Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

नवनीत

जी व न द र्श न
बुद्धिमत्ता

 

प्रेषित हजम्रत मुहम्मद (स.) यांना लिहिता वाचता येत नसले तरी अल्लाहने त्यांना अफाट ज्ञान, स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रदान केली होती. अनेक लोकांचे असे गैरसमज आहेत की, पवित्र कुरआन हा पैगंबर साहेबांनी लिहिलेला ग्रंथ आहे. कुरआन हे पैगंबर साहेबांवर अल्लाहकडून अवतरित एक आकाशी पुस्तक आहे. दिव्यबोध (वहय़ी) च्या मार्गे हे पुस्तक गरजेनुसार नियमित कालावधीत थोडे थोडे अवतरित व्हायचे. हे संदेश आणण्याचे काम देवदूत हजरत जिब्राईलच्या सुपूर्द होते. विसर पडू नये म्हणून पैगंबर साहेब या ओळी मुखोद्गत करण्याकरिता खूप घाई करायचे. अल्लाहने त्यांना आदेश दिला की, ‘विनाकारण घाई करू नका. या ग्रंथाच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. कारण हे ग्रंथ आम्हीच अवतरविले आहे.’ नंतर असे दिसून आले, की हे संपूर्ण ग्रंथ संपूर्णपणे स्मरणात ठेवण्याकरिता पैगंबर साहेबांना फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणखी एक उदाहरण असे, की बद्रच्या मैदानात युद्ध सुरू व्हायच्या आधी गनिमांचा एक सैनिक मागमूस घेण्याकरिता प्रेषित साहेबांच्या छावणीत शिरला. त्याला इस्लामी सैनिकांनी धरले आणि गनिमाच्या सैनिकांची संख्या विचारू लागले. तो म्हणायचा, ‘वल्लाहु, हिकसीर’ (अल्लाह शपथ खूप माणसे आहेत.) यात थोडी झटापट झाली. आवाज ऐकून प्रेषित साहेब आपल्या ठिकाणाहून बाहेर आले आणि त्याला सोडण्याचे आदेश दिले. जेव्हा तो जरा शांत झाला तेव्हा त्याला विचारले, की ‘‘तुमच्या लष्करात रोज किती उंट कापले जातात?’’ तो म्हणाला, की ‘‘दहा उंट रोज कापण्यात येतात.’’ पैगंबर साहेब म्हणाले, की ‘‘एक हजार माणसे असावीत, कारण एक उंट शंभर माणसांना पुरेसा आहे. प्रत्येक दिवशी दहा उंटांचे वध दर्शवितो, की गनिमाच्या सेनेत हजार सैनिक आहेत.’’ लढाई संपल्यानंतर जेव्हा माहिती गोळा करण्यात आली तर असे दिसून आले, की कुरैशच्या फौजात हजार माणसे होती हे सत्य इतिहासात नमूद आहे.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
अंतराळयुग- २
अंतराळयुगाची प्रत्यक्ष सुरुवात केव्हा झाली? त्यातले सुरुवातीच्या काळातले महत्त्वाचे टप्पे कोणते?
रशियाने इ. स. १९५७ मध्ये साधारण दोन फुटबॉल एवढय़ा व्यासाचा मानवरहित ‘स्पुटनिक’ हा उपग्रह अवकाशात सोडला आणि अंतराळयुगाची पहाट झाली. यानंतर सव्वा वर्षांतच रशियानेच ल्यूना- १ हे अंतराळयान चंद्राच्या दिशेने पाठवले. चौतीस तासांच्या प्रवासानंतर हे यान चंद्रापासून अवघ्या सहा हजार कि.मी. अंतरावरून पार झाले. यानंतर आठ महिन्यांनी रशियाने पाठवलेले ल्यूना- २ हे यान चंद्रावर प्रत्यक्ष उतरले. मात्र उतरताना झालेल्या आघातामुळे या यानाची संदेशयंत्रणा बंद पडली. सुरुवातीच्या काळात फक्त वातावरणाचा वेध घेणारी यंत्रे तसेच कुत्री व माकडे अवकाशात पाठवली गेली. या तीन-चार वर्षांच्या काळात मानवरहित यानांच्या चाचण्या करण्यात आल्या. यानंतर इ. स. १९६१ साली रशियानेच व्होस्ताक-१ या यानातून युरी गागारीन या पहिल्या अंतराळवीराला पृथ्वीप्रदक्षिणेला पाठवले. पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालून हे यान पुन्हा पृथ्वीवर परतले. गागारीनच्या अंतराळप्रवासानंतर तीन आठवडय़ांतच फ्रीडम ७ या यानातून पंधरा मिनिटांच्या छोटय़ा मोहिमेद्वारे अंतराळात गेलेला अमेरिकेचा अ‍ॅलन शेपर्ड हा यानापासून वेगळा न होता, यानाबरोबरच अ‍ॅटलांटिक महासागरात सुखरूप उतरला.
इ. स. १९६६ साली ल्यूना-९ या यानाला चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरवण्यात रशियन तंत्रज्ञांना यश आले. जुलै १९६९ मध्ये अपोलो-११ या यानातून आर्मस्ट्राँग आणि अ‍ॅल्ड्रिन हे अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरले आणि सुखरूप पृथ्वीवर परतले. इ. स. १९७५ साली सोयुझ व अपोलो ही याने अवकाशात एकमेकांना यशस्वीरीत्या जोडण्यात आली. सुरुवातीच्या काळातली अंतराळाने ही फक्त एकदाच वापरता येत. इ. स. १९८१ पासून ‘स्पेस शटल’चा जमाना आला. ही ‘स्पेश शटल’ म्हणजे पृथ्वीबाहेर पुन:पुन्हा ये-जा करणारी विमाने आहेत.
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
कॉन्स्टॅन्टिन द ग्रेट
आजच्या युगोस्लाव्हियामधील नायसरा येथे रोमन सम्राट कॉन्स्टॅन्टिन द ग्रेट यांचा इ. स. २४७च्या सुमारास जन्म झाला. ऐतिहासिक शहर कॉन्स्टॅन्टिनोपल हे निर्माण करून त्यांनी इतिहास घडवला. एवढेच नव्हे तर हे शहर त्यांनी भरभराटीला आणले. या शहरात लोकांनी यावे म्हणून आर्थिक मदत केली. पुढे या शहराला पूर्व रोमन साम्राज्याच्या राजधानीचा दर्जा मिळाला. त्या काळात रोमन राजे ख्रिस्ती धर्माचे विरोधक होते. पण कॉन्स्टॅन्टिन हे धर्मनिरपेक्ष वृत्तीचे होते. त्यांच्या काळात ख्रिस्ती धर्माचा उत्कर्ष झाला. या त्यांच्या काही जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्या संशयी स्वभावाने कित्येक वाईट कृत्ये त्यांच्या हातून झाली. त्यांची आई हेलेना ही त्यांचे वडील सम्राट कलोरस यांची अधिकृत लग्नाची बायको नसल्याने अनौरस म्हणून त्यांची हेळसांड झाली. परिणामी, रोमच्या सिंहासनावर बसण्यास त्यांना अनेकांचा विरोध होता. पण साम, दाम, दंड, भेद, प्रसंगी निर्दयी वागून रोमचे सिंहासन त्यांनी बळकावले. संशयी स्वभावामुळे जवळचे नातेवाईक, सावत्र भाऊ, इतकेच काय, पण स्वत:चे सासरे, मेहुणे, पुतण्या आणि मुलगा ग्रीप्सस यांचीसुद्धा त्यांनी हत्या केली. आई हेलेना सोडल्यास त्यांचा कोणावरही विश्वास नव्हता. तरीही तिचा नातूही त्यांच्या रोषाला बळी पडला. शेतकऱ्यांनाही कमी पीक घेतल्यास ‘तुम्हाला गुलाम बनवील’ अशी भीती घाली. असे असले तरी एक योद्धा, आदर्श राज्यकर्ता म्हणून रोमच्या इतिहासात त्यांनी आपले नाव कोरले. ख्रिस्ती धर्माला त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तो धर्म त्यांच्या कारकीर्दीत फोफावला. पुढे त्यांच्या दोन्ही मुलांनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला. २२ मे ३३७ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निकोमोडिया येथे त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
तन्ना ते तानसेन

मध्य प्रदेशातल्या सुप्रसिद्ध ग्वाल्हेर शहराजवळच्या गावात सोळाव्या शतकात ही कथा घडली. छोटय़ा तन्नमिश्रचे उभ्या बेहट गावात फार कौतुक व्हायचे. कुठल्याही आवाजाची तन्नमिश्र हुबेहूब नक्कल करायचा. पशु, पक्षी, वाद्य कुठलाच आवाज काढणे त्याला अवघड वाटत नसे. बेहट गावातल्या तन्नमिश्रचे वडील मकरंद पांडे संगीतशास्त्रात आणि गायनकलेत पारंगत होते. संगीताच्या साधनेबरोबरच विद्यार्थ्यांना ते संगीत शिकवत. याच काळात वृंदावनातील अरण्यातल्या एका कुटीत संगीताचे महान अभ्यासक व थोर गायक हरिदास यांचे वास्तव्य होते. आजूबाजूच्या परिसरात त्यांचा संचार असे. बेहट गावाजवळील वनराईतून जाताना स्वामी हरिदासांच्या कानावर वाघाची उग्र डरकाळी पडली. जवळच प्रत्यक्ष चांगला दांडगा वाघ असल्याची त्यांची खात्री पटली. शोध घेताना त्यांना कळले, की ती वाघाची डरकाळी नव्हती. तन्नमिश्र या लहान मुलाने केलेली डरकाळीची नक्कल होती. ते चकित झाले. शिष्यांजवळ त्यांनी नक्कल करणाऱ्या मुलाची विचारपूस केली आणि ते मकरंद पांडेंच्या घरी गेले. ‘‘हा मुलगा मला द्या. मी त्याचा सांभाळ करेन. संगीताचे उत्तम शिक्षण देईन’’ स्वामी हरिदासांनी मागणी केली. मकरंद पांडे संगीताचे पुजारी. प्रत्यक्ष संगीताच्या भगवंतांकडून आपल्या मुलाला संगीताचे धडे मिळणार, याहून दुसरे भाग्य कुठले, असे त्यांना वाटले. त्यांनी आपल्या प्रिय लेकाला स्वामीजींच्या पायावर घातले. अतिशय मन:पूर्वक आणि परिश्रमाने तन्नाने गुरुभक्ती, गुरुसेवा केली. अनेक वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केली. त्यांच्या मौलिक शिकवणीचे मन:पूर्वक अध्ययन, मनन, चिंतन केले. अनेक ऋतू उलटले. साधना पूर्ण झाली. लहानगा तन्ना मोठा गायक झाला. तन्नमिश्रचे नाव पुढे मियाँ तानसेन पडले. संगीतातला स्वरभास्कर, स्वरांचा सम्राट म्हणून जो प्रसिद्ध झाला तोच हा ‘तानसेन’. अकबर बादशहाने आपल्या दरबारात नवरत्नांपैकी एका रत्नाचे स्थान दिले. तानसेनच्या गाण्यात इतके सामथ्र्य होते की, आपल्या गायनाने दीप प्रज्वलित करणे, पाऊस पाडणे, पशुपक्ष्यांना मोहित करणे असे चमत्कार घडल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. तानसेननी मियाँ मल्हार, दीपक, मियाँ की तोडी, दरबारी कानडा इ. रागांची निर्मिती केली, असे मानले जाते. प्रत्येकामध्ये प्रतिभा असते. त्या प्रतिभेवर योग्य ते संस्कार होणे आवश्यक असते. त्यामुळे ती अधिक संपन्न होते. आपल्या प्रतिभेचा वापर केवळ दुसऱ्याची नक्कल करण्यासाठीच अनेकजण करतात. गायन, चित्रकला, लेखन, शिल्पकला, संगीत, नृत्य यामध्ये स्वत:ची प्रतिभा वापरण्याऐवजी मान्यवरांची नक्कल करण्यात धान्यता मानणारे कधीच मोठे कलावंत होऊ शकणार नाहीत. आजचा संकल्प- माझ्यातल्या प्रतिभेला जाणून मी अधिक संपन्न करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com