Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नक्षलवाद्यांशी चकमक
पाच महिला जवानांसह १६ पोलीस ठार
चंद्रपूर, २१ मे/प्रतिनिधी

 

गडचिरोली जिल्हय़ातील धानोरा ते मुरूमगाव मार्गावर आज सायंकाळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह १६ जवान शहीद झाले. यात पाच महिला जवानांचा समावेश आहे. महिलांना ठार करण्याची नक्षलवाद्यांची ही पहिलीच वेळ आहे. तीन महिन्याच्या अंतरात दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
निवडणूक निकालाचे निमित्त साधून नक्षलवाद्यांनी काल व आज गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर बंदचे आवाहन केले होते. गडचिरोलीच्या दुर्गम भागात काल या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज बंदच्या दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीवरून छत्तीसगडमधील राजनांदगांवकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर धानोरा ते मुरूमगाव दरम्यान टविटोला गावाजवळ रस्त्यावर झाडे आडवी टाकून ठेवली होती. बंदच्या दरम्यान नक्षलवादी नेहमी वाहतूक अडवण्यासाठी असे प्रकार करतात. याची माहिती मिळताच धानोरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक अय्यर व उपनिरीक्षक शांताराम घोरपडे चौदा जवानांसह ही झाडे हटवण्यासाठी पायी निघाले. येरकड या नक्षलवादी समर्थकांचा भरणा असलेल्या गावाजवळ पोलिसांचे हे पथक काही काळ थांबले. त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास टविटोल्याजवळ पोहोचून या पथकातील जवान रस्त्यावरील झाडे बाजूला करीत असतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दबा धरून बसलेल्या सुमारे चारशे नक्षलवाद्यांनी या पथकाला घेरले. यानंतर पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. ही चकमक सुमारे तीन तास चालली. पोलीस दलाच्या बहाद्दर जवानांनी कमी संख्येत असूनही नक्षलवाद्यांचा जोरदार प्रतिकार केला. रस्त्याच्या मधोमध पोलीस आणि आजूबाजूला नक्षलवादी, अशी समोरासमोर टवीटोला ते बेडगांव या दरम्यान ही चकमक सुरू होती.
सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व पोलीस शहीद झाले. यात निरीक्षक अशोक अय्यर, उपनिरीक्षक घोरपडे यांच्यासह सोळा जवानांचा समावेश आहे. शहिदांमध्ये पाच महिला जवानांचाही समावेश आहे. महिला जवानांना ठार करण्याची नक्षलवाद्यांची ही पहिलीच वेळ आहे. शहीद महिला जवानांमध्ये गेंदकुंवर फरेदिया, रा. मुरूमगांव, अल्का गावडे, रा.कुरखेडा, शकुंतला आलाम रा. अहेरी, शोभा नाडे, रा.वडसा, सुनीता कालो, रा.धानोरा यांचा समावेश आहे. मृत जवानांमध्ये मांदाडे, उसेंडी, सुरेश किरंगे, रा. मालेवाडा, मडावी, रा. जाराबंडी, नैताम रा. गडचिरोली, शेट्टीवार रा. चामोर्शी, टेंभूर्णे रा. वडसा व दोन पोलीस वाहनांचे चालक दुर्गे व रोहणकर यांचा समावेश आहे. चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांजवळची सर्व शस्त्रे लुटून नेली. ही चकमक सुरू असतांनाच पोलिसांनी वायरलेसवर गडचिरोलीच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेश प्रधान अतिरिक्त कुमक घेऊन तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. नक्षलवादी याच जंगलात असल्याने त्यांच्या शोधासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.