Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

अग्रलेख

एव्हरेस्टवर कृष्णा!

 

पुण्याच्या कृष्णा माधव पाटील या १९ वर्षीय युवतीचे पाऊल एव्हरेस्टच्या शिखरावर पडले आणि तमाम मराठी माणसांच्या मनात १९९८ साली ऋषिकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणी जाग्या झाल्या. सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले त्याच्या आदल्या रात्री उत्सुकतेने अनेक तरुणांनी रात्र जागून काढली होती. एव्हरेस्टवरून येणाऱ्या प्रत्येक वार्तेकडे सर्वांचे कान लागलेले होते. अखेरीस तो क्षण आला आणि महाराष्ट्राने आनंदोत्सवच साजरा केला. आता त्या घटनेला ११ वर्षे उलटून गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होतो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कृष्णा पाटील ही एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतीयांमधील सर्वात तरुण आहे. एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षांच्या अखेरीस चार हजारांवर पोहोचली होती आणि प्रत्यक्षात हे जगातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्यांची संख्या दोन हजार सातशेच्या घरात पोहोचली होती. १९५३ साली सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले तेव्हापासून आजतागायत जग बरेच बदलले आहे. संवादक्रांतीचे युग अवतरले आहे. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोहिमांमध्येही अनेक नवे बदल झाले आहेत. पण तरीही एव्हरेस्टबद्दल असलेले माणसाच्या मनातील आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही. कारण एव्हरेस्ट सर करणे हा मुद्दा काही केवळ जगातील सर्वोच्च उंची इतपतच मर्यादित नाही तर इथे माणसाच्या सर्व क्षमतांचा खऱ्या अर्थाने कस लागतो. इथे निसर्गाची कठोर परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. म्हणून त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाराष्ट्राला राकट, कणखर देश म्हटले जाते. ही केवळ कवीकल्पना नाही तर प्रत्यक्षात महाराष्ट्र हा असाच आहे. त्यामुळे इथल्या दरीखोरे गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत असतात. सह्याद्री मनसोक्त फिरून झाला की, त्यांना थेट हिमालयच साद घालतो. मग नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरींगमध्ये (निम) जाऊन हिमालयातील गिर्यारोहणाचे धडे घ्यायला सुरुवात होते. बेसिक, अ‍ॅडव्हान्स असे अभ्यासक्रम पार पाडत मोहिमांना सुरुवात होते. हिमालयातील या मोहिमा म्हणजे कुणा एकाचे यश नसते तर ते मोहीम राबविणाऱ्या संपूर्ण टीमचे यश असते. प्रबळ संघभावना सर्वात जास्त महत्त्वाची असते, हे कसलेल्या गिर्यारोहकांना पक्के ठाऊक असते. मात्र ९८ सालची मोहीम आणि आताची मोहीम यात एक महत्त्वाचा फरक आहे. कृष्णाची मोहीम ही व्यावसायिक तत्वावर राबविण्यात आलेली मोहीम आहे. तर क्रिकेट सामन्यात प्रथम गल्ली, मग स्थानिक पातळी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामना असे करत एखादा खेळाडू कसलेल्या अवस्थेत पोहोचतो तशी ९८ सालची मोहीम होती. त्यातील सर्वांनीच तब्बल दोन वर्षे आधी मोहीमेची शारीरिक व मानसिक तयारी केलेली होती. डाएटचा भाग सर्वाधिक महत्त्वाचा असतो. शेंगदाण्यात किती कॅलरीज असतात? चिक्कीमध्ये मग आपल्याला आवश्यक त्या कॅलरीज मिळू शकतात का? हा सारा शोध मोहिमेत सहभागी झालेल्या गिर्यारोहकांनीच घेतला होता. त्यानुसार आपल्या विविध प्रकारच्या क्षमता लक्षात घेऊन चाचणीनंतर एकूण २४ जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यातून १३ जणांची निवड अखेरच्या मोहिमेसाठी झाली. एव्हरेस्ट सारखी मोहीम करायची तर खूप मोठय़ा खर्चाला सामोरे जावे लागते. मोहिमेतील सर्वांनीच खर्चाचा भार उचलला. आणि मोहिम यशस्वी झाल्यानंतर तब्बल तीन वर्षे सर्वजण कर्जाचे हप्ते भरत होते. कृष्णाची मोहीम ही पूर्णपणे व्यावसायिक तत्त्वावरील मोहीम होती. त्यासाठी तिला तब्बल तीस लाख रुपयांचा खर्च आला. काही वर्षांंत झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे एव्हरेस्टचे असलेले आकर्षण अनेकांना लक्षात आले असून त्यातूनच एव्हरेस्ट आणि इतर शिखरांच्या व्यावसायिक मोहिमांना सुरुवात झाली आहे. १९९५ साली व्यावसायिक मोहिमांचे पितळ उघडे पडले कारण त्याच वर्षी एव्हरेस्टच्या एका मोहिमेत तब्बल १४ गिर्यारोहकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. कारण या मोहिमा आयोजित करणाऱ्यांसाठी गिर्यारोहक हे त्यांचे ग्राहक असतात. ते वाढविण्यासाठी असलेल्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत शिखर सर करायला लावणे, त्यांच्या व्यावसायिक हितासाठी महत्त्वाचे असते. त्यातच अनेकांना आजवर प्राण गमवावे लागले आहेत. प्राण गमावणाऱ्यांच्या संख्येत व्यावसायिक मोहिमा वाढल्यानंतर वाढच झाली आहे. या व्यावसायिक मोहिमांमध्ये तुमच्या सर्व चिंता या त्या कंपनीतर्फेच वाहिल्या जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या चढाईवर लक्ष पूर्णपणे केंद्रित करू शकता. ‘एशियन ट्रेकिंग इन्स्टिटय़ूट’ ही त्यापैकीच एक संस्था. या संस्थेतर्फे आयोजित ‘इको एव्हरेस्ट एक्सपिडिशन २००९’मध्ये १८ जणांचा समावेश होता. त्यात कृष्णा ही एकमेव भारतीय होती. गिर्यारोहणाची आवड असलेल्या कृष्णाने महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले पालथे घातले आहेत. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील तिची कारकीर्द ही तशी कमी वर्षांची असली तरी एव्हरेस्ट सारख्या कठोर समजल्या जाणाऱ्या मोहिमेचा घेतलेला ध्यास तिची जिद्द पुरती स्पष्ट करणारा होता. हिमालय खुणावू लागल्यानंतर तिनेही निममधूनच बेसिक व अ‍ॅडव्हान्स अभ्यासक्रम पूर्ण केला. गंगोत्री ग्लेशिअरची मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करून तिने समुद्रसपाटीपासून सात हजार ७५ मीटर चढाई करण्याचा अनुभव मिळवला. निमच्याच एका एव्हरेस्ट मोहिमेसाठी तिची निवड झाली होती. नंतर त्या मोहिमेत ती सहभागी होऊ शकली नाही. तरीही ती तिच्या उद्दिष्टावर ठाम होती. तिने व्यावसायिक मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. वडील मदतीला धावून आले, कुटुंबानेही तेवढीच जिद्द दाखवली. वडिलांनी तीस लाखांचा निधी कर्जाच्या माध्यमातून उभा केला. ही मोहीम कोणत्याही संस्थेची अथवा व्यावसायिक असली तरीही प्रत्यक्ष चढाई तुम्हाला स्वतलाच करावी लागते. हिमालयात तुमच्या हाती काहीच नसते. एव्हरेस्टच्या मोहिमेत हायपोथर्मिया, अतिउंचीचा शरीरावर तीव्र परिणाम होवून होणारा त्रास, हिमवादळ यातच अनेकाना प्राण गमवावे लागले आहेत. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर कृष्णाच्या यशाचे महत्त्व आपल्याला अधिक चांगले लक्षात येईल. या मोहिमेसाठी तिने दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि केलेली मानसिक तयारी या गोष्टींसाठी तिचे कौतुक करावे तेवढे कमीच असेल. या तीन महत्त्वाच्या बाबींशिवाय कुणालाही हिमालय सर करता येणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. शिवाय हे सारे वयाच्या केवळ १९ व्या वर्षी, हा तर तिने तिच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. १९ हे तसेही महाविद्यालयातील उच्च शिक्षणाचेच वय आहे. या वयात जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न केवळ पाहायचेच नाही तर प्रत्यक्षात आणून दाखवायचे ही अतिशय खडतर गोष्ट आहे. कारण हिमालयाच्या कुशीत पावलागणिक मृत्यू खणावत असतो. असे म्हणतात की, प्रथम हिमालय मनात चढावा लागतो. त्यानंतर शारीरिक कस लागतो. भल्याभल्या गिर्यारोहकांनाही माघार घ्यावी लागली किंवा प्राण गमवावा लागला, तिथे सर्व कसोटय़ांवर उतरायचे ही दीर्घकाळ लक्षात राहील अशी खूप मोठी सलामी आहे. शिवाय आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी कृष्णाचे कौतुक करावेच लागेल, ते म्हणजे तिने बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चढाईस सुरुवात केली. एव्हरेस्ट दिवसा चढणेही तसे अतिकठीण तिथे रात्रीचा धोका तर सर्वाधिक. असे असतानाही तिने रात्रीच चढाई करण्यास सुरुवात करणे पसंत केले. भलेभले गिर्यारोहकही हा धोका पत्करत नाहीत. कारण त्यावेळेस तापमान उणे ४०च्या आसपास असते. शारीरिक क्षमतेचा या परिस्थितीत पूर्ण कस लागतो. या सर्व कसोटय़ांवर उतरत यशाची शिखरे पार करत कृष्णाने सकाळी सात वाजता एव्हरेस्टचे शिखर गाठले. केवळ कृष्णासाठी किंवा महाराष्ट्रीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशवासीयांसाठी तिने एक अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. भारतीयांसाठी हा दिवस कायमच लक्षात राहील. कारण केवळ कृष्णाच नव्हे तर आज तिच्या आणखी एका पथकानेही एव्हरेस्ट सर केले, त्यात लवराज धर्म सत्तू यांचा समावेश होता. आता त्यांच्याही नावावर एक नवा विक्रम नोंदला गेला आहे. लवराज धर्म सत्तू हा तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय ठरला आहे! त्यामुळे भारतीयांची अवस्था सोन्यालाही सुगंध अशीच झाली आहे. या दोघांच्या जिद्द, चिकाटीला ‘हॅटस् ऑफ’!