Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

कुकडीच्या दुसऱ्या उन्हाळी आवर्तनाचे काय झाले?
संजय काटे
श्रीगोंदे, २१ मे

कुकडीतून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने दिलेले दुसरे आश्वासनही सपशेल खोटे ठरले. राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांचे उपोषण सोडताना २० मेला आवर्तन सोडण्याचे जाहीर झाले होते. मात्र, अजूनही डिंबे कालव्याचे काम अपूर्ण असून, पिंपळगाव जोगेतील मृतसाठा येडगाव धरणात न सोडल्याने अजून आठ दिवस तरी आवर्तनाची शक्यता नसल्याचे समजले. राज्यमंत्री रामराजे निंबाळकरांची घोषणा खोटी ठरल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची आता वळवाच्या पावसावरच मदार आहे.

संगमनेरचे व्यापारी, नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांनाही ठकवले
‘इंडिका’प्रकरणी तिघांना नवी मुंबईत अटक
संगमनेर, २१ मे/वार्ताहर
भाडेतत्त्वावर वाहने पुरविण्याच्या फसवणूक प्रकरणात संगमनेरातील एकूण अकरा लोकांना कोटय़वधी रुपयांना गंडविण्यात आले आहे. त्यात शहरातील व्यापारी, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी अशा प्रतिष्ठितांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे चाळीस ते पन्नास व्यक्तींची अशा प्रकारे फसवणूक झाली असून, तिघांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी काल संबंधित तिघा भामटय़ांना अटक केली. त्यांना दि. २६पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रिपाइंच्या ४ कार्यकर्त्यांना अटक
बागूल यांना खुनाची धमकी
श्रीरामपूर, २१ मे/प्रतिनिधी
माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे समर्थन केले, म्हणून रिपब्लिकन (कवाडे गट) कार्यकर्ते व मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक अशोक बागूल यांच्या घरी जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल माजी खासदार रामदास आठवले यांच्या चौघा समर्थकांना पोलिसांनी अटक केली.

कोपरगावात दीड कोटींचे नुकसान
अवकाळी पाऊस, वादळाचा तडाखा
कोपरगाव, २१ मे/वार्ताहर
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अंदाजे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. जेऊरकुंभारी, पोहेगाव येथे वीज कोसळून एक गाय व बैल दगावला. मणेगाव येथे राहत्या घरावर वीज पडून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शहर व तालुक्यातील दूरध्वनी सेवा रात्रीपासून पूर्ण बंद पडली.

‘पोकलॅन’ जप्त, ठेकेदारासह दोघांना १४ लाख दंड
सीनापात्रात अवैध वाळूउपसा
जामखेड, २१ मे/वार्ताहर
सीना नदीपात्रात जामखेड तालुका हद्दीत अवैध वाळूउपसा केल्याबद्दल पोकलॅन वाहनाची जप्ती, तसेच वाहनाच्या मालकास ५ लाख रुपये दंडाची कारवाई तहसीलदार वसंत अहिरे यांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा केली. याबरोबरच वाळू ठेकेदारावर ९ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

राजीव गांधींच्या पुण्यतिथीलाही जिल्हा काँग्रेस समितीला टाळेच!
नगर, २१ मे/प्रतिनिधी

गटातटाच्या वादातून जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयास लावले गेलेले कुलूप अद्यापि तसेच असल्याने आज माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथी व दहशतवाद विरोधी दिन तेथे साजरा झालाच नाही. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या माळीवाडय़ातील कार्यालयात पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम केला.

यंदा प्रथमच बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी
शिक्षण, आरोग्य विभागासाठी ‘ऑनलाईन’ पद्धत
नगर, २१ मे/प्रतिनिधी
जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, यंदा प्रथमच बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करून मेमो काढला जाणार आहे. त्यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी विभागप्रमुखांना सूचना दिल्याचे समजले. सर्वात मोठे विभाग असलेल्या व म्हणूनच वादग्रस्त ठरणाऱ्या शिक्षण व आरोग्य विभागातील बदल्या पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी ‘ऑनलाईन’ पद्धत अवलंबण्याबाबत चाचपणी केली जात आहे.

जय हो! मतदार
लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या, देशभर मतदान जेमतेम ५० टक्के झाले. कमी मतदान झाले म्हणून सगळे विचारात पडले. काय होणार आपलं? पास की नापास? एक्झिट पोलवाल्यांना ऊत आला. मीडियावाल्यांना चेव फुटला. सामान्य जनता खासगीत चर्चा करू लागली. निवडणूक निकालानंतर एकाही पक्षाला बहुमत मिळणार नाही, प्रत्येकाचे थोडे थोडे अशी खिचडी तयार होणार, घोडेबाजार मात्र तेजीत राहील, पळवापळवीची व्याप्ती वाढेल. नेतेमंडळी तोंडाला येईल ते बडबडत सुटले. स्वपक्षाच्या तत्त्वांना तिलांजली देऊन सत्तेवर बसण्यासाठी तडजोडी करण्यात मशगुल झाले.

रोहयोबाबत हलगर्जीपणा झाल्यास निलंबन - डॉ. अन्बलगन
पारनेरला टंचाई आढावा बैठक
पारनेर, २१ मे/वार्ताहर
रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याबाबत नकारात्मक भूमिका घेणाऱ्या तालुक्यातील विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी आज चांगलीच खरडपट्टी काढली. रोहयो योजनेबाबत हलगर्जीपणा झाल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न
‘आठवलेंच्या पराभवाचा बदला घेऊ’
अकोले, २१ मे/वार्ताहर
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या येथील पक्ष कार्यकर्त्यांचा आज दुपारी बसस्थानकासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे यशस्वी होऊ शकला नाही. आठवले यांच्या पराभवास जबाबदार असणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी या वेळी दिला.

पुन्हा सहकार एजन्सीच!
जकातीसाठी एकमेव निविदा
नगर, २१ मे/प्रतिनिधी

महापालिका जकात वसुलीची निविदा आज पुन्हा फक्त सहकार एजन्सीनेच नेली. सर्व अटी, शर्ती पूर्ण करून निविदा उद्या (शुक्रवारी) दुपारी २पर्यंत दाखल करायची आहे. या निविदेत मनपाने प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १ कोटी ४० लाख रुपये देणे आवश्यक, अशी अटच टाकली आहे. त्यामुळे निविदा दाखल करायची असेल, तर सहकार एजन्सीला ही अट मान्यच करावी लागेल. यापूर्वी प्रशासनाने ‘सहकार’ची निविदा त्यांनी ही १ कोटी ४० लाखांची अट अमान्य केल्यामुळे फेटाळली होती. त्या वेळी निविदेच्या जाहिरातीत बांधकामासाठी ही रक्कम देणाऱ्यास प्राधान्य अशी शब्दरचना होती. एकमेव निविदा असल्याचा स्वाभाविक फायदा घेत ‘सहकार’ने ही अट अमान्य केली होती. मात्र, प्रशासनाने एकमेव निविदाही रद्द करून आपण मनपाचे आर्थिक नुकसान करणार नाही, हे दाखवून दिले. निविदा चौथ्यांदा प्रसिद्ध करताना मनपाने ‘प्राधान्य’ हा शब्दच बदलून तिथे ‘अट’ अशी शब्दरचना केली. त्यामुळेच सहकार एजन्सी काय भूमिका घेते, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. दुपारी दोन वाजता निविदा दाखल झाल्यावर आयुक्त कल्याण केळकर यांच्या दालनात ४ वाजता निविदाधारक व अन्य अधिकाऱ्यांसमक्ष ती उघडण्यात येईल.

रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष वाकचौरे यांचा राजीनामा
श्रीरामपूर, २१ मे/प्रतिनिधी

रामदास आठवले यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून रिपब्ेिलकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. आठवलेंच्या पराभवामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या क ोटय़ातून जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य बाळासाहेब गायकवाड यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आज वाकचौरेंनी राजीनामा दिला. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रिपब्लिकन चळवळीत आहोत. आठवलेंनी शिर्डीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही जिल्ह्य़ात नेहमी मदत केली. परंतु त्यांनी विश्वासघात केला. आठवलेंच्या विजयासाठी सकारात्मक वातावरणही निर्माण क रू शकलो नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्याच्या पराभवाचे आत्मपरीक्षण केले. पदाला चिकटून राहणे योग्य नसल्याने राजीनामा देत आहे. मात्र, आठवलेंचा पराभव करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून संघर्ष करीत राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘अशोक दूध’वरील कारवाई रद्दबातल
श्रीरामपूर, २१ मे/प्रतिनिधी

अशोक साखर कारखाना निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘मुळा-प्रवरा’ने अशोक दूध या संस्थेवर केलेली दंडात्मक कारवाई अपील प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व्ही. डी. शिंत्रे यांनी रद्दबातल केली. प्रगतीनगर येथील अशोक दूध प्रकल्पास वापरल्या जाणाऱ्या वीज जोडणीबाबत ‘मुळा-प्रवरा’ने पंचनामा क रून जादा वीज वापर केला, असा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली होती. ८ लाख ३४ हजार रुपये बिल आकारून ही रक्कम सात दिवसांत भरावी, असा आदेश दिला होता. त्याविरोधात अशोक दूधने मुख्य अभियंता यांच्याकडे अपील केले. या प्रकरणी सुनावणी होऊन अशोक दूधच्या बाजूने निकाल देण्यात आला. अशोक दूध या संस्थेकडून राहुल करपे यांनी काम पाहिले.

मोटारीची दुचाकीला धडक;मुख्याध्यापक जागीच ठार
श्रीगोंदे, २१ मे/वार्ताहर
इंडिका मोटारीची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना नगर-दौंड रस्त्यावर तालुक्यातील काष्टी शिवारात आज संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. गिरीम (तालुका दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश मल्हारी गवळी (वय ४५)असे मृताचे नाव आहे. गवळी पत्नीसह दुचाकीवरून ढोकराई येथून दौंडकडे जात होते. काष्टी शिवारातील टिमुणेवस्तीजवळ दुचाकीला मोटारीची धडक बसली. त्यात गवळी पती-पत्नी दुचाकीसह बाजूला पडले. गवळी जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी उर्मिला (वय ४०) गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी काष्टी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काष्टीतील युवक कार्यकर्ते साजन पाचपुते यांनी जखमीस उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

माळवाडीला वीज पडून एकजण ठार
संगमनेर, २१ मे/वार्ताहर

तालुक्यात काल झालेल्या वादळी पावसाने साकूर-जवळच्या माळवाडी येथे वीज पडून शंकर लक्ष्मण पवार (वय १६) हा जागीच ठार झाला. पवार शेळ्या चारण्यासाठी डोंगरालगत गेला होता. काल सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. त्यात वीज पडून गंभीर भाजल्याने पवार मृत्यू पावला. तहसीलदार भगीरथ दौडे यांनी तातडीने साकूर येथे भेट दिली. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत तालुक्यात ३४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक पाऊस काल २५ मिमी नोंदविण्यात आल्याचे नायब तहसीलदार अनिल सोमणी यांनी सांगितले.