Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

आठवलेसमर्थकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
अंगावर रॉकेल ओतून घेणाऱ्या आठ जणांना अटक

औरंगाबाद, २१ मे/प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातून पराभव झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास क्रांती चौकात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सज्ज असलेल्या पोलिसांनी लगेचच आठ जणांना ताब्यात घेतले.

अवकाळी पाऊस
सरत्या वैशाखातील रणरणती, भगभगती, लाहीलाही करून सोडणारी कलती दुपार. आतापर्यंत निळंभोर असलेलं आभाळ अचानक भरायला लागतं. बघता बघता गडद जांभळ्या-काळ्या ढगांनी झाकोळून जातं. इतकं झाकोळतं की, काही वेडी पाखरं घरटय़ांकडे जायची घाई करतात. आसमंत घुसमटतो आणि मग सुसाट वारा सुटतो. त्याच्यासोबत उडणारी धूळ वाटेत येईल ते कवेत घेत आभाळाला जाऊन भिडते. या वाऱ्याच्या हातात हात घालून सृष्टी थयथयाट करायला लागते.

फाजील आत्मविश्वास नडला
हिंगोली
तुकाराम झाडे
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रचाराचे परिश्रमपूर्वक नियोजन व ‘हत्ती’ची चाल यामुळे हिंगोली मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाचा इतिहास चौथ्यांदा घडला. आमदार सुभाष वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांना ७३ हजार ६३४ मतांनी पराभूत केले. फाजिल आत्मविश्वास, आपसातील हेवेदावे, निष्क्रिय प्रचारयंत्रणा व बहुजन समाज पक्षाने केलेले मतविभाजन ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची कारणे ठरली.

आमदार-खासदार आपापल्या जागी
जालना
लक्ष्मण राऊत

लोकसभेच्या जालना मतदारसंघातील निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली आणि सलग पाचव्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. भा. ज. प.चे उमेदवार रावसाहेब दानवे यांना या वेळेस फारशी अनुकूल परिस्थिती नसल्याचे प्रचाराच्या प्रारंभीच्या काळात स्पष्टपणे जाणवत होते. स्वकीय आणि मित्रपक्षातील काही मंडळींच्या नाराजीतून मार्ग काढण्यात त्यांचा बराच वेळ गेला. आपल्याविरुद्ध एवढी नाराजी असेल याची जाणीव खुद्द त्यांना निवडणुकीस उभे राहण्यापूर्वी आलीही नसेल.

लातूर बाजारात हाय हाय मिरची!
लातूर, २१ मे/वार्ताहर

लग्नसराई, वार्षिक खरेदी तसेच लोणच्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे बेडगी, गुंटूर, तेजा या प्रकारच्या मिरचीसाठी मागणी वाढली आहे. स्वयंपाकात लाल मिरची अत्यंत महत्त्वाचा जीवनावश्यक अन्न घटक आहे. जगात सर्वात जास्त वापर व उत्पादन हिंदुस्तानात होते. ८० टक्के ग्राहक मिरची विकत घेऊन स्वच्छ करून दळून आणणे पसंत करतात. १५ ते २० टक्के ग्राहक व हॉटेल व्यावसायिक वेळेअभावी तयार लाल तिखटाचा वापर करतात.

मतदारांचा झटका एकदा ठरलं की ठरलं
प्रदीप नणंदकर, लातूर, २१ मे

निवडणुकीची हवा तापून एकदा मतदारांनी निर्णय पक्का केला की, तो काही केल्या बदलत नसतो. ग्रामीण भागात ‘गावाने ठरवलंय, सगळ्यांचा निर्णय आहे, त्याला शिरकावच नाही,’ अशी भाषा प्रसंग पाहून वापरली जाते. ही भाषा मतदान यंत्रामार्फत व्यक्त झाल्याचे मतदानाचे आकडे पाहून दिसून येत आहे.

परभणीत वादळी पाऊस
परभणी, २१ मे/वार्ताहर

शहर व परिसराला आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे झीरोफाटा ते राहटी दरम्यान रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वृक्ष पडल्याने वाहतूक थंडावली. सहा वाजल्यापासून परभणी-नांदेड-हिंगोली हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.

नांदेड जिल्ह्य़ात पावसाचे दोन बळी
नांदेड, २१ मे/वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या बेमोसमी पावसाने दोन जण मृत्युमुखी पडले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ात यंदा प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

मंगेश कुलकर्णी यांचे निधन
परतूर, २१ मे/वार्ताहर

स्थापत्य अभियंता व बांधकाम व्यावसायिक मंगेश कुलकर्णी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, आजोबा असा मोठा परिवार आहे. छातीत दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी कुलकर्णी पुण्याला जात होते; परंतु नगरच्या बसस्थानकावरच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. कुलकर्णी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवानाचा संशयास्पद मृत्यू
हिंगोली, २१ मे/वार्ताहर

वसमत तालुक्यातील विरेगाव येथील नागनाथ सखाराम जाधव (वय ३८) यांचा मृतदेह आज औंढानागनाथ बसस्थानकाजवळ आढळला. त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे घातपात की खून अशा प्रकारची चर्चा आहे. बसस्थानकाच्या बाजूला अनोळखी मृतदेह पडल्याची माहिती मिळताच औंढय़ाचे पोलीस उपनिरीक्षक रामसिंग चिरागिया घटनास्थळी पोहोचले. मृताच्या खिशामध्ये बी. ए. तृतीय वर्ष परीक्षेचे हॉल तिकीट सापडले. यावरून त्यांचे नाव नागनाथ जाधव असल्याचे समजले. झारखंडमध्ये केंद्रीय राखीव दलात नोकरीला आहे. मित्राच्या लग्नानिमित्त सुट्टी घेऊन तो गावाकडे आला होता.

‘डॉ. विनायक सेन यांची बिनशर्त सुटका करावी’
औरंगाबाद, २१ मे/खास प्रतिनिधी

मानवी हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या डॉ. विनायक सेन यांना छत्तीसगढच्या भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी खोटे आरोप ठेवून तुरुंगात डांबले आहे. त्यांची बिनशर्त सुटका करा, अशी मागणी येथे स्थापन करण्यात आलेल्या डॉ. विनायक सेन मुक्तता समितीच्या बैठकीत करण्यात आली. आदिवासी क्षेत्रात ३५ वर्षांपासून काम करणारे डॉ. सेन यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. दोन वर्षांपासून तुरुंगात डांबून ठेवले आहे. देशभरातील मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संघटना डॉ. सेन यांच्या सुटकेची मागणी करत आहे. त्यांच्या सुटकेसाठी समितीच्या वतीने शुक्रवारी २२ मे रोजी पैठणगेट येथे सकाळी ११ ते ४ या वेळेदरम्यान धरणे आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या वतीने या बैठकीत घेण्यात आला.

जमिनीच्या वादातून मुलाकडून आईचा खून; वडील जखमी
बीड, २१ मे/वार्ताहर
शेतीच्या वाटणीच्या वादातून जन्मदात्या आई-वडिलांवरच मुलाने चाकूहल्ला केला. यात आईचा मृत्यू झाला तर वडील जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केज तालुक्यातील कचरवाडी येथे सोमवारी (दि. १८) शेतीची वाटणी करण्याच्या कारणावरून विजय मारोती वनवे याने वडील मारोती यांच्या पाठीत चाकू मारला. मध्ये पडलेल्या आई सिंधूबाई यांच्यावरही त्याने हल्ला केला. सिंधूबाई यांचा मृत्यू झाला तर मारोती जखमी असून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

टेम्पो उलटून १ ठार, ४ जखमी
नांदेड, २१ मे/वार्ताहर
भरधाव वेगात जाणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात जानू किशन चौहान (वय ५२) मृत्युमुखी पडले. अंबाडी घाटात आज दुपारी झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले. किनवट तालुक्यातल्या पिंपळगाव येथील बी-बियाणे घेऊन पाच-सात जण टेम्पोने (क्रमांक एमएच२६-०९२५) जात होते. भरधाव वेगात जाणारा टेम्पो अंबाडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. यात टेम्पोमधील जानू किशन चौहान गंभीर जखमी झाले. त्यांना गोकुंद्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. किनवट पोलिसांनी टेम्पोचालक प्रफुल्ल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दोन अपघातात एक ठार, एक जखमी
भोकर, २१ मे/वार्ताहर
तालुक्यात काल आणि आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार व एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालमोटर (क्रमांक सीजी ०४ ई ७१७६) सिमेंट घेऊन भोकरमार्गे नांदेडकडे जात होती. सीताखांडी घाटाजवळ वाळूद गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलला (क्रमांक एमएच २६ डब्ल्यू ८७१७) तिची धडक बसली. त्यात मोटरसायकलस्वार बळवंत एडके (४२, पाथरड) ठार झाले. मालमोटरचालक फरारी झाला. भोकरहून किणीकडे जाणाऱ्या मोटरसायकलला (क्रमांक एपी २९ एचडी ९९२२) अज्ञात मालमोटारीची धडक बसली. मोटरसायकलस्वार अप्पाराव पिराजी पवार (वय ४०, कांडली) यांचा एक पाय पूर्णत: निकामी झाला.

लग्नात मारामारीचे विघ्न; १४ जखमी
जिंतूर, २१ मे/वार्ताहर
बामणी पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या उमरद येथे लग्नसमारंभात जेवणाच्या पंगतीत वाढण्याच्या कारणावरून वर-वधू पक्षात हाणामारी झाली असून यामध्ये १४ जण जखमी झाले. यात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुरलीधर राघोजी वाकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बामणी पोलीस ठाण्यात भास्कर तात्याराव पाईकवार, वसंता पाईकवार, हरिभाऊ पाईकवार यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

सोस येथे ५० हजारांची चोरी
जिंतूर, २१ मे/वार्ताहर

तालुक्यातील सोस येथील यमुनाबाई रावसाहेब शेवाळे यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५० हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. यमुनाबाई काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरास कुलूप लावून जोगवाडा येथे कीर्तन ऐकण्यास गेल्या होत्या. कीर्तन संपल्यावर रात्री ११ वाजता त्या घरी परतल्या. घरातील सोन्याच्या पाच तोळ्याच्या बांगडय़ा, एक तोळ्याची एकदाणी, पाच ग्रॅमची अंगठी व रोख १० हजार रुपये असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अकरा हजारांचे सागवान पकडले
भोकर, २१ मे/वार्ताहर

चोरटय़ा मार्गाने आंध्र प्रदेशात जाणारे ११ हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड व रिक्षा असा एकूण ४१ हजारांचा ऐवज भोकर वनविभागाने जप्त केला. तालुक्यातून सागवान लाकडाची चोरटय़ा मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने वनक्षेत्रपाल जे. बी. येईलवाड यांनी काल पहाटे चार वाजता सापळा रचून रिक्षा (क्रमांक एबी २५ यू ७६९४) मध्ये सागवान लाकूड आंध्र प्रदेशात नेत असताना रंगेहात पकडले. आरोपी गजानन लिंगन्ना आरटे, शंकर विश्वनाथ आरटे (चालक), बालाजी हनमंतु पांचाळ, उल्हास सोनशेट्टे (फरारी) ११ हजार रुपये किमतीचे सागवान नेत होते. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात महिला ठार; पती जखमी
औरंगाबाद, २१ मे/प्रतिनिधी

मोटारीची दुचाकीला धडक बसून महिलेचा मृत्यू झाला व तिचा पती जखमी झाला. काल सायंकाळी साजापूर फाटय़ाजवळ हा अपघात झाला. प्रयागबाई पुंडलिक देहाडे (३५) ठार झाल्या. त्यांचे पती पुंडलिक हरिभाऊ देहाडे (४०) जखमी झाले. देहाडे पती-पत्नी दुचाकीवरून पत्नीसोबत लासूर स्टेशनकडून शहराकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या मोटारीने धडक दिली.

टँकरच्या धक्क्य़ाने एकाचा मृत्यू
हिंगोली, २१ मे/वार्ताहर
तालुक्यातील हिंगोली-वाशीम रस्त्यावर असलेल्या कलगाव ढाब्यावर रस्ता ओलांडताना टँकरचा धक्का लागल्याने प्रभाकर खंदारे (डिग्रस वाणी) ठार झाले. काल सायंकाळी ७.३० वाजण्याता हा अपघात झाला.

त्या ७२ गावांचा वीजपुरवठा सुरळीत
औरंगाबाद, २१ मे/प्रतिनिधी

वादळी पावसामुळे कन्नड, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यांतील ७२ गावांचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी चार वाजण्यापासून खंडीत झाला होता. आज दिवसभर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून सायंकाळी सुरळीत केला. कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार जे. डी. वळवी यांनी दिले आहेत. मुख्य वाहिनीचे दोन खांब कोसळल्यामुळे वेरूळ, गल्लेबोरगाव, गारज आणि देवगाव रंगारी येथील उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे या उपकेंद्रातून पुरवठा होणारी तीन तालुक्यांतील एकूण ७२ गावे काल अंधारात होती. सकाळपासूनच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दुपारपर्यंत खांब उभे केल्यानंतर तारा ओढण्याचे कामही सायंकाळपर्यंत पूर्ण झाले आणि तब्बल २६ तासांनंतर या गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला.

न्यायालय परिसरातून चोरी
नांदेड, २१ मे/वार्ताहर

जिल्हा न्यायालयातून वकील संजय त्र्यंबकराव लाठकर यांची मोटरसायकल चोरटय़ांनी पळविली. ते सकाळी नेहमीप्रमाणे मोटारसायकलवर न्यायालयात आले होते. ते न्यायालयीन कामकाजात असताना चोरांनी बनावट चावीच्या आधारे त्यांची मोटारसायकल चोरून नेली.