Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

व्यापार-उद्योग
(सविस्तर वृत्त)

उपनगराच्या कक्षा कल्याण-विरारपुढे..
व्यापार प्रतिनिधी: आर्थिक सुबत्तेचे केंद्र म्हणून महामुंबईचा दबदबा जसा वाढत चालला

 

आहे, तसतसे या शहरात नशीब आजमावत असलेल्या सामान्य मध्यमवर्गीयांचे चांगल्या घरांचे स्वप्न दुर्लभ होत चालले आहे. ज्या कुणाचे मुंबईत घर आहे, तर त्याला निवाऱ्याचे उमदे ठिकाण म्हणण्यापेक्षा तडजोडच बहुतांशी म्हणता येईल. त्यामुळे बोरिवली-दहिसर आणि ठाणे-डोिबवलीपर्यंत विस्तारलेले मुंबईचे उपनगर आता पार कल्याण-विरारपल्याड विस्तारताना दिसणे स्वाभाविक आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांच्या या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या परवडण्याजोग्या गृहसंकुल योजनांवर पडत असलेल्या उडय़ा याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.
लाइफस्टाइल सिटी, कल्याण
निर्मल लाइफस्टाइल समूहाने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘लाइफस्टाइल सिटी’ या निवासी वसाहतींच्या प्रकल्पाअंतर्गत कल्याणनजीक प्रति चौरस फूट रु. १,९६२ दराने मध्यमवर्गीयांच्या ‘ड्रीम होम’चे स्वप्न साकारण्याचा मानस व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार स्थापित होणारे नियोजित शहर अशी संकल्पना असलेल्या या वसाहतींमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात अद्ययावत सोयी-सुविधा असलेले आधुनिक घर थाटले जाणार आहे. सदनिका, व्हिला, रो-हाऊसेस, ब्रॅण्डेड क्रीडा व शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा, हॉस्पिटल, शॉपिंग संकुल सारे काही नियोजित स्वरूपात एकत्रितपणे ‘लाइफस्टाइल सिटी’मध्ये उभे राहत आहे. अशा धाटणीच्या एकंदर २० वसाहती देशभरात उभारण्याचा निर्मल लाइफस्टाइलचा संकल्प आहे.
बोईसरच्या ‘शुभगृह’ योजनेत १० हजारांवर अर्जविक्री
टाटा समूहातील टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने विरारपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोईसरमध्ये चार लाखांत घरांचे स्वप्न साकारणारी ‘शुभगृह’ नावाची योजना पुढे आणली असून, ११ मेपासून सुरू झालेल्या योजनेच्या अर्जविक्रीत १० हजारांचा टप्पा पार केला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या बोईसर, विरार, वसई, पालघर, नालासोपारा, डहाणू, ठाणे, बोरिवली (प.) आणि अंधेरी (प.) येथील शाखांतून प्रत्येकी ३०० रु. दराने ही अर्जविक्री सुरू आहे. रु. ३.९ लाख ते रु. ६.७ या किमतीदरम्यान या योजनेत एकंदर १००० सर्वसुसज्ज अत्याधुनिक सदनिका, ऐसपैस मोकळे आवार, उद्यान, रुग्णालय, शाळा, कम्युनिटी हॉल अशा सोयी असलेल्या संकुलात वर्षभरात तयार केल्या जाणार आहेत. अद्यापपर्यंत मिळालेला उमदा प्रतिसाद पाहता, भविष्यात या धर्तीची योजना मुंबईतही राबविण्याचा टाटा हाऊसिंगचा संकल्प आहे.