Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

भारतीय चित्रपटाचे ‘कान’ पिळलेलेच!
सिनेमांसाठी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून कान चित्रपट महोत्सवाकडे पाहिले जाते. फान्समध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या या चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात गेल्या १५ वर्षांपासून एकही भारतीय चित्रपट नाही. अलिकडच्या काळात भारतीय कलाकार केवळ मिरविण्यापुरते या महोत्सवाला हजर दिसतात आणि दरवर्षी नियमितपणे भारतीय चित्रपटांचे मार्केटिंग करण्यासाठी मोठमोठाले स्टॉल उभारतात. पण गेल्या पंधरा वर्षांत एकाही भारतीय चित्रपटाची कान चित्रपट महोत्सावासाठी निवड झालेली नाही आणि मार्केटिंगचा विचार केला तर केवळ एका चित्रपटाचे हक्क परदेशी वितरकाने विकत घेतले, ही वस्तुस्थिती आहे.

थम्स अप
तुम्ही कोणाचे चाहते आहात.. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, मोहन आगाशे की विनय आपटे? ‘निशाणी डावा अंगठा’ या सर्वाच्याच भूमिका आहेत. चार वर्षांपूर्वी रमेश इंगळे-उत्रादकर यांनी लिहिलेली ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी प्रकाशित झाली. याच कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. ‘प्रौढ साक्षरता मोहीमे’ची वस्तुस्थिती या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ज्यांनी पुस्तक वाचले असेल त्यांना डुकरे, काझी, भाऊ राठोड, जुंबड ही पात्रे माहीत असतीलच. ती पडद्यावर कशी वागतात हेही पाहण्याची उत्सुकता असेल. ज्यांनी वाचलेली नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे ‘ब्लॅक कॉमेडी’चा आविष्कार असेल. पुरुषोत्तम बेर्डे या चित्रपटाच्या निमित्ताने दुसरी इनिंग्ज सुरू करत आहेत. सशक्त कथा, नावाजलेले अभिनेते, टीव्ही प्रोमोजमधून दिसणारे चुरचुरीत संवाद यामुळे एकूणच या चित्रपटाविषयी उत्सुकता निश्चितच निर्माण झाली आहे. त्यामुळे हा वीकेण्ड ‘अंगठय़ा’च्या नावे करायला काहीच हरकत नाही.

गुप्तहेर ‘नानी’
भारतीय चित्रपटात ‘आजी’ या व्यक्तिरेखेला फारसे स्थान नसतेच. मृत्यूच्या दारात असलेली, पळून जाणाऱ्या मुलीला मदत करणारी, कर्मठ वातावरणात पुरोगामी असलेली अशीच प्रतिमा साकारण्यात आली आहे. ‘डिटेक्टिव्ह नानी’मध्ये मात्र ही आजी थेट मुख्य व्यक्तिरेखेत जाऊन बसली आहे. मॉर्निग वॉकवरून परत येताना एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीत चेहऱ्यावर संभ्रमित भाव असलेली मुलगी दिसते. पण ते घर एका मुल नसलेल्या जोडप्याचे असते. नानीचे लक्ष जाताच ती मुलगी लगेचच घरात जाते. या घटनेनंतर ही नानी या रहस्यात गुंतत जाते. काही जण तिला मदत करतात तर काही दुर्लक्ष करतात. हे रहस्य नानी कशा प्रकारे सोडवते, ही ‘डिटेक्टिव्ह नानी’ची कथा आहे. फार वर्षांपूर्वी ‘एक, दो, तीन, चार’ नावाची एक मालिका दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होत असे. ही साधारण त्याच प्रकारची कथा आहे. या रहस्यकथेत मोठी नावे नाहीत. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका रोमिला मुखर्जी यांचे नावही प्रेक्षकांना परिचित नाही. त्यामुळे चटकन हा चित्रपट पाहण्यासाठी मल्टिप्लेक्सकडे पावले वळणार नाहीत. असे असले तरी रहस्यकथांची आवड असणाऱ्यांनी मल्टिप्लेक्सच्या पायऱ्या चढायला हरकत नाही.
टॉकिजवाला

महत्त्व मुहूर्ताचे
स्टार प्रवाह वाहिनीवरून दर गुरुवार ते शनिवार रात्री १० वाजता दाखविण्यात येणारा ‘जोडी जमली रे’ हा विवाह जुळविणारा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे त्यात सहभागी झालेले लग्न करण्यास इच्छुक तरुण-तरुणी तसेच हा कार्यक्रम पाहणारे प्रेक्षकांमधील इच्छुक वधुवरांनाही मार्गदर्शन करणारा आहे. गुरुवारच्या भागात लग्नसंस्था या विषयावर सर्वानी आपापली मते मांडली. त्यावर साधकबाधक चर्चाही झाली. आता शुक्रवारच्या भागात ‘मुहूर्त’ या विषयावर पंडित संदीप अवचट सांगोपांग माहिती देणार आहेत. विवाह, साखरपुडा, वास्तूशांत, व्रतबंध किंवा पूजा यातले काहीही करायचे असले की मुहूर्त पाहिला जातो. त्या मुहूर्तावरच हे धार्मिक विधी पार पाडले जातात. पण विवाहाच्या बाबतीत हा मुहूर्त अधिक काटेकोरपणे पाहिला जातो, त्यानुसार विवाह केला जातो. यामागे काही विशेष कारण असते का, त्यामागचे ‘लॉजिक’ काय आहे यासारख्या पैलुंची माहिती संदीप अवचट शुक्रवारच्या भागात देतील. मात्र सहभागी झालेल्या स्पर्धकांना अवचट यांनी दिलेली माहिती आणि सांगितलेले मुहूर्ताचे महत्त्व पटेल का, की त्यांचा मुहूर्त पाहून लग्न करणे या गोष्टीला विरोध आहे हे शुक्रवारचा एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे. आजच्या घडीला करिअर आणि वैवाहिक संबंध तसेच नातेसंबंध, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ यात संघर्ष करावा लागतोय. जोडीदारांमधले दोघेही करिअर करणारे असतील, त्यांच्या कामकाजाच्या वेळा व्यस्त असतील तर एकमेकांना समजून घेणे, त्यासाठी आवश्यक त्या तडजोडी करणे, त्यातून मार्ग काढून एकमेकांसाठी वेळ देणे यासारखे अगदी आजघडीला जवळपास प्रत्येक करिअरिस्ट जोडप्याला भेडसावणारे प्रश्न यावर शुक्रवारच्या भागात सहाही स्पर्धक हिरीरीने चर्चा करणार आहेत.
प्रतिनिधी