Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

गोठिवलीतील अनधिकृत चाळी जमीनदोस्त
नवी मुंबई/प्रतिनिधी
ऐरोलीनजिक असलेल्या गोठिवली-रबाळे गावालगत एका मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या तब्बल ६२ अनधिकृत चाळी आज सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केल्या. नवी मुंबईतील मूळ गावांलगत असलेले मोकळे भूखंड बळकावून त्यावर चाळी उभारणाऱ्या भूखंड माफियांनी रबाळे-गोठिवली भागात या चाळींमधून सुमारे पाचशेहून अधिक घरे उभारली होती. या भागातील काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मुंबईतील काही भूखंड माफियांनी उभारलेल्या या चाळींमधील घरे सुमारे तीन ते पाच लाख याप्रमाणे विकण्यात आली होती.

प्रदूषणकारी प्रलय
उरण परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच येथील ओएनजीसी प्रकल्पातून वायू हवेत सोडला जात असल्याने, हवेतील प्रदूषणात आणखी भर पडली आहे. मात्र असे प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्या व प्रकल्पांवर कारवाई करणार कोण व कधी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

निष्काळजीपणे मालवाहतूक गाडय़ा चालविणाऱ्यांवर आरटीओची कारवाई
बेलापूर/वार्ताहर - बांधकाम साहित्याची निष्काळजीपणे वाहतूक करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या मालवाहतूकदारांवर कडक कारवाईची मोहीम नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे. या कारवाईमुळे वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई करण्यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

२१ जणांना राजिपची नोटीस; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
उरण/वार्ताहर - सुमारे ३५ वर्षांपासून उरण येथील जिल्हा परिषदेच्या जागेत भाडेपट्टय़ाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही बेकायदेशीर वापर करणाऱ्या २१ दुकानधारकांना रायगड जिल्हा परिषदेने नोटिसा बजाविल्या आहेत. जि. प. जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या केलेल्या दुकानांचे बांधकाम स्वखर्चाने तोडून जागेचा वापर तात्काळ बंद करावा, अन्यथा जि. प.मार्फत बांधकाम तोडून टाकण्याचे व याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याने संबंधित व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षेत सारंग रामशेरी प्रथम
पनवेल/प्रतिनिधी - सीबीएससीतर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पनवेलचा सारंग रामशेरी हा विद्यार्थी नवी मुंबई विभागात सर्वप्रथम आला आहे. लोधिवली येथील जे.एच. अंबानी विद्यालयाचा विद्यार्थी असणाऱ्या सारंगने ९६.६ टक्के गुण मिळविले आहेत.

गावंड यांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून आर्थिक मदत
उरण/वार्ताहर - निवडणुकीच्या दिवशी अपघातात निधन झालेले शिवसेनेचे पिरकोनचे उपशाखाप्रमुख किशोर गावंड (४५) यांना उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी तालुकाप्रमुख दिनेश पाटील यांनी घेतली आहे.

आज सीबीडी व नेरुळ येथील वीजपुरवठा बंद राहणार
बेलापूर/वार्ताहर - सीबीडी व नेरुळ परिसरातील विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नेरुळमधील सेक्टर १ ते ११, १५ व जुईनगर सेक्टर २२ ते २५, नेरुळ गाव, सीबीडीतील कोकणभवन परिसर, किल्ले गावठाण, रेतीबंदर, सेक्टर १, ३, ७, ९ व १२ येथील वीजपुरठा बंद असणार आहे. उपरोक्त ठिकाणचे दुरुस्तीचे काम तातडीचे असल्याने वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत कांबळे यांनी केले आहे.

कळंबोलीमध्ये संशयास्पद लॉज
पनवेल/प्रतिनिधी - कळंबोली गावामध्ये असणाऱ्या ‘पूना पॉइंट’ या लॉजमध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याचा आरोप करीत हे लॉज त्वरित बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या लॉजच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही, तसेच लॉजला ग्रामस्थांचाही प्रखर विरोध आहे, अशी माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष गोमा परशे यांनी दिली. या लॉजजवळच शाळा, बालवाडी असून, आतील बाजूस असणाऱ्या या लॉजमध्ये प्रवासी उतरण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्याशेजारी असणाऱ्या ‘कॅप्टन’ या लेडिज बारसाठी या लॉजचा उपयोग केला जात असावा, अशी शक्यता मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. लेडिज बारमध्ये येणाऱ्या आंबटशौकिनांची सोय व्हावी यासाठीच हे लॉज उभारल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची मंजुरी न घेताच हे लॉज सुरू असल्याने ते त्वरित बंद करावे, अशी मागणी परशे यांनी पोलिसांकडे केली आहे.

पनवेलमध्ये पावसाची हजेरी
पनवेल - मुंबई, ठाण्याप्रमाणे पनवेलमध्येही बुधवारी संध्याकाळी पहिल्या पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी सहा ते साडेसहा या कालावधीत पहिल्या पावसाने केलेल्या दमदार बॅटिंगमुळे वातावरणात गारवा आला. मात्र अचानक दाखल झालेल्या या पाहुण्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी सकाळपासूनच सूर्याचे दर्शन न झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत होती, परंतु गुरुवारी सकाळपासून मात्र उष्म्याचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आणि वळवाचा पाऊस निष्प्रभ ठरला. मान्सून पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत पारा खाली उतरणे कठीण आहे.

बांधकाम व्यावसायिकाची रोकड लंपास
बेलापूर - बोरिवली येथील बांधकाम व्यावसायिक हिरेन सौदागर यांच्या गाडीची काच तोडून आतील रोख रक्कम व क्रेडिट कार्ड असा ५८ हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सौदागर यांनी वाशी पामबीच मार्गावर सत्रा प्रॉपर्टी दुकानासमोर दुपारी त्यांची कार पार्क केली होती. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने भुरटय़ा चोरांचे पेव फुटल्याची प्रतिक्रिया येथील दुकानदारांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या परिसरातील गस्त वाढवावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

इन्शुरन्स कंपनीला ठकविणारे गजाआड
बेलापूर - सीबीडी येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची एक लाखांची फसवणूक करणारे दोघे ठकसेन पोलिसांनी गजाआड केले. श्रीनाथ स्वाईन ऊर्फ हरिदास शहू व बाबूलाल सुरेशदादा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी संगनमताने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची बनावट कागदपत्रे वरील कंपनीस सादर केली होती. ९ फेब्रुवारी २००७ ते १८ मे २००९ या कालावधीदरम्यान त्यांनी कंपनीची फसवणूक करून एक लाख आठ हजार रुपयांचे धनादेश घेतले होते. कंपनीचे कर्मचारी अभिजीत भालेराव यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी चौकशीअंती शहू व बाबूलाल यांच्याविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

वैदिक गणितावर मोफत व्याख्यान
नवी मुंबई - स्टडी फोरम संस्थेतर्फे स्मरणशक्ती विकास व वैदिक गणित विषयावर विनामूल्य व्याख्यान २३, २४, २५ व २६ मे रोजी सायंकाळी ६ ते ७.१५ तसेच सायंकाळी ८ ते ९.१५ या वेळेत क्लास रूम नं. ४, तळ मजला, नवी मुंबई सेकंडरी हायस्कूल, सेक्टर १, वाशी पोलीस स्टेशनच्या तसेच एमजीएम रुग्णालयाजवळ, वाशी स्टेशनपासून चालत ५-१० मिनिटांच्या अंतरावर वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे. वरील पैकी कोणत्याही एका दिवशी पालकांनी व विद्याथ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.