Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्राच्या वाटय़ाला नऊ ते दहा मंत्रीपदे?
नवी दिल्ली, २१ मे/खास प्रतिनिधी

 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ९ ते १० मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. चौदाव्या लोकसभेत काँग्रेसचे ७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ मंत्री होते. यंदाही महाराष्ट्राला १० मंत्री लाभण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याला जास्तीत जास्त मंत्री देताना विभागीय संतुलनही साधण्याचा प्रयत्न होणार असून त्यातून राज्यसभेच्या तीन सदस्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रातून तीन ते चार, मुंबई आणि विदर्भातून प्रत्येकी दोन, तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातून प्रत्येकी एका मंत्र्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.
विदर्भातून काँग्रेसकडून मुकुल वासनिक किंवा विलास मुत्तेमवार यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते. कारण याच भागातून राष्ट्रवादीच्या कोटय़ातून प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. वासनिक यांचे काँग्रेसश्रेष्ठीपाशी असलेले वजन आणि दिल्लीच्या राजकारणातील ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, वासनिक यांनी काँग्रेसचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकून काँग्रेस संघटनेचेच काम करण्याचा निर्णय घेतला तरच विलास मुत्तेमवार यांना संधी मिळेल. मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील गृहमंत्रीपद आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद गमावणारे शिवराज पाटील आणि विलासराव देशमुख यांच्यात मराठवाडय़ातून केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्यासाठी चुरस आहे. मुंबईवरील भीषण हल्ल्यानंतरही मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्व सहाही जागाजिंकल्यामुळे आपल्याला हकनाक मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावे लागले, असे देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात काँग्रेसश्रेष्ठींना भेटून सांगितले. देशमुख यांनी दोनवेळा सोनिया गांधी यांचीही भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. दुसरीकडे शिवराज पाटीलही पुन्हा मंत्री होण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे देशमुख की पाटील असा पेच काँग्रेसश्रेष्ठींपुढे पडला असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईतून विद्यमान पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा आणि दक्षिण मध्य मुंबईसारख्या नव्या मतदारसंघातून विजयी झालेले गुरुदास कामत यांची नावे मंत्रीपदासाठी सर्वात पुढे आहेत. राज्यसभेचे सदस्य असलेले देवरा आणि लोकसभेवर निवडून आलेले कामत यांच्याशिवाय मििलद देवरा आणि प्रिया दत्त यांचेही नाव मंत्रीपदासाठी शर्यतीत आहे. पण मिलिंद देवरा यांना संधी मिळाल्यास त्यांना पेट्रोलियम खाते मिळणार नसल्यामुळे मुरली देवराच मंत्री होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातून पंधराव्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य माणिकराव गावित यांना पुन्हा राज्यमंत्रीपद बहाल केले जाईल, अशी चिन्हे आहेत.
राज्यसभेतून लोकसभेत पोहोचलेले सुशीलकुमार शिंदे आणि राज्यसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांना पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे समजते. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्या नाव सर्वात पुढे असल्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत त्यांचे नाव नसण्याची शक्यता दाट आहे. तसे झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला फारशी स्पर्धा राहणार नाही. अर्थात राष्ट्रवादीच्या कोटय़ातून शरद पवारही पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पवार यांनी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचेही नाव पुढे केल्याचे समजते. पण राष्ट्रवादीला एक कॅबिनेट आणि बहुधा स्वतंत्र प्रभार असलेले एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्यामुळे पवार स्वत माघार घेऊन पटेल आणि सुळे यांची नावे पुढे करतात काय, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.