर्वी एम. सुरेश टाटा एआयजीमध्येच प्रमुख प्रचालन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफीसर) या पदावर कार्यरत होते. ट्रेव्हर बुल यांची अमेरिकन इंटरनॅशनल समूहाच्या (एआयजी) वरिष्ठ पदावर विदेशात नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या जागी एम. सुरेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम. सुरेश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयातून कारभार सांभाळतील. टाटा एआयजी लाइफचे भारतातील सर्व प्रचालन, व्यवसाय व बाजारपेठेतील घडामोडी यांची संपूर्ण जबाबदारी एम. सुरेश यांच्यावर सोपविण्यात आली आहे. एम. सुरेश सप्टेंबर २००८ मध्ये टाटा एआयजी विमा कंपनीमध्ये रुजू झाले होते. त्यांना आयुर्विमा उद्योगात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. टाटा एआयजीमध्ये दाखल होण्यापूर्वी ते एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ विमा कंपनीत महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते.

विनाती ऑरगॅनिक्सचे उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढून रु. १९५ कोटींवर
व्यापार प्रतिनिधी: विनाती ऑरगॅनिक्स लिमिटेड या कंपनीने आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये आपल्या उत्पन्नात ३० टक्क्यांची भर घालत ते १९५ कोटी रुपयांवर नेले आहे. कंपनीचा निव्वळ नफा याच कालावधीत ६५ टक्क्यांनी वाढून २५.१३ कोटी रुपये झाला आहे. या उत्तम कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांकरिता १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागावर प्रत्येकी २.५० रु. (२५ टक्के) लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

डीएचएल आणि ब्ल्यू डार्टला सुवर्ण पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: आघाडीची एक्स्प्रेस आणि लॉजिस्टिक कंपनी डीएचएल तसेच डीएचएल ग्रुपचा एक भाग असलेल्या ब्ल्यू डार्टने पुन्हा एकदा ‘११ व्या वार्षिक रीडर्स डायजेस्ट ट्रस्टेड ब्रॅण्ड २००९ अ‍ॅवॉर्डस्’मध्ये ‘एअरफ्राईट/ कुरिअर सेवा’ या वर्गवारीत भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून पारितोषिक पटकावले. अत्यंत प्रतिष्ठेचे प्रशंसापत्र मिळाल्याने भारतातील डीएचएल ग्रुपच्या प्रतिष्ठेत वाढ झाली आहे. डीएचएल आणि ब्ल्यू डार्टच्या वार्षिक सर्वेक्षणातून दिसून आले की, ग्राहक या ब्रॅण्डकडे विश्वासार्ह, अद्ययावत आणि विश्वसनीय म्हणून पाहतात. या ब्रॅण्डला वर्गवारीत सर्वोच्च स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डीएचएल इंडियाला तीन गोल्ड अ‍ॅवॉर्ड मिळाली असून ब्ल्यू डार्टला रीडर्स डायजेस्ट मोस्ट ट्रस्टेड ब्रॅण्ड गोल्ड अ‍ॅवॉर्ड चौथ्या वर्षी सलग मिळाले आहे.

एक्झिम बँकेला ४७७ कोटींचा निव्वळ नफा
व्यापार प्रतिनिधी: भारतीय आयात-निर्यात बँक अर्थात एक्झिम बँकेने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ६१० कोटी रुपयांचा करपूर्व नफा तर रु. ४७७ कोटींचा करोत्तर निव्वळ नफा कमावला असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. सी. वेंकट सुब्रह्मण्यन यांनी पत्रकार परिषदेत केली.
आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये एक्झिम बँकेची एकंदर ऋण मालमत्ता १८ टक्क्यांनी वधारून रु. ३४,५०५ कोटींवर गेली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांत बँकेने ३३,६२८ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजूरी दिली, तर प्रत्यक्षात रु. २८,९३३ कोटींच्या कर्जाचे वितरण केले. नक्त अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) प्रमाण आधीच्या वर्षांतील ०.२९ टक्क्यांवरून ०.२३ टक्के असे घसरले आहे. सरलेल्या वर्षांत एक्झिम बँकेने भारतातून व्यवहार होत असलेल्या एकंदर २० देशांमध्ये २५ पतविषयक करारांतून ७८३.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे कर्जसाहाय्य पुरविले. ३१ मार्च २००९ रोजी एक्झिम बँकेची पुस्तकी हमी रु. ३५४० कोटींची तर भांडवली पूर्ततेचे प्रमाण १६.७७ टक्के असे सरस पातळीवर आहे. सरलेल्या वर्षांत एक्झिम बँकेने भारत सरकारकडून रु. ३०० कोटींचा भांडवली सहभाग मिळविला, ज्यामुळे बँकेचे भरणा झालेले भागभांडवल १४०० कोटी रुपयांवर पोहचले तर अधिकृत भागभांडवल रु. २००० कोटींचे आहे.