Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

व्यापार-उद्योग
(सविस्तर वृत्त)

मुंबईत २६ ते २८ मे दरम्यान दोन व्यापारी प्रदर्शने
व्यापार प्रतिनिधी: वल्र्डेक्स इंडियातर्फे मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन

 

सेंटरमध्ये येत्या २६ ते २८ मे २००९ दरम्यान दोन व्यापारी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील इंडिया इंटरनॅशनल मशिनरी अँड इक्विपमेंट एक्झिबिशन (इंटरमशिनरी इंडिया) हे प्रदर्शन यंत्रसामग्री व उपकरणे विषयक असून कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अ‍ॅप्लायन्सेस फेअर हे प्रदर्शन ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी उपकरणांचे आहे.
या दुहेरी प्रदर्शनांचे आयोजन चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचा व्यापार विकास विभाग, चायना नॅशनल मशिनरी अँड इक्विपमेंट इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट कॉर्पोरेशन (सीएमईसी) यांच्या सहयोगाने करण्यात आले असून ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) व चीनचे मुंबईतील वाणिज्य प्रतिनिधी (कॉन्सुलेट जनरल) यांनी सहकार्य केले आहे. माहिती तंत्रज्ञान सोल्युशन्स सहयोगी म्हणून एसएपी व विप्रो या कंपन्यांनी सहकार्य दिले आहे. ही प्रदर्शने एकत्र घेण्यामागे व्यावसायिकांना व्यापार संधी मिळवून देणे व कंपन्यांच्या विशाल संचाशी सहयोग करण्यास प्रोत्साहन देणे, हा हेतू आहे.
या प्रदर्शनांमध्ये भारतासह चीन, तैवान, जपान व सिंगापूरमधील २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून १६ पेक्षा अधिक देशांतील ११००० हून अधिक व्यावसायिक भेट देण्याची अपेक्षा आहे. इंटरमशिनरी इंडिया (आयएमआय ०९) या प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून त्यात बांधकाम, मशिन टूल्स व संबंधित उत्पादने, कृषी, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, शीट मेटल फॅब्रिकेशन, सामग्री व सुटे भाग, अवजड अभियांत्रिकी अशा व्यवसायांशी संबंधित आधुनिक यंत्रसामग्री प्रदर्शित केली जाणार आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स फेअर या प्रदर्शनात रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन, हाय-एंड कॉम्प्युटर्स, पीडीए व मोबाईल फोन्ससारखी आधुनिक उपकरणे, लॅन केबल्स, लो व्होल्टेज इलेक्ट्रिकल केबल्स, छोटी गृहोपयोगी उपकरणे प्रदर्शित केली जाणार आहेत.