Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मराठमोळ्या कृष्णाने जिंकले एव्हरेस्ट!
काठमांडू, २१ मे/ वृत्तसंस्था

 

पुण्याच्या एकोणीस वर्षीय कृष्णा पाटीलने आज सकाळी सात वाजता एव्हरेस्टवर पाऊल ठेवले नि जगातील हे सर्वोच्च शिखर मराठमोळ्या कर्तृत्वाच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाले! नागरी मोहिमेद्वारे ही ‘उंची’ गाठणारी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतामधील पहिली महिला होण्याबरोबर एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी सर्वात लहान भारतीय गिर्यारोहक होण्याचे मोठे यशही कृष्णाने प्राप्त केले.
नेपाळमधील काठमांडू येथील एशियन ट्रेकिंग एजन्सीच्या ‘इको एव्हरेस्ट’ या मोहिमेतील १८ सदस्यांच्या पथकामध्ये कृष्णाचा समावेश होता. तावा स्टीफन शेर्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत कृष्णासह अमेरिकेचे सहा, ऑस्ट्रियाचे पाच, जर्मनीचे दोन गिर्यारोहक होते.
एव्हरेस्टच्या प्रत्यक्ष चढाईसाठी कृष्णाच्या पथकाने पारंपरिक साऊथ कोल मार्गावरून प्रारंभ केला. गेल्या रविवारी (दि. १७) बेस कॅम्पपासून कूच करण्यात आली. दुसऱ्या दिवशी कॅम्प दोन आणि १९ तारखेला कॅम्प तीनवर चढाई करण्यात आली. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कृष्णा व तिचे सहकारी अखेरच्या कॅम्प चारवर पोहोचले. या ठिकाणी थोडा वेळ आराम व जेवण केल्यानंतर वातावरण स्वच्छ असल्यामुळे ठरल्याप्रमाणे काल रात्री आठ वाजता कृष्णा व तिच्या सहकाऱ्यांनी मुख्य चढाईस सुरुवात केली. अवघ्या साडेदहा तासांत त्यांनी एव्हरेस्ट गाठले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजता एव्हरेस्टवर कृष्णाचा मराठी झेंडा फडकला.
कृष्णाची ही मोहीम केवळ गिर्यारोहणातील सर्वोच्च मान मिळविण्यासाठी नव्हती. तिच्या माध्यमातून हिमालयाच्या परिसरामधील पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी जगभरातून निधीही जमा करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी कृष्णा १२ एप्रिलला नेपाळला रवाना झाली. या परिसरातील जीवघेणी थंडी, बर्फाचा पाऊस, निसर्गरम्य परिसर आदींचे वर्णन कृष्णा आपल्या www.theburningface.com या ब्लॉगवर देत होती. एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान बचेंद्री पाल हिने मिळविला होता. महाराष्ट्राच्या अश्विनी सडेकर-पवार हिनेही एव्हरेस्टच्या आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. परंतु, त्या लष्कराच्या मोहिमा होत्या.
कृष्णाची मोहीम ही मात्र नागरी होती. महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर ठरण्याची कामगिरी १९९८ साली सुरेंद्र चव्हाण यांनी फत्ते केली होती.

आप्पा शेर्पाने १९ व्यांदा सर केला एव्हरेस्टचा माथा
नेपाळमधील शेर्पा व अत्यंत कसलेला गिर्यारोहक आप्पा शेर्पा याने आज सकाळी एव्हरेस्ट शिखराचा माथा सर केला. आप्पा शेर्पाने आजवर १९ वेळा एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले आहे. एव्हरेस्ट माथ्यावर आप्पा शेर्पाने आज पहाटे यशस्वी चढाई करून तेथे त्याने वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडचा (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ध्वज फडकाविला. ‘हवामानातील विपरित बदल रोखा, हिमालयाला जीवदान द्या’ असे घोषवाक्य लिहिलेले होते. नेपाळ पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ४९ वर्षे वयाच्या आप्पा शेर्पाने १९९० साली एव्हरेस्टचा माथा पहिल्यांदा सर केला होता. त्यानंतर त्याने आजवर १९ वेळा एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचा विक्रम केला. ‘इको एव्हरेस्ट एक्स्पिडिशन २००९’ या मोहिमेंतर्गत यावर्षी आप्पा शेर्पाने एव्हरेस्टचा माथा सर केला.