Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

प्रादेशिक

रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या आमदारकीपुढे पुन्हा प्रश्नचिन्ह
मुंबई, २१ मे/प्रतिनिधी

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले राज्याचे ग्रामीण विकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह यांच्या आमदारकीची मुदत संपण्यास सहा महिने शिल्कक राहिलेले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने त्यांच्या निवडीच्या वैधतेपुढे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
मुंबई, २१ मे / प्रतिनिधी

राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची केलेली मागणी विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या प्रादेशिक योजना पूर्ण होऊन बंद अवस्थेत आहेत अशा अहस्तांतरित योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि अन्य योजनांसाठी जिल्हा परिषदांनी पुनरुज्जीवनाची कारवाई करावयाची आहे.

नईबागकर अपात्रता प्रकरण पुन्हा गाजण्याची चिन्हे
मुंबई, २१ मे/प्रतिनिधी

बेकायदा बांधकाम करणे आणि मुलाच्या फर्मतर्फे महापालिकेचे कंत्राट घेणे या आरोपांवरून ठाणे महापालिकेचे प्रभाग क्र. ३३ चे (वर्तकनगर) शिवसेनेचे नगरसेवक बळीराम नईबागकर यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय स्वत: न घेता हे प्रकरण दिवाणी न्यायालयात नेण्याच्या शिफारशीसह महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे सोपविण्याच्या पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या निर्णयामुळे पुन्हा वाद उपस्थित होण्याची चिन्हे आहेत.

शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाचे आराखडे
महिनाभरात मंजूर करण्याचे आदेश
मुंबई, २१ मे/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची संकल्पना व आराखडा मंजुरीचे काम येत्या महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या स्मारकाच्या जागा निश्चितीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. ही जागा गिरगाव येथील सुभाषचंद्र बोस मार्गावरील पोलीस जिमखान्यासमोर समुद्रात एक किलोमीटर अंतरावर आहे.

अल्पसंख्याक महाविद्यालयांना चाप
मुंबई, २१ मे / प्रतिनिधी

अल्पसंख्याक महाविद्यालयांना ५० टक्के अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेशाचे अधिकार असले तरी या कोटय़ातून बिगरअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनाही गुणवत्ता डावलून व मोठी देणगी आकारून प्रवेश देण्यात येतात. परंतु, अल्पसंख्याक महाविद्यालयांतील या गैरप्रकारांना शालेय शिक्षण विभागाने आता आळा घातला आहे.

इस्लामिक जिमखान्याच्या निर्णयाला अ‍ॅड. काझ्मी यांचे आव्हान
मुंबई, २१ मे / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबचे वकीलपत्र स्वीकारल्याच्या सबबीखाली आपले सदस्यत्व रद्द करणाऱ्या इस्लामिक जिमखान्याने न्यायालयाचा अवमान केला असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. अब्बास काझ्मी यांनी आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे केली. या अर्जावरील सुनावणी सोमवारी होईल.

मुंबईतील ३५ इमारती अतिधोकादायक
मुंबई, २१ मे / प्रतिनिधी

पावसाळा जवळ आला की, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत दरवर्षी धोकादायक इमारतींची जी यादी जाहीर केली जाते, ती यंदाही जाहीर करण्यात आली असून ३५ इमारतींना धोकादायक इमारतींच्या यादीत टाकण्यात आले आहे. या इमारतीतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.

पश्चिम रेल्वेची फुकटय़ा प्रवाशांकडून ४.६८ लाखांची दंड वसुली
मुंबई, २१ मे / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यात एक लाख ४३ हजारांहून अधिक फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करून, त्यांच्याकडून चार कोटी ६८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वसूल केलेल्या दंडाच्या रकमेत गतवर्षीच्या तुलनेत २.५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुसऱ्याच्या नावावर आरक्षित तिकिटावर बेकायदेशीररीत्या प्रवास करण्याचे १८२ प्रकार गतवर्षी उघडकीस आले. त्यामाध्यमातून एक लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याखेरीज रेल्वे हद्दीमध्ये बस्तान बसविणाऱ्या ११९९ भिकारी व फेरीवाल्यांवर हकलण्यात आले. त्यापैकी ४२ जणांवर कायदेशीर कारवाई करून, त्यांच्याकडून ११, २७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वच्या सूत्रांनी सांगितले.

बियाणे, खतांच्या सुरळीत पुरवठय़ाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई, २१ मे/प्रतिनिधी

शेतीच्या या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांच्या पुरवठय़ात कोणतीही अडचण येता कामा नये, व त्यासाठी जिल्हानिहाय बियाणी व खते यांच्या पुरवठय़ाचा आढावा घ्यावा, असे निर्देश काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. खरीप हंगामासाठी खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेसंदर्भात मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पेरण्यांच्या वेळी बी-बियाणे आणि खतांची मागणी वाढेल. ती पूर्ण करण्यासाठी व्यवस्थित नियोजन केले आहे, त्याची अधिकाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.