Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

लोकमानस

शांत, संयमी दूरदृष्टीची फलश्रुती

 

पंधराव्या लोकसभेसाठी मतदारांनी यूपीएच्या पारडय़ात भरभरून मते टाकली हा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या आर्थिक रणनीतीचा, पारदर्शक कारभाराचा, तसेच सभ्य, सुसंस्कृत व प्रामाणिक चारित्र्याचा तर विजय आहेच; परंतु पडद्यामागील सूत्रधार सोनिया गांधी यांच्या कल्पक नेतृत्वाचा, मुत्सद्दी ध्येयधोरणांचा व डावपेचाचादेखील तो विजय आहे.
नेहरूंचे बोट धरून राजकारणात आलेल्या इंदिरा गांधींना कधी काळी ‘गूंगी गुडिम्या’ म्हणून हिणवले गेले. परंतु अल्पावधीतच त्यांनी कुशल नेतृत्वाचे दर्शन घडवीत अनेक कठोर परंतु धाडसी निर्णय घेतले. तर राजीव गांधींच्या हत्येनंतर काही वर्षे राजकारणापासून दूर राहिलेल्या सोनिया गांधींनी मरगळ आलेल्या काँग्रेसची फरफट सक्रिय होऊन थांबवली. आत्मविश्वास गमावलेल्या, विखुरलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे, संघटित करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. वैयक्तिक पातळीवर अत्यंत हीन टीका होत असतानाही देशभर झंझावाती दौरे करून सत्ताधारी राजकारण्यांच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढीत २००४ साली रालोआला सत्तेवरून खाली खेचले. हाती आलेले पंतप्रधानपद नाकारून राजकारणी नसलेल्या परंतु विद्वान, अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी बसविले. दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती म्हणजेच अठरा वर्षांनंतर काँग्रेसने पाहिलेले आजचे भरघोस यश आहे.
इंदिरा गांधी व राजीव गांधींनी घालून दिलेले आदर्श, दिलेले राजकीय पाठ यांचा कित्ता गिरवत शांत, संयमी सोनिया गांधींनी बोलण्यापेक्षा कृतीद्वारे आपणही ‘गूंगी गुडिम्या’ नाही हे दाखवून दिले आहे. इथल्या मातीत जन्मलेल्या, अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणात काढलेल्या आपल्या नेत्यांना हे अजून उमगले नाही हे भारतीयांचे मोठे दुर्दैव. सर्वाधिक तरुणाई जेथे आहे त्या जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशात जागरूक मतदारांनी दिलेल्या सुजाण कौलातून आपले नेते बोध घेतील तो सुदिन.
मेलविन रिबेलो, वसई