Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २२ मे २००९

मराठमोळ्या कृष्णाने जिंकले एव्हरेस्ट!
काठमांडू, २१ मे/ वृत्तसंस्था

पुण्याच्या एकोणीस वर्षीय कृष्णा पाटीलने आज सकाळी सात वाजता एव्हरेस्टवर पाऊल ठेवले नि जगातील हे सर्वोच्च शिखर मराठमोळ्या कर्तृत्वाच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाले! नागरी मोहिमेद्वारे ही ‘उंची’ गाठणारी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील पहिली महिला होण्याबरोबर एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी सर्वात लहान भारतीय गिर्यारोहक होण्याचे मोठे यशही कृष्णाने प्राप्त केले. नेपाळमधील काठमांडू येथील एशियन ट्रेकिंग एजन्सीच्या ‘इको एव्हरेस्ट’ या मोहिमेतील १८ सदस्यांच्या पथकामध्ये कृष्णाचा समावेश होता.
(एव्हरेस्टवर कृष्णा - अग्रलेख )

नक्षलवाद्यांशी चकमक
पाच महिला जवानांसह १६ पोलीस ठार
चंद्रपूर, २१ मे/प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हय़ातील धानोरा ते मुरूमगाव मार्गावर आज सायंकाळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह १६ जवान शहीद झाले. यात पाच महिला जवानांचा समावेश आहे. महिलांना ठार करण्याची नक्षलवाद्यांची ही पहिलीच वेळ आहे. तीन महिन्याच्या अंतरात दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूक निकालाचे निमित्त साधून नक्षलवाद्यांनी काल व आज गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर बंदचे आवाहन केले होते. गडचिरोलीच्या दुर्गम भागात काल या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्राच्या वाटय़ाला नऊ ते दहा मंत्रीपदे?
नवी दिल्ली, २१ मे/खास प्रतिनिधी

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ९ ते १० मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. चौदाव्या लोकसभेत काँग्रेसचे ७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ मंत्री होते. यंदाही महाराष्ट्राला १० मंत्री लाभण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याला जास्तीत जास्त मंत्री देताना विभागीय संतुलनही साधण्याचा प्रयत्न होणार असून त्यातून राज्यसभेच्या तीन सदस्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रातून तीन ते चार, मुंबई आणि विदर्भातून प्रत्येकी दोन, तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातून प्रत्येकी एका मंत्र्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.

द्रमुक नाराज, काँग्रेसही ठाम
नवी दिल्ली, २१ मे/खास प्रतिनिधी

काँग्रेस-युपीए सरकारचे नेतृत्व करताना पंतप्रधानपदाची उद्या सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग सज्ज होत असतानाच आज रात्री उशिरापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा आणि खात्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नसल्याचे बघून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या द्रविड मुन्नेत्र कलघमने ऐनवेळी नाराज होण्याचा पवित्रा पत्करला. काँग्रेसशी सुरु असलेली चर्चा आणि वाटाघाटी अपयशी ठरल्यामुळे द्रमुकने मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देण्याचे अस्त्र उपसले. या राजकीय नाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर उद्या सायंकाळी राष्ट्रपती भवनात मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, कमलनाथ, ममता बॅनर्जी, मुरली देवरा, शरद पवार, प्रफुल्ल पटेल या प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. काँग्रेससोबत सुरु असलेली द्रमुकची रस्सीखेच आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी आणि गुलामनबी आझाद हे दोन ज्येष्ठ काँग्रेसनेते द्रमुकशी चर्चेत गुंतले असून ते उद्यापर्यंत द्रमुकला नमवतील, अशी अपेक्षा आहे. द्रमुकचा बाहेरून पाठिंबा घेण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे द्रमुकला स्पष्ट शब्दात सांगितले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांवर तडजोड करून केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.

ममता बॅनर्जी यांना रेल्वे खाते?
नवी दिल्ली, २१ मे/खास प्रतिनिधी

लोकसभेच्या १९ जागाजिंकणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी ‘नमते’ घेत केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा आणि खातेवाटपासाठी केलेल्या तडजोडीच्या सूत्राचा वापर करून काँग्रेसने द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या अटी मान्य करण्यासाठी भाग पाडल्याचे आज स्पष्ट झाले. ममता बॅनर्जींनी दाखविलेल्या या औदार्याचा फायदा उठवून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक कॅबिनेट आणि एकच राज्यमंत्रीपद मिळेल, असे ठरविले आहे.

आयपीएलच्या उपान्त्य फेरीत
सेंच्युरियन, २१ मे/ पीटीआय

मनिष पांडेच्या स्फोटकी शतकाच्या जोरावर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने डेक्कन चार्जर्सचा १२ धावांनी पराभव करून उपान्त्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. डेक्कन चार्जर्स आणि पंजाब सुपर किंग्ज यांचे १४ सामन्यांत प्रत्येकी १४ गुण मिळविले असले तरी सरस धावगतीच्या जोरावर डेक्कन चार्जर्स संघाने उपान्त्य फेरी गाठली आहे. पहिला उपान्त्य सामना शुक्रवारी प्रिटोरिया येथे दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. तर दुसरा उपान्त्य सामना बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये शनिवारी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. आज झालेल्या शेवटच्या साखळी लढतीत दिल्ली डेअरडेविल्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने पराभव केला.

वडाळा येथे स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू; १९ जखमी
मुंबई, २१ मे / प्रतिनिधी

वडाळा पूर्व येथील बरकत अली नाक्याजवळ बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा स्लॅब आज सायंकाळी कोसळून एकजण जागीच ठार झाला, तर १९ जण जखमी झाले. जखमींना के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बरकत अली नाक्याजवळ एकमजली इमारतीचे काम सुरू होते. आज सायंकाळी सातच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला आणि इमारतीच्या मालकासह १९ कामगार त्याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सुरू केलेल्या बचावकार्यामुळे गाडल्या गेलेल्यांना त्वरीत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील अरविंद चव्हाण हा इसम जागीच ठार झाला, तर १९ जण जखमी झाले. जखमींना के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर जखमींना किरकोळ मार लागला आहे. वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी सांगितले की, या एकमजली इमारतीचा मालक मेहबूबही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बरकतअली नाका येथे मेहबूबचे घर आहे. ते वाढविण्याचे काम सध्या सुरू होते. या घटनेनंतर मेहबूबवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ चटर्जी रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली, २१ मे / वृत्तसंस्था

छातीत दुखू लागल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना आज दुपारी उपचारार्थ लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले. छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर चटर्जी यांना तातडीने लष्कराच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी