Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

बॉक्साईट वाहतूक विरोधी आंदोलनावर तोडगा
उद्यापासून वाहतूक सुरु
कोल्हापूर, २१ मे / विशेष प्रतिनिधी

बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या गाडय़ांची संख्या कमी करणे, दोन गाडय़ांमधील अंतर किमान पाच मिनिटांपेक्षा अधिक असणे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व प्रादेशिक परिवहन खात्याच्या वतीने वाहतूक मार्गावर दोन निरीक्षण नाके बसविणे या मुद्दय़ांवर गुरूवारी बॉक्साईट वाहतूक विरोधी आंदोलनात तोडगा निघाला. यामुळे शनिवारपासून वाहतूक सुरू करण्यास कृती समिती आणि जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

पी. डी. पाटील यांच्या समाधिस्मारकाच्या कामास प्रारंभ
कराड, २१ मे/ वार्ताहर

दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या श्री शिवाजी विद्यालय परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य समाधिस्मारकाच्या कामास आज शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. कराडकरांसाठी हे समाधिस्मारक आदराचे स्थान ठरणार आहे.

प्रस्तावित घरपट्टी वाढी विरोधात शिवसेनेचे घंटानाद आंदोलन
सांगली, २१ मे / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी वाढी विरोधात शिवसेनेने गुरूवारी महापालिका मुख्यालयासमोर शंखध्वनी करीत घंटानाद आंदोलन केले. पण हे आंदोलन नागरिकांसाठी की प्रसारमाध्यमांसाठी असा प्रश्नही पडला होता.

‘सुझलॉन’च्या कामगारांमध्ये तीव्र असंतोष
सातारा, २१ मे/प्रतिनिधी

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी पवनचक्क्या उभारण्यासाठी कवडीमोलाने घेऊन स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सुझलॉन कंपनीने आता येनकेनप्रकारेन कामगारांना त्रास देण्यास सुरुवात केली असून, कामगारांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत कामगारांनी माथाडी कामगार नेते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. आ. शिंदे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा करून कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी व्यवस्थापनाने भूमिका घ्यावी, अशी सूचना केली.

लक्ष्मी-विष्णू मिल कामगारांसाठी पुनर्वसन योजनेस केंद्राची मान्यता
सोलापूर, २१ मे/प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या पुनर्वसन योजनेतून लक्ष्मी-विष्णू कापड गिरणी कामगारांना सुमारे दहा कोटींचे अनुदान आणि त्यांच्या २२ कोटींच्या देय रकमेवरील व्याज लवकरच मिळणार असल्याची माहिती इंटकप्रणित राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत सुरवसे यांनी दिली.

काम बंद पाडण्याचा ‘जनसुराज्य शक्ती’ चा इशारा
रॉकेल वाटपातील असमानता दूर करण्याची मागणी
कोल्हापूर, २१ मे / प्रतिनिधी
ज्यांच्याकडे गॅस सिलिंडर नाही त्यांच्या शिधापत्रिकेवर रॉकेलचा कोटा दुप्पट करावा, शहर आणि ग्रामीण भेद दूर करून समान टक्केवारीने रॉकेलचे वाटप करावे, ग्रामीण भागाच्या वाटय़ाचे लाखो लीटर रॉकेल इतरत्र जाते. तो अन्याय दूर करावा या मागण्यांसाठी आज जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांना धारेवर धरण्यात आले. जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका व्यापक शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले. या निवेदनात रॉकेल वाटपातील असमानता दूर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

प्रल्हाद जाखले यांना पीएच.डी.
कोल्हापूर, २१ मे / विशेष प्रतिनिधी

श्री. प्रल्हाद बाबुराव जाखले यांना शिवाजी विद्यापीठामार्फत इतिहास विषयातील पीएच.डी. नुकतीच जाहीर झाली. त्यांनी कोल्हापूर संस्थानातील न्यायव्यवस्थेचा इतिहास इ.स.१७१० ते इ.स.१९४९ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.बी.डी. खणे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम पूर्ण झाले. त्यांना इतिहास विभागाचे विभागप्रमुख प्रा.एम.ए.लोहार व प्रा.ए. आर.भोसले यांचे सहकार्य लाभले. या संशोधनाद्वारे कोल्हापूर संस्थानातील मध्ययुगीन मराठाकालीन न्यायव्यवस्थेपासून आधुनिक न्यायव्यवस्थेमध्ये झालेल्या विकासावर प्रकाश टाकलेला आहे.

ऊस रोपांसाठी नर्सरी वारणानगरला राबविणार
पेठवडगाव, २१ मे / वार्ताहर
ऊस उत्पादन वाढीच्या दृिष्टकोनातून शेतकऱ्यांकडून ऊस रोपे तयार करून ती शेतकरी सभासदांना देण्याची आणि कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात याप्रमाणे ६८ नर्सरी तयार करण्याची महाराष्ट्रातील पहिली योजना वारणानगर (ता.पन्हाळा) येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना राबविणार असल्याचे वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांनी सांगितले. ऊस लागणीसाठी आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशी ही योजना असून त्याची माहिती व प्रशिक्षण यासाठी शेतकऱ्यांचा पहिला मेळावा वारणानगर येथील कारखाना कार्यस्थळावरील नर्सरीमध्येच गुरूवारी २१ मे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याचे कार्यकारी संचालक व्ही.एस.चव्हाण व शेती अधिकारी सुधाकर पाटील यांनी सांगितले. या योजनेतून ४०० महिलांना १० महिने रोजगारही उपलब्ध होणार आहे.

महिलांच्या फसवणूक प्रकरणातील ३ लाख अ‍ॅड. शेटेंकडून जमा
कराड, २१ मे/वार्ताहर
जीवनशांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील ३ लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश या प्रकरणातील संशयित इस्लामपूरच्या अ‍ॅड. मनीषा शेटे यांनी आज कराड शहर पोलिसांकडे जमा केला. या प्रकरणी अ‍ॅड. शेटे यांच्यासह १० जणांविरुद्ध कराड शहर पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. यावर अ‍ॅड. मनीषा शेटे यांनी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज मांडला असता त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अ‍ॅड. शेटे यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

सोलापुरात रोल बॉल खेळाच्या प्रशिक्षण कार्यशाळेस प्रतिसाद
सोलापूर, २१ मे/प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा रोल बॉल असोसिएशनच्यावतीने जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात रोल बॉल खेळावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत राज्य रोल बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष पोतनीस यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. लहान मुलां-मुली खेळाडूंचा या कार्यशाळेत उत्साही सहभाग होता. जिल्हा रोल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष, नगरसेवक शिवलिंग कांबळे ऊर्फ शिवा बाटलीवाली यांच्या हस्ते प्रशिक्षक पोतनीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. संतोष गवळी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रोल बॉल खेळाविषयी स्केटिंग खेळाडू, स्केटिंग क्लब व स्केटिंग मार्गदर्शकांनी संघटनेचे सचिव शिवशरण कोरे (९८५००३१७०७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कराड विमानतळावर राज्यातील दुसरे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू
कराड, २१ मे/ वार्ताहर
कराड विमानतळावर बुधवारपासून राज्यातील दुसरे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. याकामी चार विमाने दाखल झाली असून ‘काव्‍‌र्हर एव्हिएशन’ या संस्थेच्या पुढाकाराने ३० विद्यार्थ्यांना कॅप्टन आर. एन. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. या निमित्ताने कराडच्या नावलौकिकाला आणखी झळाळी मिळाली आहे. हे प्रशिक्षण महागडे आहे. तरीही या विभागातील तरुण-तरुणींना ही नामी संधीच म्हणावी लागेल. बारामती विमानतळावरही हे प्रशिक्षण सुरूच आहे.

नांदगावकरांच्या ‘सुखाचा शोध’चे आज प्रकाशन
सातारा, २१ मे/प्रतिनिधी

कृष्णकांत व वृंदा नांदगावकर यांनी लिहिलेल्या ‘सुखाचा शोध’ या ग्रंथाचे प्रकाशन उद्या शुक्रवारी २२ मे रोजी येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती ‘लोकव्रत’च्या प्रकाशिका अ‍ॅड. वर्षां माडगूळकर यांनी दिली. ‘सुखाचा शोध’ हे लोकव्रत प्रकाशनचे ५२ वे पुस्तक प्रकाशित होत आहे, या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन अ‍ॅड. वर्षां माडगूळकर यांनी केले आहे.

खटकेवस्तीच्या सरपंचपदी वैशाली गावडे बिनविरोध
फलटण, २१ मे/ वार्ताहर
खटकेवस्ती (ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली बापुराव गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंचपदी संतोष पंढरीनाथ खटके यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजे पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिद्ध केल्याने राजेगटाचेच सरपंच व उपसरपंच निवडून आले आहे.

वृद्ध वाहनचालकाचा अपघातात मृत्यू
सोलापूर, २१ मे/प्रतिनिधी
मोटारसायकलीसमोर आडव्या आलेल्या डुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी घसरून घडलेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. सोलापूर-विजापूर महामार्गावर तेरा मैलजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अमोगसिद्ध तुकाराम देशमुख (वय ७०, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. ते सायंकाळी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलीवरून प्रवास करीत असताना रस्त्यावर डुक्कर आडवे आले. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी घसरली आणि देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता थोडय़ाच वेळात ते मरण पावले.