Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

रुग्णसेवा पैसा लुटण्याचे क्षेत्र नव्हे -डॉ. कलाम
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी
रुग्णसेवा हे सेवेचे क्षेत्र आहे, पैसे लुटण्याचे नव्हे. रुग्णाला नवजीवन प्राप्त करून देण्याचे ध्येय डॉक्टरांनी ठेवावे, असे आवाहन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी येथे केले. पंचशील चौकातील केअर हॉस्पिटलमधील बाह्य़रुग्ण विभाग आणि प्रशासकीय विभागाचे उद्घाटन डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंधरा मिनिटाच्या भाषणात डॉ. कलाम यांनी केअर हॉस्पिटलशी असलेल्या संबंधाचा उल्लेख करीत वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मानव कल्याणासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अनेकदा आजार लहान असतो पण, रुग्णाला अनेक चाचण्या करण्यास सांगण्यात येते. आजार कोणता आहे, हे जाणून घेण्यासाठी तपासण्या गरजेच्या असल्या तरी ज्या आवश्यक आहे त्याच तपासण्या करण्यास डॉक्टरांनी रुग्णांना सांगावे.

‘४९ दिवसांच्या खर्चाचा हिशेब १५ जूनपर्यंत सादर करा’
नवनिर्वाचित खासदार आणि पराभूत उमेदवारांची डोकेदुखी कायम

नागपूर, २१ मे / प्रतिनिधी

निवडणूक संपली, निकाल जाहीर झाला, नवीन सरकार स्थापन होत असताना नवनिर्वाचित खासदार आणि पराभूत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तब्बल ४९ दिवसांचा हिशेब सादर करण्याची डोकेदुखी कायम आहे. येत्या १५ जूनपर्यंत हा खर्च सादर करावयाचा असल्याने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नमुन्यात सर्व खर्च उमेदवारांना सादर करायचा आहे. २३ मार्चला निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून ते १६ मे रोजी निकाल जाहीर होईपर्यंतचा तब्बल ४९ दिवसांचा खर्चाचा कालावधी आहे. यासंदर्भात सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्र पाठवले आहे.

धंतोलीत सव्वा लाखाची चोरी, दोन आरोपींना तासाभरात अटक
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी
धंतोलीतील एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे बुधवारी रात्री झालेल्या सुमारे सव्वा लाखाच्या चोरीतील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका तासात अटक केली.
बुधवारी रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान जसलीन रुग्णालयामागील शासकीय गृहनिर्माण वसाहतीत ही घटना घडली. चार्टर्ड अकाऊंटंट राम यादव बोंडे हे काल रात्री घरी झोपले असताना घराचे कुलूप तोडून दारातून आत शिरलेल्या चोरटय़ांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने (किंमत १ लाख २२ हजार रुपये) चोरून नेल़े त्यांनी लगेचच पोलीस नियंत्रण कक्षाला कळवून धंतोली पोलीस ठाण्यात तक्रारही दिली.

रामटेक पोलीस ठाण्यात घडला चित्रपटात शोभणारा थरार
‘बाई का आली’ म्हणताच हवालदाराने झाडल्या गोळ्या
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी
हवालदार राठोड निलंबित
रविवापर्यंत पोलीस कोठडी
एरवी चित्रपटात शोभून दिसेल अशी घटना व थरार बुधवारी मध्यरात्री रामटेक पोलीस ठाण्याने अनुभवला. ‘बाई का आली’, या कारणावरून हवालदाराने शिपायावर एसएलआर ३०९ बंदुकीमधून गोळ्या झाडल्या. या घटनेने रामटेकमध्ये खळबळ उडाली.

नागपूर काळोखात
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी

ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा फटका सहन करणाऱ्या नागपूरकरांना आता पावसाळ्याच्या तोंडावर वादळामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने महापारेषणची वाहिनी तुटल्याने संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित झाला, तर रात्री नऊ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास संपूर्ण नागपूर पुन्हा अंधारात बुडाले.

प्रमोद अग्रवालची राज्याबाहेरही कोटय़वधीची संपत्ती
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी

आरोपी प्रमोद अग्रवाल याने दिल्लीच्या एका दलालामार्फत परप्रांतातही कोटय़वधी रुपयांची अचल संपत्ती खरेदी केल्याचे तपास पथकाला समजले असून आरोपीला न्यायालयाने २४ व त्याच्या पत्नीला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.

रेल्वे जनमंडळ शाळेत चित्रकला व नाटय़ शिबीर
नागपूर, २१ मे/प्रतिनिधी
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मंडळ परिषदेच्या वतीने ११ ते २३ मेपर्यंत रेल्वे जनमंडळ हायस्कूल येथे चित्रकला व नाटय़ शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ४ ते १५ वयोगटातील ६५ विद्यार्थी सहभागी झाले. सेंटर पॉईंट शाळेचे कला विभाग प्रमुख संजय वलीवकर, स्मिता ससनकर, राजीव वलीवकर मार्गदर्शन करत आहेत. शिबीरातील मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन जून महिन्यात डब्ल्यूएसएससी शाळेत आयोजित करण्यात येईल. शिबीराकरता विनोद चतूर्वेदी, दिवाकर त्रिवेदी, आर.एन. चांदूरकर आदी सहकार्य करत आहेत.

हरिभाऊ भोले यांचे निधन
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी
विश्वकर्मा नगरातील प्रतिष्ठित नागरिक हरिभाऊ भोले यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.
ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बी.कॉम. अंतिम वर्षांचे निकाल
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील बी.कॉम. अंतिम वर्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. होमलाईट सोलर सिस्टिमबाबत डॉ. देव शंका समाधान करणार होमलाईट सोलर सिस्टिमचे डॉ. देव येत्या २३ व २४ मे रोजी अहल्या मंदिर येथे इच्छुकांच्या शंका समाधानासाठी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत उपलब्ध राहतील. इच्छुकांनी ९३७१९९८६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या तरुणीच्या तक्रारीवरून एका पन्नास वर्षांच्या इसमाविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वामनराव ढोबळे (रा. चंद्रमणी नगर) हे आरोपीचे नाव आहे. त्याने एका २७ वर्षांच्या महिलेला घरगुती कामाकरीता ठेवून, लग्नाचे आमिष दाखवून मार्च २००८ पासून लैंगिक अत्याचार केला. ती गर्भवती झाल्यानंतरही त्याने लग्नास करण्यास नकार दिला, अशी तक्रार त्या पीडित महिलेने अजनी पोलीस ठाण्यात केली़

राष्ट्रसंतांना अभिवादन
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी

पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुधाकर गायधनी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी गायधनी म्हणाले, बहुजनांचे महापुरुष आणि त्यांचे विचार आजही समाजात दिशादर्शक असून समाजव्यवस्था राष्ट्रहिताच्या दृष्टीने कार्यरत राहील असे आहेत. समाज विविध जातीतून विभागण्याचे षडयंत्र या देशात अनेक युगांपासून वापरले गेले आणि या जातींमधील महापुरुषांना देखील जातीपुरते मार्यादित करण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे सर्व महापुरुष आणि त्यांचे विचार समस्त बहुजनांसाठी असल्याने त्यांच्यापुढे आपोआपच माथा तुकतो, असेही गायधनी म्हणाले. यावेळी प्राचार्य जी.टी. इंगोले, डॉ. चंद्रशेखर चांदेकर, ज्ञानेश्वर रक्षक, निलेश मोहरकर, लीना निकम, ज्योती मोहरकर प्रेमलता जाधव उपस्थित होते.