Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

व्यापार-उद्योग
(सविस्तर वृत्त)

यश बिर्ला ग्रुपच्या ताब्यात मेलस्टार इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज्
व्यापार प्रतिनिधी: विविध क्षेत्रांत जवळजवळ २० कंपन्या आणि ३००० कोटी

 

रुपयांच्यावर व्यवसाय असलेल्या यश बिर्ला ग्रुपने व्यवसायाच्या प्रगतीपथावर आणखी एक पाऊल टाकताना, मेलस्टार इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज् लि. या अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेण्ट सॉफ्टवेअर सेवांच्या क्षेत्रातील कंपनीवर ताबा मिळविला आहे.
मेलस्टार ही प्रोफेशनल कन्सल्टिंग, प्रोजेक्ट सव्‍‌र्हिसेस आणि सोल्युशन्स अशा विविध सेवा पुरविणारी कंपनी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सॉफ्टवेअर डेव्हलपमेण्ट करून देणारी ती एक आघाडीची कंपनी आहे. त्याचबरोबर बँकिंग, आर्थिकसेवा व विमा क्षेत्रातही काम करण्यावर कंपनीचा भर आहे. मेलस्टारचे भारतातील मुख्यालय मुंबईत असून मुंबईबाहेर मार्केटिंग / सेल्स ऑपरेशन्स आणि प्रोजेक्ट सव्‍‌र्हिसेस बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, गुरगाव व कोलकात्याला आहेत.
भारताबाहेर अमेरिका, ब्रिटन व सिंगापूरला ऑफिसेस असून, अमेरिकेत मेलस्टार इन्कॉर्पोरेशन तर ब्रिटनमध्ये मेलस्टार (यू.के.) लि. या नावाने संपूर्ण मालकीच्या शाखाही आहेत.
या ताबा व्यवहाराबाबत बोलताना यश बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष यश बिर्ला म्हणाले, मेलस्टारवरील ताबा म्हणजे ग्रुपच्या सतत विस्तार करण्याच्या आणि नवनवीन क्षेत्रात प्रवेश करण्याच्या धोरणाचे मूर्तरूप आहे.
ते पुढे म्हणाले, की ग्रुपने स्वत:साठी ठरविलेल्या ध्येयाच्या दृष्टीनेही मेलस्टार ताब्यात घेणे महत्त्वाचे ठरेल, अशी आशा आहे. या संपादनानंतर मेलस्टारने आपल्या संचालक मंडळाचे पुनर्गठन केले आहे. त्यानुसार यश बिर्ला यांनी अध्यक्षपदाचा पी. व्ही. आर मूर्ती व अनोज मेनन यांनी संचालक तर एस. एम. अरोरा यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. रिचर्ड डिसोझा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.