Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

विजय खातू यांचा गणेशमूर्ती व्यवसायाला पूर्णविराम ; कलादिग्दर्शनाच्या नव्या वाटेवर; साकारणार केवळ २० मूर्ती
प्रसाद रावकर

तब्बल ४० वर्षे श्री गणराया आणि गणेशभक्तांची सेवा करणारे मूर्तिकार विजय खातू यांनी यंदापासून या व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे. मात्र कलेची जोपासना करण्यासाठी यंदा कमीत कमी १० ते २० मूर्ती घडविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. दरम्यान, मूर्तिकार विजय खातू यांच्या या निर्णयामुळे मुंबापुरीतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा हिरमोड झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातही क्रांतिनगरवासियांच्या झोपा उडणार !
बंधुराज लोणे

गेली तीन वर्षे मिठी नदी आणि क्रांतिनगरची पावसाळ्यात चर्चा होत असते. दोन वर्षांपूर्वी क्रांतिनगर नाल्यात चार जण वाहून गेले होते. या घटनेचा धसका घेऊन पालिका प्रशासनाने या ठिकाणी विशेष खबरदारी घेणे सुरू केले आहे. मात्र मिठी नदीचा विस्तार, पूल बांधणे आणि एअरपोर्ट प्राधिकरणाच्या जागेतील नाल्यांचे विस्तारीकरण हे मूळ प्रश्न अजूनही कायम असल्यामुळे या वर्षी क्रांतिनगरचे काय होणार, अशी भीती प्रशासन, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनाही सतावत आहे. मिठी नदीच्या परिसरात असणाऱ्या क्रांतिनगरमध्ये गेली तीन वर्षे पाणी शिरत आहे. गेल्या वर्षी क्रांतिनगर परिसरात मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली होती.

इमारत पुनर्विकासाच्या दुष्टचक्रात अडकले क्रीडा साहित्याचे जुने दुकान!
प्रतिनिधी

गेली तब्बल १४४ वर्षे क्रीडापटूंची सेवा करणाऱ्या मेट्रो येथील लोकमान्य टिळक मार्गावरील प्रसिद्ध वागळे स्पोर्ट्स हे क्रीडा साहित्याचे दुकान इमारतीच्या पुनर्विकास चक्रात अडकले आहे. इमारतीच्या पुनर्विकासबाबत विकासकाने आवश्यक ते करार न केल्यामुळे तसेच नव्या इमारतीचा प्लान न दिल्यामुळे वागळे स्पोर्ट्सच्या मालकाने त्यास विरोध केला आहे. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारे त्रास देण्याचे सत्र विकासकाने आरंभले आहे, असा आरोप वागळे स्पोर्ट्सच्या मालकांनी केला आहे.

गोष्ट ४१ व्या चोराची
सुनील डिंगणकर

अलिबाबा, मर्जिना, खुल जा सिमसिम याची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. गेल्या शंभर वर्षांत अनेक देशांमध्ये ‘अलिबाबा आणि ४० चोर’ या कथेवर चित्रपट तयार करण्यात आले आहेत. आजही ही कथा अनेक दिग्दर्शकांना भावते. लवकरच या कथेवर आधारित आणखी एक अ‍ॅनिमेशनपट येऊ घातला आहे. पण या कथेत थोडासा ‘ट्विस्ट’ आहे. यात चोरांची संख्या ४० नसून ४१ आहे आणि हा ४१ वा चोर मुंबईहून अलिबाबाच्या राज्यात गेला आहे. ‘अलिबाबा और ४१ चोर’ असे या चित्रपटाचे नाव असून ‘जजंतरम ममंतरम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सौमित्र रानडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

एड्सविरोधी जनजागरणासाठी मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी

सुमारे दहा वर्षांपूर्वी मी एका चित्रपटात एचआयव्ही पॉझिटिव्ह तरूणीची भूमिका करीत होते. तेव्हा तू असल्या भूमिका का करतेस असा प्रश्न मला अनेक परिचितांनी विचारला. या रोगाबाबत समाजात किती घृणा आहे ते तेव्हा मला समजले, अभिनेत्री नंदिता दासने आपला अनुभव सांगितला. शोभा डे म्हणाल्या, जेव्हा जगभरातल्या काही हजार जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण होते, तेव्हा अख्खे जग मास्क घालायला तयार असते. मात्र काही लाख रोज दरवर्षी एड्समुळे मृत्यूमुखी पडत असूनही कंडोमसारखी प्रतिबंधन साधने वापरण्याबाबत मात्र सार्वत्रिक उदासिनता दिसून येते.

मुंबई पुन्हा पाण्याखाली जाऊ शकते का?
जुलै २००५ मध्ये मुंबईतील पूरपरिस्थिती आठवली तर मुंबैकरांचे मन विषण्णतेने भरून येणे स्वाभाविक आहे. २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीचा तडाखा बसून एका दिवसात ९४४ मि.मी. (साधारण ३५ इंच) पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी शहर आणि उपनगरातील रस्ते, लोहमार्ग २४ तासांपेक्षा जास्त काळ पाण्यात बुडाले, वाहतूक ठप्प झाली, विमानतळ बंद ठेवण्यात आला. लोकांना गुडघाभर ते मानेपर्यंत पाण्यामधून मार्ग शोधावे लगले.

शिल्पी केंद्रात ओरिसातील हस्तकला प्रदर्शन
ओरिसा सरकारतर्फे हस्तकला व हॅण्डलूमचे प्रदर्शन शिल्पी केंद्र, द मॅजस्टीक, शहीद भगतसिंग रोड, रिगस सिनेमासमोर, गेट वे ऑफ इंडिया याठिकाणी २३ मे ते ३ जून या कालावधीत भरविण्यात येणार असून सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येईल.

महामुंबई संघर्ष समितीची रविवारी चिरनेर येथे बैठक
प्रतिनिधी

महामुंबई शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक २४ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. चिरनेर येथे संघर्ष समितीचे अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस सेवानिवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे-पाटील, विलास सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संघर्ष समितीचा संघर्ष मागील तीस वर्षांपासून सुरू आहे. सेझविरोधी लढय़ाचा यापुढील काळ खडतर होणार आहे. या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध घडामोडींचा परामर्श घेऊन शेतकऱ्यांच्या हित व अस्तित्वासाठी भविष्यात समिती आणखी सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे संघर्ष समितीची वाटचाल व चळवळीची दिशा ठरविण्यासाठी गावनिहाय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.